
फलटण प्रतिनिधी :- आगामी सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शिवसेनेच्या वतीने स्वबळावरच लढविण्याचा ठाम निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना. एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. “जिल्ह्यात शिवसेनेची खरी ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी स्थानिक नेतृत्वाला सज्ज राहण्याच्या ठोस सूचना केल्या.
सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर पार पडलेल्या बैठकीत ना. एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री ना. शंभूराज देसाई आणि ना. भरत गोगावले उपस्थित होते. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा रणसंग्राम पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीत संघटन मजबूत करणे, गावोगावी शिवसेना पोहोचवणे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देणे याबाबत ठोस राजकीय रणनीती ठरवण्यात आली. जिल्ह्यातील शिवसैनिकांनी एकजुटीने आणि जोमाने कामाला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या निर्णायक चर्चेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, जिल्हा समन्वयक विराज खराडे, तालुका प्रमुख नानासो इवरे, ज्ञानेश्वर पवार, अमोल निंबाळकर, अॅड. संदीप कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








