
Pavan Guntupalli Success Story: यशस्वी माणसाला करिअरमध्ये पुढे जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागलेले असते. या संघर्षमयी काळात प्रयत्नांची कास न सोडता दुप्पट वेगाने लक्ष्याची पाठलाग करणारे यशाच्या शिखरावर पोहोचतात. पवन गुंटुपल्लीची कहाणी अशीच संघर्षमयी आहे. यातून लाखो तरुणांना प्रेरणा मिळतेय.कधीकाळी त्यांना कोणी नोकरी देत नव्हते पण त्यांना आपल्या स्वप्नांवर विश्वास होता. यातूनच ते आज मोठ्या कंपनीचे मालक बनले आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
पवन गुंटुपल्ली हे आयआयटी पदवीधर असूनही त्यांना अनेकवेळा निराशेचा सामना करावा लागला. असे असले तरी त्यांनी कधीही आशा सोडली नाही. स्वतःवर विश्वास ठेवला. पवन यांच्याकडे व्यवसायाची एक कल्पना होती. जी त्यांनी 75 हून अधिक गुंतवणूकदारांना सांगितली. पण त्यांच्या कल्पनेवर विश्वास ठेवण्यास कोणता गुंतवणूकदार तयार नव्हता. या काळात त्यांना अनेकदा नैराश्येचा सामना करावा लागला पण पवन यांनी कधीही हार मानली नाही. परिणामी आज ते व्यावसायिक जगात एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व बनले आहेत. पवन यांनी ‘रॅपिडो’ कंपनी तयार केली आज या कंपनीचे मूल्य 6 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पवन यांचा प्रवास व्यवसाय जगात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्त्रोत बनलाय.
लहानपणापासूनच कॉम्प्यूटर प्रोग्रामिंगमध्ये रस
पवन हे तेलंगणातील गुंटुपल्लीचा रहिवासी आहेत. त्यांना लहानपणापासूनच ट्रेडिंग आणि संगणक प्रोग्रामिंगची आवड होती. पवन अभ्यासात हुशार होते म्हणून त्यांना आयआयटी खरगपूरमध्ये जागा मिळाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सॅमसंगमध्ये काम केले. पवन तिथल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीममध्ये होते. असे असले तरी त्यांना नेहमीच काहीतरी वेगळे करण्याची तीव्र इच्छा असे. त्यांनी त्यांचा मित्र अरविंद संकासोबत ‘द करिअर’ ही स्टार्टअप कंपनी सुरू केली.
अशी झाली रॅपिडोची सुरुवात
दुर्दैवाने ‘द करिअर’ व्यवसाय यशस्वी झाला नाही आणि दोघांनाही अडचणींना तोंड द्यावे लागले. तरीही पवन यांनी जिद्द ठेवली आणि त्यांच्या अपयशाचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला. कंपनीला नफा मिळवायचा असेल तर खर्च कमी करावा लागेल आणि ग्राहकांशी थेट संवाद साधावा लागेल, या निष्कर्षापर्यंत ते पोहोचले. मग त्यांना बाईक टॅक्सीची कल्पना सुचली आणि 2014 मध्ये रॅपिडोची स्थापना झाली. हा व्यवसाय सुरू करणे देखील सोपे नव्हते. कारण 75 हून अधिक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यास नकार दिला होता. पण तरीही पवन यांनी कंपनी स्थापन केली. हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. कारण त्यांच्यासमोर ओला आणि उबर सारख्या कंपन्या स्पर्धक म्हणून होत्या. ज्या आधीच बाजारात प्रस्थापित होत्या.
काय ठरला टर्निंग पॉइंट?
बाईक टॅक्सी सेवेचे मूळ भाडे 15 रुपये ठेवण्याच्या धोरणाचा वापर करून, पवन यांनी ग्राहकांकडून प्रति किलोमीटर ३ रुपये आकारले. सुरुवातीला रॅपिडोला फारसे यश मिळाले नाही. पण दृढनिश्चयी राहून त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. 2016 मध्ये रॅपिडो स्टार्टअपला हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पवन मुंजाल यांच्याकडून पहिला निधी मिळाला. ही गुंतवणूक कंपनीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचा आणि ग्राहकांचा विश्वास मिळाला. हळुहळू रॅपिडोने अधिक निधी उभारला आणि 100 हून अधिक शहरांमध्ये त्यांच्या सेवांचा विस्तार वेगाने केला. कंपनीने कार सेवा कमी असलेल्या आव्हानात्मक पर्वतीय प्रदेशांमध्ये आपली सेवा उपलब्ध करुन दिली.
रॅपिडोचे बाजार मूल्य
ट्रॅक्सनने दिलेल्या माहितीनुसार रॅपिडो कंपनीचे 7 कोटीहून अधिक यूजर्स, 50 हजार ड्रायव्हर्स आहेत. रॅपिडो कंपनीची किंमत 825 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच साधारण 6 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.