फलटण :- फलटण-दहिवडी मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा आता राजकीय पातळीवर गेला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
कोळकी ते दुधेभावी या मार्गावरील शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता काम सुरू झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. संबंधित विभागाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ही कारवाई केल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे.
याबाबत काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्या अनुषंगाने आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सविस्तर माहिती दिली आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश दिले.
रामराजे यांनी स्पष्ट केले की, “मी लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीला बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.