


लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चा विकास आराखडा करताना बांधकाम व्यावसायिक, उद्योजकांच्या जागा वगळण्यात आल्या. गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण टाकली आहेत. अशा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विकास आराखडा रद्द केल्याची माहिती उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. नवीन आराखड्यात रस्ते, परवडतील अशा घरांचे आरक्षण टाकले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) वतीने चऱ्होली आणि माण येथे सुरू करण्यात आलेल्या नवीन ई- बस स्थानकाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शुक्रवारी चऱ्होलीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार बापू पठारे, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, चऱ्होली डेपोला ६० आणि माणला ३० बस देण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे महापालिका ६० आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ४० टक्के हिस्सा दिला जात आहे. पीएमपीएमएलसाठी नवीन २३० कोटींच्या टाटाच्या ५०० बस घेणार आहोत. यासाठी पीएमआरडीने पीएमपीएमएलकडे निधी दिला आहे. सोबतच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणखी निधी पुरवेल. म्हणजे जवळपास दीड हजार बस ताफ्यात असतील. जेणेकरून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बऱ्यापैकी प्रश्न सुटेल. सण २०४१ मध्ये पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ही ६१ लाखांच्या घरात जाईल. कदाचित येत्या लोकसभेत पिंपरी-चिंचवडचा स्वतंत्र खासदार होईल. वाढती लोकसंख्या पाहता त्या पध्दतीने सगळे नियोजन करत आहोत. शहरासाठी भामा, आसखेड, ठोकरवाडी, मुळशी, पवना धरणातून पाणी आणले जाणार आहे.
ई-बस वातानुकूलित (एसी) आहेत. सीएनजी बस वातानुकूलित करण्यासाठी किती खर्च येतो. याची माहिती घ्यावी. उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. उष्माघाताचा अनेकांना त्रास होत आहे. अशात श्रीमंत तर एसीमध्ये फिरू शकतात. पण, सर्वसामान्य नागरिकाला एसीत बसून प्रवास करता यावा. यासाठी सीएनजी बसही एसी करण्याची सुचना पवार यांनी केली.
मी वरचेवर भेटत नसलो, शहरात जास्त येत नसलो, तरी पुण्याचा पालकमंत्री म्हणून जनतेच्या हितासाठी काम करत आहे. मुंबई, पुण्यात बसून पिंपरी- चिंचवडकरांच्या हिताचे निर्णय घेत आहे, असेही ते म्हणाले.


फलटण. :- “मा. खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार श्री सचिन पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली येत्या काही दिवसांत फलटणची बारामती झाल्याशिवाय राहणार नाही,” असा ठाम विश्वास गटनेते अशोकराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.
सध्या फलटण शहरात ऐतिहासिक विकासकामे जोमात सुरू असून, यामुळे काहीसा त्रास सहन करावा लागत असला तरी, तो शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक मात्र या त्रासावरून राजकारण करत असून, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
गेल्या अडीच ते तीन वर्षांत खासदार रणजितदादांनी शहर आणि तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. त्यातून अनेक भव्य प्रकल्प सुरू झाले असून, नगरपरिषदेच्या शेजारी उभा राहत असलेला आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.
त्याशिवाय, महिला जिम, स्विमिंग पूल, स्टेडियम, तारांगण, पालखी मार्ग, रिंग रोडचे सुशोभीकरण, शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनची नवीन इमारत, प्रशासनिक भवन, जिल्हा न्यायालय व वारकरी भवन अशी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.
“ही सर्व कामे पूर्ण झाली की फलटणचा चेहरामोहराच बदलून जाईल. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ होत आहे,” असे म्हणत अशोकराव जाधव यांनी सर्व फलटणकर नागरिकांना या विकासयात्रेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे.



नागपूर : उन्हाळ्यात रेल्वेगाड्यांना गर्दी होत असल्याने रेल्वेने मुंबईहून (सीएसएमटी) नागपूरसाठी एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त गर्दी लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि नागपूर दरम्यान एक विशेष गाडी सोडण्यात येत आहे. ग्रीष्मकालीन सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून नागपूरकडे एकफेरी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१०१७ सीएसएमटी-नागपूर एक फेरी विशेष गाडी खालीलप्रमाणे चालविण्यात येईल.
सीएसएमटी -नागपूर एकफेरी विशेष गाडी २७ एप्रिल २०२५ रोजी सीएसएमटीवरून रात्री १२.३० वाजता प्रस्थान करेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वा वाजता नागपूर येथे पोहोचेल.
ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मळखेड, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा येथे थांबणार आहे. या गाडीमध्ये एकूण २१ डब्यांची असेल. त्यामध्ये दोन एसएलआर/डी, सहा सामान्य श्रेणी, १० स्लीपर, दोन एसी थ्री-टियर आणि एक एसी टू-टियर डब्यांचा समावेश आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूर विभागातून रीवा – चारलापल्ली – रीवा दरम्यान विशेष गाडीची सेवा देण्यात येत आहे. गाडी क्रमांक ०१७०४/०१७०३ रीवा – चारलापल्ली – रीवा एक्सप्रेस विशेष गाडी अतिरिक्त भाडे आकारून चालविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक ०१७०४ रीवा – चारलापल्ली द्वै-साप्ताहिक विशेष गाडी २४ एप्रिल ते २५ मे दर गुरुवार व रविवार दुपारी १ वाजता रीवा येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २.४५ वाजता चारलापल्ली येथे पोहोचेल. ही गाडी नागपूर स्टेशनवर दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता येईल आणि पहाटे ४.३५ वाजता निघेल.
गाडी क्रमांक ०१७०३ चारलापल्ली – रीवा द्वै-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक २५ एप्रिल ते २६ मे दर शुक्रवार व सोमवार सायंकाळी ४.५५ वाजता चारलापल्ली येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता रीवा येथे पोहोचेल. ही गाडी नागपूर स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता येईल आणि ६.२५ वाजता निघेल.
ही विशेष गाडी सतना, मैहर, कटनी मुडवारा, दमोह, सागर, बीना, राणी कमलापती, इतारसी, जुझारपूर, बेतूल, आमला, नागपूर, बल्लारशाह, शिरपूर कागजनगर, बेल्लमपल्ली, मंचेरियल, पेद्दापल्ली, काझीपेट, जंगावन या स्थानकांवर निर्धारित वेळेनुसार थांबेल.

India Pakistan tensions: 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचे प्राण गेले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक दशकांपासून सुरू असलेला 1960 चा सिंधू पाणी करार महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला. भारताकडून हा करार स्थगित करण्यात आला.पहलगाम हल्ल्याबद्दल भारतात संतापाचे वातावरण आहे. पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी सरकारने अनेक कठोर पावले उचलली आहेत.
पहलगामच्या बैसरन मैदानात घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. ज्यात 2 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. हा हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तैयबा’ (एलईटी) चा सहयोगी असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) ने केल्याचे तपासात समोर आले आहे.
हल्ल्यानंतर भारत सरकारने आणखी एक कठोर पाऊल उचलले आणि सिंधू पाणी करार स्थगित केला. यासोबतच इतर अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. ज्याचा थेट परिणाम पाकिस्तानवर होणार आहे. भारताच्या या कठोर निर्णयांनंतर पाकिस्तानने 1972 चा सिमला करारही स्थगित करण्याची घोषणा केली. या घटनांमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भारताने सिंधू पाणी करार रद्द करताच पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर याबद्दल बरीच चर्चा झाली. पाकिस्तानी नेटिझन्सनी यावर काही मनोरंजक आणि टीकात्मक रिअॅक्शन दिल्या. भारताने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारे ‘धमकी’ दिल्या तरी पाकिस्तान आधीच पाणी टंचाई सारख्या अनेक संकटांना तोंड देतंय, असे पाकिस्तानी नेटिझन्स म्हणतायत.
एका पाकिस्तानी नेटिझन्सने पोस्टमध्ये लिहिले की, ‘भारत आम्हाला धमकावण्यासाठी काहीही करू शकतो. आम्ही आधीच आमच्या सरकारच्या हातून त्रास सहन करत आहोत. तुम्ही पाणी थांबवाल का? ते असेही येत नाही. तुम्ही आम्हाला माराल का? आमचे सरकार आधीच आम्हाला मारतंय. तुम्ही लाहोर ताब्यात घ्याल का? तुम्ही अर्ध्या तासानंतर ते स्वतः परत आणाल. ही पोस्ट X (पूर्वीचे ट्विटर) वर ‘Pvt_insaann’ या हँडलवरून शेअर करण्यात आली आणि त्याला 126000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य हे एक अर्थशास्त्रज्ञ तसेच एक कुशल राजकारणी आणि रणनीतीकार होते. त्यांनी त्यांच्या शिक्षण आणि जीवनातील अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिले, जे चाणक्य नीति म्हणून प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये त्यांनी संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे सखोल वर्णन केले आहे. चाणक्य निती जीवनात तुम्हाला यश मिळविण्यासाठी मदत करीत असते. चाणक्यजींनी नेहमीच त्यांच्या धोरणांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. असे मानले जाते की, जो व्यक्ती आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतो त्याची जीवनात मोठी प्रगती होते.
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात चार गोष्टींना सर्वोच्च स्थान दिले आहे. चाणक्याच्या मते, या गोष्टी जगात सर्वात शक्तिशाली आहेत. चाणक्य जी मानतात की व्यक्तीने आपल्या जीवनात या गोष्टींचा नेहमी आदर केला पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्या मते, गुरु आणि देवी-देवतांपेक्षाही आईला संपूर्ण जगात सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे आईचा नेहमी आदर केला पाहिजे. जो व्यक्ती आपल्या आईला आदर करतो, त्यांच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. कारण अनेक कष्ट व त्रास सहन करत आई ९ महिने मुलाला आपल्या पोटात ठेवते. त्यामुळे मूल आईचे ऋण कधीच फेडू शकत नाही.
आचार्य चाणक्य मानतात की अन्नदान करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे. अन्न आणि पिण्याचे पाणी दान केल्याने तुम्हाला गरजूंचा आशीर्वाद जाणवतो. त्यामुळे माणसाने नेहमी दान आणि पुण्य करावे. गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न देणाऱ्या व्यक्तीपेक्षा मोठा कोणीही नाही.
आचार्य चाणक्य मानतात की जगातील सर्वात शक्तिशाली मंत्र गायत्री मंत्र आहे. हा मंत्र ऋग्वेदातून रचलेला आहे. तसेच या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला त्याच्या आयुष्यात शक्ती, दीर्घायुष्य आणि अपार संपत्ती प्राप्त होते.
चाणक्यजींनी एकादशी तिथीचे वर्णन सर्वात पवित्र मानले आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व पाप आणि दुःख दूर होतात. तसेच एकादशी तिथीची पूजा केल्याने अधिक फळ मिळते. कार्तिक महिन्यातील देवूठाणी एकादशी ही सर्वात महत्त्वाची मानली जाते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)
