Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रशिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: शिल्पकार जयदीप आपटे व डॉ. चेतन पाटील १०...

शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: शिल्पकार जयदीप आपटे व डॉ. चेतन पाटील १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत

मालवण :राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी दोन्ही आरोपींना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

सरकारी वकील अॅड. तुषार भणगे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, जयदीप आपटे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते आणि पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली आहे. त्यांनी असेही नमूद केले की, पुतळा उभारणीच्या कामाचे टेंडर कसे मिळाले, त्याची प्रक्रिया काय होती, याचा तपास अजून शिल्लक आहे. तसेच, या प्रकरणात आपटे आणि पाटील यांचा खरा उद्देश समोर येणे गरजेचे आहे, म्हणूनच पोलीस कोठडीची मागणी करण्यात येत आहे.

तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याचे सांगत, अॅड. भणगे यांनी न्यायालयाला माहिती दिली की, दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करण्याची गरज आहे. पुतळा बनवताना कोणकोण सहभागी होते, पुतळ्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य कुठून आले आणि त्याचा दर्जा काय होता, याचाही तपास होणे बाकी आहे.

दुसरीकडे, आपटे यांच्या वतीने बा हीजू मांडताना अॅड. गणेश सोहनी यांनी सांगितले की, या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते, त्यामुळे नौदलासह अन्य यंत्रणांनी या कामाची तपासणी केली होती. यानंतरच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानुसार, शारीरिक दुखापतीसंदर्भातील कलमे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आली आहेत. कुणालाही दुखापत होईल असा हेतू नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, अॅड. सोहनी यांनी या प्रकरणात सरकारी विभागातील सिव्हिल इंजिनियरकडून केलेल्या आरोपांवरून अवघ्या दहा तासांत गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सांगितले. धातू शास्त्राचे कोणतेही ज्ञान नसताना केलेल्या आरोपांवर आधारित ही तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणात घाईघाईने निर्णय घेतला गेला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर, न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. डॉ. पाटील यांच्या वकिलांची गैरहजेरीमुळे त्यांची बाजू लेखी स्वरूपात मांडण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments