Saturday, August 15, 2026
Homeब्लॉगशिल्पकलेतून कलाकाराच्या स्थितप्रज्ञतेचा साक्षात्कार…!

शिल्पकलेतून कलाकाराच्या स्थितप्रज्ञतेचा साक्षात्कार…!

सम्यक संबुध्दांना नेहमीच आपण बोध्दी वृक्षा खाली ध्यानस्थ अवस्थेत पाहीले आहे. अनेक शिल्पातून त्यांना तसे अंकित केले आहे पण मुंबईच्या बोरीवली कान्हेरी लेणीत एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे.
सम्यक संबुध्द इथे चक्क आम्र वृक्षाखाली ध्यानस्थ आहेत हे शिल्प एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण शिल्प कान्हेरी लेणीतील आहे , सम्यक संबुध्द इथे मंचकावर प्रलंबपाद अवस्थेत असून धम्म चक्र प्रवर्तन मुद्रेत बसलेले आहेत, बोद्धीसत्व पद्मपाणी आणि वज्रपाणी आपल्या शास्त्याच्या सेवेत चवरीधारी सेवेकरांच्या भूमिकेत आहेत. सम्यक संबुध्द व दोन्ही बोद्धीसत्व प्रभावलययुक्त स्थितप्रज्ञ तसेच चेहर्‍यावरील सात्विक भाव अचूकपणे दाखवण्यात आले आहेत.
सम्यक संबुध्दांचे पाय ज्या कमल पुष्पावर आहेत त्या कमल पुष्पाच्या देठाला इथल्या या भूमीच्या भूमिपुत्रांनी आपल्या शिरोधारी नागफणी अभिमानास्पदपणे मिरवणाऱ्या नाग राज्यांनी सपत्नीक आधारलेले आहे. आम्र वृक्षाला लगडलेली फळे त्यांचे गुच्छे ती फळे चाखण्यासाठी आलेला माकड आणि पोपट हे सारेच अफलातून सादरीकरण आहे तसेच सम्यक संबुध्दांच्या स्वागतासाठी झर झर आकाशातून ढांगाच्यावर स्वार होऊन हवेतून एक यक्ष हाती पुषमाला घेऊन येत आहे तर दुसऱ्याच्या हाती फुलांची परडी आहे , कलाकाराची कल्पकता पहा हे यक्ष गतीमान आहेत हे दाखवण्यासाठी हवेतून उडत येत आहेत ही गतीमानता प्राप्त करून देण्यासाठी हा आभास निर्माण होण्यासाठी यक्षांच्या कमरेचा नेसूचे टोक हवेत लयबद्ध उडवून त्यांनी या शिल्पाला गतिशीलता प्राप्त करून दिली आहे , ही सर्व कलात्मकता सादर करणारा कलाकार नक्कीच सम्यक संबुध्दांचा अनुयायीत्व स्वीकारलेला असणार आपल्या कले बाबतची बीदागी त्याला मिळाली असणार पण आपले इच्छित साधण्यासाठी त्याने बौध्दत्व स्वीकारलेला हा कलाकार असणार यात शंका नाही त्याने आपली निपुणता कलेवाटे सादर तर केली आहेच पण संपूर्ण कलाकृती तयार करताना सादर करताना मनाची जी निश्चयता दृढता एकाग्रता स्थिरता हवी आहे ती या कलाकाराने गाठलेली आहे.
च्छन्नी हातोड्याचे प्रत्येक संयमित घाव संतुलित घाव त्याच्या स्थितप्रज्ञतेचा साक्षात्कार घडवून देतो म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. मला तर तो माशाला पकडणार्‍या डोहातील एका पायावर उभा असलेल्या बगळ्या समान भासतो किंवा त्याही पलिकडे जाऊन म्हणेन तो एका तपलेल्या ध्यानस्थ तपस्वी समान भासतो कारण आपल्या कलेतून तो तेवढा निश्चयी आजही भासतो भेटतो, एक असंतुलित घाव आणि संपूर्ण कलाकृती मातीमोल करण्यास कारणीभूत ठरू शकते त्यामुळेच या महान कलाकाराला माझे त्रिवार वंदन आणि पंचांगप्रणाम…..🙏🏻

सूरज रतन जगताप

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments