रामराजेंच्या शिष्टाईला यश; कामगारांच्या खात्यात जमा होणार ७३ टक्के पीएफ

0
7
रामराजेंच्या शिष्टाईला यश; कामगारांच्या खात्यात जमा होणार ७३ टक्के पीएफ

साखरवाडी :साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कामगारांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) प्रश्न अखेर सुटला असून, सेवानिवृत्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे सर्वोच्च न्यायालय व पीएफ कमिशनर यांच्या निर्देशानुसार उर्वरित ७३ टक्के रक्कम लवकरच थेट कामगारांच्या खात्यावर जमा होणार आहे.

२०१७-१८ मध्ये आर्थिक अडचणींमुळे न्यू फलटण शुगर वर्क्स कारखाना बंद पडल्यानंतर २०१९ मध्ये श्री दत्त इंडिया कंपनीने तो विकत घेतला होता. तेव्हापासून कामगारांचा पीएफ प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत होता. मागील वर्षी २७ टक्के रक्कम कामगारांना मिळाली होती, मात्र उर्वरित ७३ टक्के रक्कम थकित होती.

हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयात फलटण तालुका साखर कामगार युनियन, सेवानिवृत्त कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली. या चर्चेनंतर थकबाकीची रक्कम थेट कामगारांच्या खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला संचालक जितेंद्र धारू, चेतन धारू, प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप, चीफ अकाउंटंट अमोल शिंदे, युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, राजेंद्र गायकवाड, पोपट भोसले, पै. संतोष भोसले, संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, उद्योजक संजय भोसले तसेच सेवानिवृत्त कामगार व राजे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा होताच उपस्थित सेवानिवृत्त कामगारांनी आमदार नाईक निंबाळकर यांचा सत्कार करून आनंद व्यक्त केला.