Tuesday, August 11, 2026
HomeफलटणNEET पेपरफुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी फलटणमध्ये २० जुलै रोजी धरणे आंदोलन; परवानगीसाठी...

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी फलटणमध्ये २० जुलै रोजी धरणे आंदोलन; परवानगीसाठी तहसीलदारांना निवेदन

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी फलटणमध्ये २० जुलै रोजी धरणे आंदोलन; परवानगीसाठी तहसीलदारांना निवेदन

फलटण | प्रतिनिधी :- देशातील शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात आवाज उठविणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शवत फलटणमधील सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांनी निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय, फलटण यांना निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे दि. २० जुलै २०२६ रोजी फलटण येथे शांततापूर्ण एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात NEET तसेच इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा यासाठी पारदर्शक, जबाबदार आणि भ्रष्टाचारमुक्त परीक्षा व्यवस्था उभारणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये NEET व इतर स्पर्धा परीक्षांतील कथित पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, शिक्षण व्यवस्थेतील आवश्यक सुधारणा, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि राजकीय हस्तक्षेपमुक्त शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

प्रस्तावित धरणे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन केले जाईल, अशी ग्वाही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिली.

यावेळी सतीश गाढवे, कालिदास चोरमले, राजेंद्र भिसे, अमोल रासकर, नानासो गोवेकर, अक्षय चोपडे, यश चांगण, वैभव नरुटे, नितीन सुळ यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या गंभीर प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि २० जुलै रोजीच्या शांततापूर्ण धरणे आंदोलनास आवश्यक परवानगी द्यावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments