Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रवेरूळ लेणीतील सूर्यकिरणोत्सव: सम्यक संबुद्धांच्या तेजाने उजळलेले चैत्यगृह

वेरूळ लेणीतील सूर्यकिरणोत्सव: सम्यक संबुद्धांच्या तेजाने उजळलेले चैत्यगृह

वेरूळ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) | 10 मार्च 2025

तेजस्वी सूर्यकिरणांनी उजळून निघालेली सम्यक संबुद्ध यांची आभा – हा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश-विदेशातून पर्यटक, अभ्यासक, आणि बौद्ध श्रद्धाळू वेरूळच्या दहा क्रमांकाच्या लेणीत एकत्र जमले होते. उत्तरायणातील सूर्यकिरणोत्सवामुळे सम्यक संबुद्धांच्या शिल्पावर पडणारा हा प्रकाशोत्सव प्राचीन स्थापत्यशास्त्र व खगोलशास्त्राच्या अद्भुत मेळाचा साक्षीदार ठरतो.

सूर्यास्ताच्या वेळी तेजःपुंज दर्शन

संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी, उत्तरायणातील मावळतीला जाणाऱ्या सूर्यकिरणांनी मंद प्रकाश असलेल्या चैत्यगृहातील गाभाऱ्यात प्रवेश केला. या किरणांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील प्रलंबपाद अवस्थेतील सम्यक संबुद्ध यांच्या पायांना स्पर्श केला. नंतर हळूहळू ते मुखाच्या दिशेने सरकत गेले आणि ५ वाजून १० मिनिटांनी बुद्धमूर्तीचे तेजस्वी मुख संपूर्ण उजळून गेले. हा सोहळा पाहताना उपस्थित भाविक व अभ्यासक भारावून गेले. अंधारलेल्या पार्श्वभूमीवर सम्यक संबुद्धांचा सोनेरी प्रकाशाने उजळलेला चेहरा पाहताना जणू काही एका तेजाने दुसऱ्या तेजाची भेट घेतली असा भास निर्माण झाला.

शतकानुशतके चालत आलेला नैसर्गिक सोहळा

वेरूळ लेणी समूहातील दहा क्रमांकाची लेणी ही एक ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रीय चमत्कार मानली जाते. प्राचीन काळातील वास्तुविशारदांनी खगोलशास्त्र आणि स्थापत्य यांचा अद्वितीय संगम साधत ही रचना उभारली आहे. हे सूर्यकिरणोत्सवाचे निसर्गनियमावर आधारित सादरीकरण कित्येक शतकांपासून सुरू आहे.

कलाप्रेमी आणि अभ्यासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दरवर्षी १० आणि ११ मार्च रोजी हा सूर्यकिरणोत्सव वेरूळच्या दहा क्रमांकाच्या लेणीत अनुभवता येतो. यावर्षी या विस्मयकारक सोहळ्यासाठी महाराष्ट्र तसेच देशभरातील इतिहास संशोधक, पुरातत्त्व अभ्यासक आणि पर्यटक येथे उपस्थित होते. याशिवाय परदेशी पर्यटकांनीही या अनोख्या नैसर्गिक घटनेचा आनंद घेतला.

पुढील वर्षासाठी तयारी करा!

ज्यांना हा अद्भुत सोहळा प्रत्यक्ष अनुभवायचा आहे त्यांनी पुढील वर्षाच्या १० मार्चची नोंद करून ठेवावी. पुढच्या उत्तरायणात पुन्हा एकदा वेरूळ लेणीतील बुद्ध प्रतिमेच्या तेजाचा हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी आपण भेटूच!

– सूरज रतन जगताप
(लेणी अभ्यासक)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments