भारतीय बौद्ध महासभेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या तथा माजी तालुका संघटक सौ. शिला सूर्यकांत काकडे यांचे दुःखद निधन

0
2
भारतीय बौद्ध महासभेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या तथा माजी तालुका संघटक सौ. शिला सूर्यकांत काकडे यांचे दुःखद निधन

भारतीय बौद्ध महासभेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या तथा माजी तालुका संघटक सौ. शिला सूर्यकांत काकडे यांचे दुःखद निधन

फलटण, दि. २८ जून : भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेच्या माजी तालुका संघटक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, आदर्श शिक्षिका व मुख्याध्यापिका सौ. शिला सूर्यकांत काकडे यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध धम्म चळवळ, शैक्षणिक क्षेत्र तसेच सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
सौ. काकडे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विडणी येथे झाले. इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शासकीय अध्यापक विद्यालय, फलटण येथून डी.एड. शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दि. २२ सप्टेंबर १९८२ रोजी त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरद येथे शिक्षक म्हणून सेवेला प्रारंभ केला.
त्या उपक्रमशील, प्रयोगशील, विद्यार्थीप्रिय आणि कर्तव्यदक्ष शिक्षिका म्हणून सर्वत्र परिचित होत्या. पिंपरद येथे बारा वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांची विडणी केंद्रातील विद्यानगर (विडणी) शाळेत बदली झाली. त्यानंतर पुन्हा त्यांची बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरद येथे झाली. याच शाळेवर त्यांची पदोन्नतीने मुख्याध्यापिका म्हणून नियुक्ती झाली. आपल्या कार्यकौशल्य, शिस्तप्रियता, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यामुळे त्यांनी आदर्श मुख्याध्यापिका म्हणून लौकिक मिळविला.
यानंतर त्यांची बदली खंडाळा तालुक्यातील खेड येथे झाली. तेथेही त्यांनी कोणत्याही अडचणींना न घाबरता उत्कृष्ट शैक्षणिक व प्रशासकीय कार्य करून आपला वेगळा ठसा उमटविला. पुढे त्या फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील शाळेत रुजू झाल्या. तेथेही त्यांनी आपल्या कार्यक्षमतेने, विद्यार्थीहिताच्या विविध उपक्रमांनी आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या जपणुकीने सर्वांची मने जिंकली.
दि. ३१ मे २०१९ रोजी तब्बल ३६ वर्षे ८ महिने इतकी प्रदीर्घ, निस्वार्थ आणि आदर्श सेवा पूर्ण करून त्या सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपला संपूर्ण वेळ धम्मकार्य आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित केला.

भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांनी धम्माचा प्रचार-प्रसार, संघटन बळकटीकरण, महिलांचे प्रबोधन, सामाजिक परिवर्तन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेच्या तालुका संघटक म्हणून त्यांनी निष्ठेने जबाबदारी पार पाडली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक धम्मकार्ये, सामाजिक उपक्रम, प्रबोधनपर कार्यक्रम आणि संघटनात्मक कार्य यशस्वीपणे पार पडले.

त्या अत्यंत निष्ठावान, मनमिळावू, कर्तव्यपरायण, संयमी आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांच्या परिचयाच्या होत्या. शिक्षण, समाजकारण आणि धम्मकार्य या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षकवर्ग, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

कालकथित शीला सूर्यकांत काकडे यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी विविध मान्यवरांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.

भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी काकडे मॅडम यांच्या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्याचा गौरव करत त्यांच्या निधनाने धम्म चळवळीची मोठी हानी झाल्याचे सांगितले. तथागत भगवान बुद्धांच्या अनित्यतेच्या तत्त्वाची आठवण करून देत त्यांनी कुटुंबीयांनी त्यांच्या स्मृती जपाव्यात तसेच त्यांच्या नावाने वृक्षारोपण करून त्यांचे कार्य चिरंतन ठेवावे, असे आवाहन केले.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. रामचंद्र मोरे यांनी बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार विधी पार पाडला. त्यांनी काकडे मॅडम यांच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याचा, धम्मप्रसारातील योगदानाचा व विज्ञाननिष्ठ, कर्मकांडविरहित जीवनदृष्टिकोनाचा गौरव करत त्यांना विनम्र आदरांजली अर्पण केली.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष भीमराव लोंढे यांनी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व धम्मकार्याचे स्मरण करून त्यांच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली.
श. ज्ञा. कांबळे गुरुजी यांनी काकडे परिवाराशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या आठवणींना उजाळा देत भावुक वातावरणात आदरांजली वाहिली. त्यांनी काकडे मॅडम यांच्याशी असलेले बहिण भावाचे नातं सांगत त्यांच्या कुटुंबाशी जपलेला स्नेह सांगितला. तसेच राजेंद्र काकडे यांनी त्यांच्या विज्ञानवादी, अंधश्रद्धामुक्त व कर्मकांडविरहित जीवनविचारांचा गौरव करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना उजाळा दिला. त्यांच्या व्यक्तिमत्व बद्दल बोलताना अतिशय उदार मनाच्या व निस्वार्थी मनाच्या असल्याची भावना व्यक्त केली. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून धम्मकार्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान याविषयी ही त्यांनी भाष्य केले.

त्यांच्या पश्चात 4 मुली व 1 मुलगा व कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी, विद्यार्थी आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असून, त्यांचे कार्य, विचार आणि समाजाप्रती असलेली निष्ठा भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.