भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प समता नगर, विडणी येथे संपन्न

0
12
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प समता नगर, विडणी येथे संपन्न

फलटण साहस Times| भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प समता नगर, मौजे विडणी येथे मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडले. या वेळी “बौद्धांचे मंगल दिन आणि मंगल सण” या विषयावर प्रवचन देण्यासाठी आयु. चंद्रकांत मोहिते सर यांना प्रवचनकार म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

आपल्या प्रभावी भाषणात मोहिते सरांनी बौद्ध समाजातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या दिवसांचे महत्त्व उलगडून सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, इ.स.पूर्व 563 मध्ये भगवान गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी वनात एका शालवृक्षाखाली झाला, आणि तिथूनच बौद्ध समाजाच्या मंगल दिनांची सुरुवात झाली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळे बौद्ध जीवनात नवीन ऊर्जा संचारली. वर्षभरातील बारा पौर्णिमा या बौद्धांसाठी मंगल दिन ठरतात.

त्यांनी पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल हा जन्मदिन, 1 जानेवारीला भिमा कोरेगाव विजय दिन, 20 मार्च महाड सत्याग्रह, 14 ऑक्टोबर माता रमाई जन्म दिन, आणि धम्मदिक्षा दिन यांसारख्या अनेक दिवसांचे बौद्ध दृष्टिकोनातून महत्त्व विषद केले. हे सर्व दिवस प्रत्येक बौद्धाने साजरे केले पाहिजेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव यांनी भगवान बुद्धांच्या विचारांवर आधारित मंगल मैत्री दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुरुवर्य दादासाहेब भोसले (केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर, सातारा व पुणे जिल्हा प्रभारी), तालुका महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, संस्कार सचिव बजरंग गायकवाड यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र मोरे (उपाध्यक्ष, प्रचार-पर्यटन विभाग) यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी आभारप्रदर्शन करून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन घडवले. कार्यक्रम अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी झाला.