



मुंबई: जागतिक पातळीवरील दोलायमान परिस्थितीमुळे देशांतर्गत भांडवली बाजारातील समभागांचे मूल्यांकन सध्या आकर्षक बनले आहे. या स्थितीत म्युच्युअल फंडातील शिस्तशीर गुंतवणुकीचा पर्याय असलेली ‘एसआयपी’ फायदेशीर ठरेल, असे युनियन म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधू नायर म्हणाले.
केंद्र सरकारने प्राप्तिकर मर्यादेत वाढ केल्याने करदात्यांच्या हातात सुमारे १ लाख कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यातील काही निधी निश्चितच बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला हातभार लावेल. तसे झाल्यास म्युच्युअल फंडातील मासिक एसआयपी ओघ सध्याचा २५,००० कोटींवरून येत्या १८ ते २४ महिन्यांमध्ये ४०,००० कोटींवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. जागतिक भू-राजकीय तणाव आणि व्यापाराशी संबंधित अनिश्चितता यांसारखी अल्पकालीन आव्हाने कायम आहेत. तथापि भारताची दीर्घकालीन स्थूल आर्थिक मूलतत्त्वे मजबूत आहेत. कंपन्यांचे मजबूत ताळेबंद आणि बँकिंग क्षेत्राची चांगली कामगिरी, आणि कल्याणकारी योजनांमुळे मागणी पुनरुज्जीवित होण्याची शक्यता आहे. यामुळे खासगी क्षेत्राकडूनही नवीन गुंतवणुकीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे भांडवली बाजाराला चालना देणारे प्रमुख सकारात्मक घटक असल्याचे ते म्हणाले.
बाजारातील सध्या अस्थिर वातावरणात गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’वर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. कारण प्रत्येक बाजार परिस्थितीमध्ये गुंतवणूक केल्याने घसरणीच्या टप्प्यात अधिक युनिट प्राप्त होतात आणि बाजारातील तेजीच्या परिस्थितीमध्ये मात्र त्या युनिटचे मूल्य (एनएव्ही) वाढते. त्यामुळे पुढे जायचे असेल तर ‘एसआयपी करा’ या मोहिमेअंतर्गत दीर्घावधीसाठी गुंतवणूक करण्याचे युनियन म्युच्युअल फंडाकडून आवाहन करण्यात येत आहे. शिवाय या फंड घराण्याकडून लहान गुंतवणूकदारांना गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच १०० रुपयांपासून सुरू होणाऱ्या मासिक ‘एसआयपी’ही सुरू केली गेली आहे.

पुणे : गेल्या आर्थिक वर्षात पुण्यात वाहन निर्मिती क्षेत्रापेक्षा संरक्षण उत्पादन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला गती मिळाल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. याचबरोबर व्यापार आणि सेवा क्षेत्रापेक्षा निर्मिती क्षेत्रातील उद्योगांची कामगिरी चांगली राहण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
‘एमसीसीआयए’ने पुण्यातील १५२ कंपन्यांची आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील कामगिरी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. त्यात वाहननिर्मिती, संरक्षण उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञा, अन्न व कृषी, अभियांत्रिकी यासह इतर क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे. सर्वेक्षणात सहभागी कंपन्यांपैकी ४३ टक्के कंपन्या सूक्ष्म, २२ टक्के कंपन्या लघु, २६ टक्के कंपन्या मध्यम आणि १० टक्के कंपन्या मोठ्या आहेत. या सर्वेक्षणात कंपन्यांकडून नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षातील विक्रीतील वाढीची अपेक्षा जाणून घेण्यात आली. त्यात कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये १०.३६ टक्के वाढीची अपेक्षा नोंदविली.
सर्वेक्षणात सहभागी कंपन्यांपैकी ३१ टक्के कंपन्या निर्यात करणाऱ्या आहे. या निर्यातदार कंपन्यांतील ७० टक्के कंपन्यांनी निर्यातीत वाढ झाल्याचे नमूद केले. क्षेत्रनिहाय विचार करावयाचा झाल्यास वाहननिर्मिती क्षेत्रापेक्षा संरक्षण उत्पादन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने जास्त वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी ११.५५ टक्के वाढीचा अंदाज वर्तविला असून, त्या खालोखाल व्यापार ९.८७ टक्के आणि सेवा ९.५७ टक्के वाढीचा अंदाज आहे. पुण्यातील कंपन्या वाढीबाबत आशावादी असून, त्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) प्रमाण लक्षणीय असल्याचे चित्र सर्वेक्षणात दिसते आहे.
‘गेल्या आर्थिक वर्षातील कंपन्यांची प्रगती समाधानकारक आहे. असे असले, तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जशास तसे आयात शुल्क आकारण्यात येत असून, त्यावर चालू आर्थिक वर्ष कसे जाईल, हे अवलंबून असेल. त्यावर ‘एमसीसीआयए’मध्ये पुढील महिन्यात अनेक चर्चासत्रे घेण्यात येणार आहे. अमेरिकेचे जास्त आयात शुल्क आणि त्याचा विविध क्षेत्रांवर होणारा परिणाम यावर चर्चा केली जाईल. या माध्यमातून काही उद्योग त्यांचे अनुभव मांडतील आणि त्यातून इतर उद्योगांना शिकता येईल,’ अशी माहिती ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिली.
‘आत्मनिर्भर भारत’मुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात वाढ होत आहे. यामुळे पुण्यात संरक्षण उत्पादन क्षेत्रात अनेक नवीन कंपन्या सुरू होत आहेत. त्याच वेळी अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रांतील कंपन्या संरक्षण उत्पादनात विस्तार करीत आहेत. त्यामुळे त्यातील वाढीला गती मिळाली आहे.- प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआयए

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (Jayalalithaa) यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादावर अखेर भाष्य केलं आहेत. दिवंगत नेत्या आणि चित्रपट निर्माते आर.एम. वीरप्पन यांच्याशी संबंधित एका घटनेमुळे त्यांच्या नात्याला वळण मिळालं असा खुलासा त्यांनी केला आहे.
आर एम वीरप्पन यांच्या पुण्यतिथीनिमित्त नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डॉक्युमेंट्रीत रजनीकांत यांनी जयललिता यांनी केलेल्या वादग्रस्त सार्वजनिक टिप्पणीनंतर आरएम वीरप्पन यांना त्यांच्या मंत्रिपदावरून कसे काढून टाकले ते सांगितलं. हा कार्यक्रम वीरप्पन यांची निर्मिती कंपनी असलेल्या सत्य मूव्हीजने निर्मित ‘बाशा’ या चित्रपटाच्या 100 व्या दिवसाच्या समारंभादरम्यान घडला.
रजनीकांत यांनी सभेला संबोधित करताना तामिळनाडूमध्ये “बॉम्ब संस्कृती” वाढत असल्याबद्दल इशारा दिला आणि चिंता व्यक्त केली की ही प्रवृत्ती राज्याला “स्मशानभूमी” बनवू शकते. त्यावेळी जयललिता वीरप्पन यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होत्या. रजनीकांत यांच्या मते, त्यांच्या वक्तव्यामुळे वीरप्पन यांना पदावरून काढून टाकण्यात आलं. या निर्णयामुळे रजनीकांत यांना खूप वाईट वाटलं होतं.
रजनीकांत म्हणाले की, त्यांना त्या रात्री झोप लागली नाही. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी वीरप्पन यांच्याशी संपर्क साधून खेद व्यक्त केला. तथापि, ज्येष्ठ नेत्याने विनम्रतेने उत्तर दिलं आणि रजनीकांत यांना काळजी न करता नेहमीप्रमाणे काम सुरू ठेवण्यास सांगितलं. जेव्हा रजनीकांत यांनी जयललिता यांच्याशी बोलून याप्रकरणी स्पष्टता करावी का? अशी विचारणा केली असता वीरप्पन यांनी तसं न करण्याचा सल्ला दिल. त्यांनी म्हटले की, “तुमचा स्वाभिमान गमावू नका. मला कोणत्याही पदाची गरज नाही. मी त्याच्याशी संलग्न नाही.”
तो क्षण आठवताना रजनीकांत भावूक झाले. त्यांनी आरएम वीरप्पन “खरा किंगमेकर” असल्याचं म्हटलं आणि जयललिता यांच्या राजकीय विरोधामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणून या घटनेचा उल्लेख केला. “मी त्यांच्याविरोधात का उभा राहिलो याचे हे एक प्रमुख कारण आहे,” असं रजनीकांत यांनी डॉक्यूमेंट्रीत म्हटलं आहे.
1990 च्या दशकातही रजनीकांत आणि जयललिता यांच्यातील मतभेदाच्या बातम्या प्रसिद्द झाल्या होत्या. विशेषतः जयललिता यांनी रजनीकांत यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर आणि काळ्या पैशांसंबंधी प्रत्युत्तरात, रजनीकांत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये रजनीकांत यांनी नेत्यांना राजकीय फायद्यासाठी त्यांचे नाव शस्त्र म्हणून वापरू नका किंवा त्यांच्या चाहत्यांमध्ये फूट पाडू नका असं आवाहन केलं होतं.
आरएमव्ही म्हणून प्रेमाने ओळखले जाणारे आरएम वीरप्पन हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते तर तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख शक्ती होते. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. रजनीकांत यांच्याशी त्यांची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय होती.



Swami Ramdev Yoga : योगगुरू स्वामी रामदेव सह-संस्थापक असलेल्या प्रसिद्ध कंपनी पतंजली आयुर्वेदाची आयुर्वेदिकउत्पादने जगभरात लोकप्रिय आहेत. ज्यामुळे लोकांची जीवनशैली खूपच बदल आले आहेत. परंतु याशिवाय, पतंजली अनेक प्रकारे लोकांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव पाडते. बदल घडवून आणत आहे. त्यापैकी, स्वामी रामदेव यांच्या योगाने जागतिक स्तरावर कोट्यावधी लोकांना प्रेरणा दिली आहे. लोकांच्या जीवनावर याचा परिणाम झाला आहे.
योगा हा फक्त व्यायाम नाही तर तो एक चांगली जीवनशैली जगण्याचा एक मार्ग आहे. अनेक वर्षांपूर्वी, आपले ऋषी केवळ निरोगी राहण्यासाठीच नाही तर आनंदी राहण्यासाठी आणि आध्यात्माशी जोडण्यासाठी योग करत होते. मध्यंतरी लोक योग जवळजवळ विसरले होते. मग रामदेव आणि इतर काही लोकांनी टीव्हीच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांना योग विद्येचा परिचय करुन दिला आहे.योग आता जगभरात एक ट्रेंड बनला आहे.
बाबा रामदेव यांनी २००२ पासून योग शिबिरे आयोजित करण्यास सुरुवात केली आणि टीव्हीवर त्यांचे योग सत्र दाखवण्यास सुरुवात केली. यामुळे योग केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला. यासोबतच त्याचे युट्यूब चॅनेल, १ कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स असलेल्या ‘स्वामी रामदेव’नी योगाला घराघरात पोहोचवले आहे. डिजिटल माध्यमामुळे भारतच नाही तर अमेरिका, कॅनडा, युके आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्येही योग लोकप्रिय झाला आणि लोकांनीही त्याचे अनुसरण केले.
रामदेव यांच्या योग सत्रांमुळे लोकांना मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा इत्यादी अनेक आजारांपासून मुक्तता मिळाली आहे. त्यांच्या योग शिबिरांनी आणि टीव्ही कार्यक्रमांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. लोकांना नैसर्गिक आणि संतुलित जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित केले आहे. यामुळे केवळ लोकांच्या शरीरात सुधारणा झाली नाही तर लोकांना मनःशांती मिळण्यासही मदत झाली. अनुलोम-विलोम आणि कपालभाती यांसारख्या त्यांच्या प्राणायाम पद्धतींनी लोकांना प्रेरणा दिली. रोगप्रतिकारक शक्ती वाढली. तणाव आणि ताण कमी करण्यास मदत झाली. विशेषतः कोविड काळात जेव्हा सर्वांना निरोगी राहण्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा बाबा रामदेव योग विद्या मार्गदर्शक ठरली. जागतिक स्तरावर योगाची लोकप्रियता वाढत आहे.
स्वामी रामदेव यांच्या कठोर परिश्रमामुळे योग जगभर प्रसिद्ध झाला आहे. दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो, जो संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिली आहे. २०२४ मध्ये, भारतात १० वा योग दिन साजरा करण्यात आला. पंतजली आयुर्वेदाने योग आणि आयुर्वेद लोकांना एक ब्रँड म्हणून सादर केल. आज २० पेक्षा जास्त देशांमध्ये योग आणि पतंजलीचे उत्पादने उपलब्ध आहेत. यामुळे आपली भारतीय संस्कृती, परंपरा, आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक उपचारांची जगाला ओळख करून देण्यास खूप मदत झाली. पतंजली उत्पादने जसे की – टूथपेस्ट, त्वचेची काळजी आणि आरोग्याशी संबंधित वस्तू लोकांना नैसर्गिक जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित केले आहे. या सर्व गोष्टी त्यांचा योग आहेत.
ती सत्रांशीही चांगली जोडलेली आहे, त्यामुळे लोक केवळ बाहेरूनच नव्हे तर आतूनही निरोगी राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) न्यायमूर्तींनी काही आठवड्यांपूर्वी महिलेच्या स्तनांना हात लावणं किंवा पायजम्याची दोरी तोडणं हे बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न नाही असं निरीक्षण नोंदवलं होतं. त्यानंतर आता न्यायालयाच्या दुसऱ्या न्यायाधीशांनी बलात्काराच्या आरोपीला जामीन मंजूर केला आहे. पीडितेने स्वतःच संकटाला आमंत्रण दिलं असून बलात्काराच्या कथित कृत्यासाठी ती जबाबदार होती असं निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवलं आहे.
Live Law च्या रिपोर्टनुसार, पीडितेने सांगितलं आहे की ती दिल्लीमध्ये आपल्या तीन मैत्रिणींसह बारमध्ये गेली होती. तिथे त्यांनी मद्याचं सेवन केलं होतं. तिथे त्या पहाटे 3 वाजेपर्यंत थांबल्या. यादम्यान त्या मद्याच्या प्रचंड प्रभावाखाली होत्या. ती बारमध्ये असताना, आरोपीने तिला त्याच्यासोबत त्याच्या घरी जाण्यासाठी वारंवार आग्रह केला. दारूच्या नशेत तिला आधाराची गरज असल्याने, तिने त्याच्यासोबत घरी जाऊन आराम करण्यास होकार दिला.
पीडितेने केलेल्या आरोपानुसार, आरोपीने प्रवासात तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तसंच नोएडामधील त्याच्या घरी ने नेता गुडगावमधील नातेवाईकाच्या घरी नेलं. तिथे त्याने तिच्यावर दोनवेळा बलात्कार केला.
न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी आरोपीला जामीन मंजूर करताना निरीक्षण नोंदवलं की, “या न्यायालयाचे असं मत आहे की जरी पीडितेचा आरोप खरा मानला गेला तरी असा निष्कर्ष काढता येतो की तिने स्वतःच संकटाला आमंत्रण दिलं होते आणि त्यासाठी ती जबाबदार देखील होती. पीडितेने तिच्या जबाबातही अशीच भूमिका घेतली आहे. तिच्या वैद्यकीय तपासणीत तिचे हायमेन फाटलेले आढळले परंतु डॉक्टरांनी लैंगिक अत्याचाराबद्दल कोणतंही मत दिलं नाही”.
न्यायालयाने पीडिता एमएची विद्यार्थिनी असल्याने आपल्या कृत्याची नैतिकता आणि महत्त्व जाणण्यास सक्षम होती असंही निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.
उल्लेखनीय म्हणजे, आरोपीने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जरी सर्व आरोप खरे मानले गेले तरी ते बलात्काराचे प्रकरण नसून दोघांमधील संमतीने झालेल्या शारीरिक संबंधाचे प्रकरण असू शकतं असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला होता.
वकिलांनी असाही युक्तिवाद केला की, त्यांचा अशील डिसेंबर 2024 पासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे, त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमीक नाही. जर त्याला जामिनावर सोडण्यात आले तर तो जामिनाच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करणार नाही आणि खटल्याच्या लवकर निकालात सहकार्य करेल.
या प्रकरणातील सर्व युक्तिवाद विचारात घेऊन, न्यायमूर्ती सिंह यांनी आरोपीला जामीन मंजूर केला. “प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती तसंच गुन्ह्याचे स्वरूप, पुरावे, आरोपीचा सहभाग आणि पक्षकारांच्या वकिलांचे म्हणणे लक्षात घेऊन, अर्जदाराने जामिनासाठी योग्य युक्तिवाद केला आहे असं माझे मत आहे. म्हणून, जामीन अर्ज याद्वारे मंजूर करण्यात येत आहे,” असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.
