Sunday, September 13, 2026
Homeसाताराशहीद जवानाच्या लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी उचलली

शहीद जवानाच्या लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी उचलली


बरड | प्रतिनिधी :- देशसेवेसाठी प्राणांची आहुती देणारे शहीद जवान विकास गावडे यांच्या वीरमरणाने संपूर्ण बरड गावावर शोककळा पसरली आहे. सोमवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक अत्यंत संवेदनशील आणि माणुसकीचा निर्णय घेत गावडे कुटुंबाला मोठा आधार दिला आहे.
शहीद विकास गावडे यांची अवघी दोन वर्षांची चिमुकली मुलगी श्रीशा हिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च स्वतः उचलण्याची जबाबदारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जाहीर केली. अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित असलेल्या जनसागरात शोकाकुल कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावली होती. विशेषतः लहानग्या श्रीशाकडे पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
अजून जगाची ओळखही न झालेल्या या चिमुकलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपल्याची जाणीव होताच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तात्काळ पुढाकार घेत,
“श्रीशाच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ देणार नाही. तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च मी स्वतः करेन,” असा शब्द दिला.
राजकीय नेते अनेकदा केवळ श्रद्धांजली अर्पण करून पुढे जातात, मात्र अशा कठीण प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व क्वचितच पाहायला मिळते. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केवळ शोक व्यक्त न करता, शहीद जवानाच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी ठोस निर्णय घेतल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शहीद जवानांच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळतेच, मात्र त्याही पलीकडे जाऊन लोकप्रतिनिधीने दाखवलेली ही सामाजिक जाणीव समाजासाठी आदर्श ठरत आहे. श्रीशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेला हा निर्णय गावडे कुटुंबाला या दुःखातून सावरण्यास नक्कीच बळ देणारा ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments