Tuesday, September 15, 2026
Homeसाताराकर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडीची शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ठरली अभ्यासपूर्ण व संस्मरणीय

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडीची शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ठरली अभ्यासपूर्ण व संस्मरणीय


(बिजवडी) : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी (ता. माण, जि. सातारा) येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2025–26 अंतर्गत आयोजित करण्यात आलेली दोन दिवसांची शैक्षणिक सहल अत्यंत यशस्वी व ज्ञानवर्धक ठरली. गुरुवार दि. 11 डिसेंबर 2025 व शुक्रवार दि. 12 डिसेंबर 2025 या कालावधीत ही सहल पार पडली.
सहलीची सुरुवात गुरुवारी पहाटे बिजवडी येथून झाली. विद्यार्थ्यांची उपस्थिती घेतल्यानंतर गाडी पूजन करून प्रवासाला प्रारंभ करण्यात आला.

प्रवासादरम्यान वाई येथील गणपती दर्शन, महाबळेश्वर दर्शन तसेच प्रतापगड किल्ल्याला भेट देण्यात आली. प्रतापगडावरील ऐतिहासिक महत्व, शिवकालीन इतिहास व गडांची भौगोलिक रचना याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर महाड येथे चवदार तळ्याला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सत्याग्रहाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सामाजिक समता, मानवाधिकार व संविधान मूल्यांवर चर्चा करण्यात आली. पुढे हरिहरेश्वर दर्शन, दिवेआगर येथे मुक्काम व समुद्रकिनाऱ्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
शुक्रवारी सकाळी दिवेआगर बीच येथे समुद्रकिनाऱ्याच्या पर्यावरणीय वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात आला. समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधता, स्वच्छता, प्रदूषण व पर्यावरण संवर्धन यावर प्रत्यक्ष निरीक्षण व चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुरुड-जंजिरा किल्ला, पाली येथील गणपती दर्शन, महड गणपती दर्शन तसेच पुणे येथे कृषी प्रदर्शनाला भेट देण्यात आली. आधुनिक शेती, तंत्रज्ञान व कृषी विकासाबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
या संपूर्ण सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक व सांस्कृतिक बाबी प्रत्यक्ष पाहून अनुभव घेतला. पर्यावरण संवर्धन, जलप्रणाली, लोकजीवन, प्रदूषण नियंत्रण यांसारख्या विषयांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी आनंदही मनमुराद लुटला.

या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तकातील ज्ञान अधिक व्यापक झाले असून प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी त्यांना मिळाली.शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शिर्के,सहशिक्षक बाबासाहेब जगताप व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहलीचे यशस्वी नियोजन व मार्गदर्शन व नियोजन केले. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे पालक प्रतिनिधी, स्कुल कमिटी,सहल प्रमुख श्री. वाघ सर, श्री जगताप सर, निंबाळकर सर, अवघडे सर तसेच सर्व शिक्षक व महिला शिक्षिका यांनी उत्कृष्ट सहकार्य केले .पालक या सर्वांनी सहलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments