
फलटण प्रतिनिधी :- राज्याच्या ग्रामीण राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत निवडणूक वेळापत्रक घोषित करताच आजपासून संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार जलद हालचाली करत आयोगाने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान निश्चित केले आहे.
यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णतः ‘ऑफलाईन’ असणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेऐवजी प्रत्यक्ष कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागणार असल्याने इच्छुक उमेदवारांची मोठी धावपळ होणार आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झालेली अंतिम मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
असा असेल संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
अर्ज भरण्यास सुरुवात: १६ जानेवारी २०२६
अर्ज भरण्याची अंतिम तारीख: २१ जानेवारी २०२६
अर्ज छाननी: २२ जानेवारी २०२६
अर्ज माघारी घेण्याची अंतिम वेळ: २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
चिन्ह वाटप: २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३.३० वाजता)
मतदान: ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
मतमोजणी व निकाल: ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० वाजता)
ऑफलाईन अर्जामुळे वाढणार चुरस
संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईन असल्याने तांत्रिक अडचणी टळणार असल्या तरी तहसील कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी मोठ्या रांगा लागण्याची शक्यता आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव, छाननी आणि वेळेची मर्यादा यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे.
फलटणमध्ये राजकीय वातावरण तापले
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच फलटण तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय कामांना ब्रेक लागला असून, आता प्रचारयंत्रणा पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.
५ फेब्रुवारीला मतदार कौल देणार आणि ७ फेब्रुवारीला विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे







