
दृष्टिहीनांनी याचक बनून दुसऱ्याच्या उपकारावर जगण्यापेक्षा स्वयंसिद्ध होऊन स्वकर्तृत्वावर आयुष्य घडवण्याचं बीज पेरणारी, त्यासाठी ‘जागृती अंध शाळा’ सुरू करणारी सकिना. या मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी तिने ब्रेल प्रेस, संगणक प्रशिक्षण केंद्र, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र असे उपक्रम सुरू केले. विंदा करंदीकरांच्या ‘या जीवनाने जे दिले, जन्मात ते मावेचना’ या काव्यपंक्तीप्रमाणे सकिना बेदीच्या या जगण्याविषयी… नुकत्याच झालेल्या ‘राष्ट्रीय अपंगत्व स्वातंत्र्य दिना’निमित्ताने.
माझ्या घरामागील आऊटहाऊसमध्ये गरजू, गुणवंत मुलींच्या शिक्षणाची आणि राहण्या-जेवण्याची सोय होत असे. एक दिवस सकाळी फोन आला, “मी सकिना बोलतेय, माझ्या मुलींना तुमच्या इथं शिकायला ठेवून घ्याल का? उद्या नऊच्या सुमारास भेटते.” तिच्या स्वरातील गोडवा आणि मार्दव यामुळे मी पटकन ‘हो’ म्हणून गेले.
सकिना, डोळ्यावर गॉगल, हातात पर्स, अंगात छानसा सलवार-खमिस अशा वेशात आली. मी विचारलं, “मुली कुठं आहेत?” सकिना म्हणाली, “आज मुलींचे आमच्या ‘जागृती अंध शाळे’त व्यवसाय प्रशिक्षण चाललं आहे म्हणून म्हटलं आधी तुम्हाला भेटून घेऊ.” मग एकदम प्रकाश पडला. ही तर आळंदीच्या ‘जागृती अंध शाळे’तील मुलींची ‘सकिनाताई’! तिच्या मुली म्हणजे अंधशाळेतल्या विद्यार्थिनी! सकिना स्वत: दृष्टिहीन होती आणि दृष्टिहीन मुलींना स्वावलंबी, सुशिक्षित, सुविचारी बनवण्यासाठी झटत होती. आज तिच्या शाळेत दृष्टिहीन १७१ मुली असून सर्व जातिधर्माच्या मुली तिथे आनंदाने राहत आहेत.
प्रसन्न चेहऱ्याच्या सकिनाने लगेचच मुद्द्याला हात घातला. म्हणाली, “दहावीचे निकाल लागलेत. शाळेतल्या तीन-चार हुशार मुलींना तुमच्या इथून जवळच असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला आहे. आमची निवासी शाळा दहावीपर्यंतच आहे. त्यांची राहण्याची-जेवण्याची सोय तुम्ही करू शकलात तर त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी सोयीचे होईल. दृष्टिहीन मुलींची जबाबदारी घेण्यात काय अडचणी येऊ शकतात याची थोडी-फार जाणीव मला लगेचच झाली. तोंडावर ‘नाही’ म्हणण्यापेक्षा मी एक-दोन दिवसांत कळवीन असं गुळमुळीत उत्तर दिलं. सकिनाला माझ्या बोलण्यातला अस्पष्ट नकार समजला असणार. ती म्हणाली, “मी मुलींना उद्या घेऊन येते, मग तुम्ही काय ते ठरवा.”
सकिनाच्या त्या तीन मुली दुसऱ्याच दिवशी आपापल्या महाविद्यालयामधून पांढरी काठी रस्त्यावर टकटक करत भर रहदारीतून, एकेकट्या वाट काढत हजर झाल्या. १६-१७ वर्षांच्या, नीटनेटके कपडे घालून, पाठीवर बॅकपॅक घेतलेल्या या मुलींनी आल्याआल्याच हसतमुखानं ‘नमस्ते’ म्हणत नमस्कार केला. प्रत्येकीनं स्वत:ची ओळख करून देत, पुढं काय करायची इच्छा आहे ते सांगितलं. त्यांचं विनयशील वागणं-बोलणं, आत्मविश्वास हे सगळंच लोभस होतं. त्यांच्या देहबोलीतून आपण आता उच्चशिक्षणाच्या वाटेवर आहोत याचा आनंद आणि वाणीतून उज्ज्वल भविष्याची आशा डोकावत होती. एव्हाना माझ्यातला विरोध विरघळायला लागला होता. एवढ्यात सकिना आली. म्हणाली, “तुम्ही ‘हो’ म्हणालात तर मुली आजपासून इथं राहतील, महाविद्यालय सुरू व्हायच्या आधी परिसराची माहिती करून घेतील.” मी म्हटलं, “मला जरा सध्या ज्या मुली इथं राहताहेत त्यांच्याशी बोलू दे.” मी चहा करून आणेपर्यंत नव्या-जुन्या मुली हसत खेळत एकमेकींत सहज मिसळल्या. पुढे जाऊन एकत्र राहायला लागून लवकरच रुळल्या.
आधीच्या डोळस मुली आता या दृष्टिहीन मुलींची काळजी घेऊ लागल्या. बाकीच्या मुली आपलं जेवणखाण स्वत: करायच्या. पण अंध मुलींसाठी मी डबा सुरू केला. दोन दिवसांनी त्या मुलींनीच डबा बंद करायला सांगितला आणि त्या स्वत:चा स्वयंपाक करू लागल्या. गोल पातळ लाटलेले फुलके तर पाहत राहावे असे. त्यांनी केलेल्या कांदे-बटाटे-टोमॅटो रश्श्याचा खमंग वास तर सगळीकडे दरवळत असे. छान तयार होऊन त्या महाविद्यालयामध्ये जाऊ लागल्या की आजूबाजूचे लोकही कौतुकानं पाहत राहायचे. ‘फर्ग्युसन महाविद्यालया’मध्ये जाणारी एक दृष्टिहीन मुलगी चांगली हुशार असूनही तिला परीक्षेत कमी गुण मिळाले. मुलांबरोबरचं फिरणं वाढल्यामुळे हे झालंय हे सकिनानं बरोबर ओळखलं, तेव्हा मात्र तिने माझ्यादेखत तिची चांगलीच कानउघाडणी केली. पुनश्च ती वेळ आली नाही. त्या सगळ्यांनीच आपापली वाटचाल उत्तम सुरू ठेवली. पदवीधर, द्विपदवीधर होऊन स्पर्धा परीक्षाही त्या उत्तीर्ण झाल्या. काही आज राष्ट्रीयीकृत बँकेत, शासकीय कार्यालयात अधिकारी पदावर काम करत आहेत. योग्य जोडीदार निवडून संसार समर्थपणे सांभाळत असताना ‘जागृती अंध शाळे’ला हरप्रकारे मदतही करत आहेत.
स्वत: त्या अनुभवातून जात असल्यामुळे दृष्टिहीन मुलींना समजून घेणं, योग्य प्रकारे समजावून सांगणं, आवश्यक तेव्हा समज देणं हे सर्व सकिना कुशलतेनं आणि आपलेपणानं करते. अनेक दृष्टिहीन मुलींचं प्रेरणास्थान असलेल्या सकिनाला स्वत:ला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं ते समजून घेताना मी अधिक डोळस आणि समृद्ध झाले.
सकिना सार्जन. दाउदी बोहरा कुटुंबात जन्मली. दोन भावांपैकी एकाला थोडा दृष्टिदोष होता. सकिना जन्मत:च पूर्णपणे अंध होती. वडील आईला म्हणाले, “आपण पालक म्हणून अधिक समर्थ असू म्हणूनच आपल्याकडे देवानं जन्मांध मुलगी पाठवली आहे. आपण तिचे ‘प्रज्ञाचक्षू’ सक्षम करू.” सकिना पाच वर्षांची झाल्यावर तिला मुंबईच्या दृष्टिहीन मुलांच्या निवासी शाळेत शिशुवर्गात दाखल केलं. मात्र वसतिगृहातील गैरव्यवस्था, गोवर-कांजिण्यासारखे होणारे संसर्गजन्य रोग यामुळे पिडलेल्या सकिनाला वडिलांनी वर्षभरातच पुण्याला परत आणलं. सकिना म्हणते, “तिथल्या वास्तव्यामुळे माझ्या मनावर वसतिगृह कसं नसावं हे बालपणीच पक्क बिंबलं. त्याचा उपयोग पुढे ‘जागृती अंध शाळे’चं वसतिगृह उभारताना झाला.”
पुण्यात दृष्टिहीन मुलग्यांसाठी कोरेगाव पार्क इथे आणि मुलींची कोथरूडला शाळा आहे. कोथरूड लांब पडेल म्हणून वडिलांनी तिला मुलांच्या शाळेत घातलं. त्या शाळेत ती एकटीच मुलगी होती. तिथे ती ब्रेल लिपी लिहिण्यात-वाचण्यात पारंगत झाली. अधूनमधून दानशूर व्यक्ती शाळेला भेट द्यायला यायच्या. मग मुलांना रांगेत उभे करून आलेले पाहुणे प्रत्येक मुलाच्या हातात खाऊ, भेटवस्तू तर कधी कधी रुपयाची नोटसुद्धा द्यायचे. हे देताना त्यांच्या बोलण्यातून मुलांविषयीची दयाबुद्धी, सहानभूती जाणवायची. सकिनाला ते बिलकुल आवडायचं नाही, ती कुठं तरी लपून बसायची. दृष्टिहीनांनी याचक बनून दुसऱ्याच्या उपकारावर जगण्यापेक्षा स्वयंसिद्ध होऊन स्वकर्तृत्वावर आयुष्य घडवावं या तिच्या मनोधारणेचं बीज इथंच पेरलं गेलं. पुढे जाऊन याच विचारसरणीतून तिने स्वत:ला आणि इतर अनेक दृष्टिहीन मुलींना घडवलं.
सकिना बुद्धिमान आहे हे तिच्या वडिलांच्या लक्षात आलं होतं आणि त्यांनी तिला ‘कॅम्प एज्युकेशन सोसायटी’च्या सर्वसाधारण मुलामुलींच्या शाळेत घातलं. सकिना ब्रेल लिपीतील वह्या-पुस्तकांची भली मोठी बॅग सावरत शाळेत इतर मुलांच्या बरोबरीनं अभ्यास करत असे. एक हुशार विद्यार्थी म्हणून ती अभ्यासात आणि विविध आंतरशालेय स्पर्धांतून चमकली. वक्तृत्व स्पर्धेत तर तिने अनेक चषक शाळेसाठी जिंकून आणले. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, अजिंठा-वेरुळची लेणी यांसारख्या अनेक ठिकाणांच्या सहली तिने केल्या. ‘वाडिया महाविद्यालया’मधून पदवी घेतल्यावर मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ या मान्यवर संस्थेमध्ये समाजशास्त्रातील पुढील शिक्षण घ्यायचं तिने नक्की होतं. त्यांच्या प्रवेश परीक्षेत अव्वल गुणांनी उत्तीर्ण होऊन तेथील वसतिगृहात सकिना राहायला गेली. तिथं इतर मुलींबरोबर प्रयत्नपूर्वक इंग्लिशमध्ये बोलून तिने त्या भाषेत बोलण्याचा चांगला सराव केला. अभ्यासक्रमांतर्गत प्रत्यक्ष अनुभवासाठी सकिनाला ठाण्याचं मनोरुग्णालय, धारावी झोपडपट्टी इथं पाठवण्यात आलं. तिथलं दु:ख, दारिद्र्य, असहायता तिला जाणवत होती. पण ‘टाटा मेमोरिअल रुग्णालया’मध्ये कार्यानुभव घेताना मुलांच्या कर्करोग प्रभागामधले लहानग्या जीवांचे भोग तिला कमालीचे अस्वस्थ करून गेले आणि तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलून गेला. अंधत्वाचा बाऊ करून स्वत:ला कुरवाळत बसण्यापेक्षा वंचित, दुर्बलांसाठीच्या कार्यात सक्रिय सहभागी असलं पाहिजे ही तळमळ निर्माण झाली. समाजाभिमुख नवी जीवनदृष्टी घेऊन आणि अव्वल श्रेणीत समाजशास्त्राची पदवीधर होऊन सकिना पुण्याला परत आली.
तिने मग सामाजिक संस्थांतून काम करायला सुरुवात केली. याच काळात कामानिमित्त तिची संदीप बेदी या काही प्रमाणात दृष्टिहीन असलेल्या, कुशाग्र बुद्धीच्या मुक्त पत्रकारिता करणाऱ्या तरुणाशी ओळख झाली. पुढे त्याचं प्रेमात आणि विवाहात रूपांतर झालं. संदीप सिंधी होता. सकिना सिंधी भाषा बोलायला शिकली. संदीपचा ‘इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग’चा व्यवसाय होता. त्याने सकिनालाही त्याविषयी प्रशिक्षण दिलं आणि ‘इंटेलेक्चुअल ॲसेट मॅनेजमेंट’ या नावानं दोघांनी भागीदारीत कंपनी सुरू केली. ती चांगली मोठी झाली, आर्थिक स्थैर्य आलं. पुढे सकिनाला सुदृढ, अव्यंग मुलगी झाली, अनमोल. आता अनमोल सीए झाली. तिचा पती चंद्रप्रकाश हाही सीए आहे. त्यांची स्वत:ची लेखापरीक्षणाची कंपनी आहे.
प्रापंचिक वाटचाल सुरळीत सुरू होती, तरी सकिनाला सामाजिक कार्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. पाचोऱ्याच्या एका गरीब शेतकऱ्याच्या दृष्टिहीन मुलीला ‘जागृती अंध शाळे’त प्रवेश मिळवून देताना सकिनाच्या लक्षातं आलं की ही शाळा चालवणाऱ्या ‘राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र’ यांच्या सहयोगानं काम केलं तर आपल्याला गरजू दृष्टिहीन मुलींच्या सबलीकरणासाठी निश्चित मदत करता येईल. ती या संस्थेची प्रमुख प्रवर्तक बनली. निधी संकलनासाठी भरपूर परिश्रम घेतले. प्रत्यक्ष उभं असलेलं काम पाहून अनेक हितचिंतक संस्थेशी जोडले गेले. यासाठी संदीपची साथ तिला नेहमीच लाभली. करोना साथीच्या पहिल्या लाटेत संदीपचं निधन झालं. सकिना म्हणते, “माझे वडील आणि संदीप यांनी मला खऱ्या अर्थानं जो आधार दिला, तो आयुष्यभर पुरून उरणारा आहे.”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ब्रेल प्रेस, संगणक प्रशिक्षण केंद्र, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र असे एकापाठोपाठ एक नवे उपक्रम सुरू झाले. शाळेच्या इमारतीत चांगल्या स्वच्छतागृहापासून अनेक आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. संस्थेला मिळालेल्या दोन एकर उजाड गायरान जमिनीचा कायापालट होऊन तिथं सर्व दृष्टीने दृष्टिहीन मुलींना सोयीचं वसतिगृह लवकरच पूर्णत्वास येत आहे. दरवर्षी २६ जुलै रोजी अपंग व्यक्तींना त्यांचे हक्क मिळवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘राष्ट्रीय अपंगत्व स्वातंत्र्य दिन’ दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सकिनाने केलेल्या कामाचा आढावा महत्त्वाचाच.
आपण दृष्टिहीन म्हणून जन्माला आलो याबद्दलचा कडवटपणा, नाराजी किंवा तक्रारीचा सूर तिच्या वागण्या-बोलण्यात अजिबात दिसत नाही. उलटपक्षी ‘या जीवनाने जे दिले, जन्मात ते मावेचना’ या विंदांच्या काव्यपंक्तीप्रमाणे तिच्यामध्ये एक आंतरिक तृप्ती आहे. ‘माणुसकी’ हा एकच धर्म सकिना मानते आणि अनुसरते!
jayakale99@gmail.com