दहिवडी (जि. सातारा) – सातारा जिल्ह्यातील गोंदवले खुर्द येथील 28 वर्षीय सूरज सुनील शिलवंत याने सावकारांच्या चक्रवाढ व्याजाच्या तणावामुळे आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गोंदवले खुर्दसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शिलवंतच्या आत्महत्येच्या निषेधार्थ, त्याच्या कुटुंबियांनी आणि विद्रोही सामाजिक संघटनेच्या आह्वानावरून दहिवडी येथे एक मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला.
या निषेध मोर्चात आझाद समाज पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष व कामगार संघर्ष संघटनेचे संस्थापक सनी घनश्याम काकडे यांनी भाषण केले. काकडे यांनी शिलवंतच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सावकारांच्या अन्यायकारक वागणुकीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. तसेच, त्यांनी सरकारकडे सावकारांच्या चक्रवाढ व्याजाविरोधात कठोर कायदे करण्याची मागणी केली, जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा.
सामाजिक संघटनांनीही सावकारांच्या विरोधात ठोस कारवाईची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे, शिलवंतच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.