Wednesday, October 21, 2026
Homeमहाराष्ट्रराणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! दोन लाखांची सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा;...

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! दोन लाखांची सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा; दोघांना अटक

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! दोन लाखांची सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा; दोघांना अटक

पालखी महामार्गावरील पायलट ढाब्यासमोर झाला होता जीवघेणा हल्ला; पिस्तूल जाम झाल्याने गोळीबाराचा प्रयत्न फसला, हल्ल्यामागील कारणाचा तपास सुरू

बारामती | प्रतिनिधी : पालखी महामार्गावरील पायलट ढाब्यासमोर उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या हल्ल्यासाठी दोन लाख रुपये दिल्याची माहिती तपासादरम्यान समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी पार्थ वासुदेव अवथळे (वय १९) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, रा. भिगवण, ता. इंदापूर) या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पायलट ढाब्यासमोर राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून १९ ऑक्टोबर रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फोटो काढण्याचा बहाणा; थेट पिस्तूल रोखले

राणा सूर्यवंशी हे राणा शिपिंग कंपनीचे मालक असून त्यांच्या कंपनीची महाराष्ट्रासह गोव्यातही कार्यालये आहेत. शेतजमीन पाहण्यासाठी ते बारामती परिसरात आले होते. त्यांच्या आगमनाची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मीकांत सूर्यवंशी आणि त्यांच्या मित्रांनी स्वागताची तयारी केली होती.

दरम्यान, राणा सूर्यवंशी आपल्या ताफ्यासह जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याशी संपर्क साधला. आपण त्यांचे चाहते असल्याचे सांगून त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी एका तरुणाने अचानक पिस्तूल काढून राणा सूर्यवंशी यांच्यावर रोखल्याचे समोर आले आहे.

पिस्तूल जाम झाल्यामुळे गोळी झाडता आली नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राणा सूर्यवंशी यांनी हल्लेखोराच्या हातावर प्रहार केला. त्यामुळे पिस्तूल खाली पडले. त्यानंतर हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत राणा सूर्यवंशी जखमी झाले.

अंगरक्षकाने पकडले; हाताला चावा घेऊन आरोपी फरार

हल्ल्याच्या वेळी राणा सूर्यवंशी यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल अंगरक्षक म्हणून उपस्थित होता. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अंगरक्षकाने एका आरोपीला पकडण्यात यश मिळवले; मात्र त्याने अंगरक्षकाच्या हाताला चावा घेतला आणि तेथून पळ काढला. अंधाराचा फायदा घेत तो शेताच्या दिशेने पसार झाला, तर दुसरा आरोपी दुचाकीवरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. विविध तपास पथकांच्या माध्यमातून संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. पुढील तपासादरम्यान पुणे शहर पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह पार्थ अवथळे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दोन लाख रुपये दिल्याची माहिती तपासात उघड

पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान ज्ञानदेव शिंदे याने हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पार्थ अवथळे आणि ज्ञानदेव शिंदे यांना २० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या कथित आर्थिक व्यवहारामागे नेमके कोणते कारण होते, हल्ल्याचे नियोजन कसे करण्यात आले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

हल्ल्यामागील सूत्रधार कोण? तपासाकडे लक्ष

उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यामागील नेमके कारण काय, दोन लाख रुपये देण्यामागे कोणाचा उद्देश होता आणि या घटनेमागे आणखी कोणी सूत्रधार आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत.

बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. अटकेतील आरोपींच्या चौकशीतून हल्ल्यामागील कारणे आणि संभाव्य सहभागींविषयी आणखी माहिती समोर येते का, याकडे लक्ष लागले आहे.

#राणासूर्यवंशी #बारामती #बारामतीतालुकापोलीस #पालखीमहामार्ग #हल्लाप्रकरण #दोनलाखांचीसुपारी #पुणेग्रामीणपोलीस #गुन्हेगारी #पोलीसतपास #सातारा #पुणे #SahasTimes #साहसTimes

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments