Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2992

कालव्यात ट्रॉली उलटली; चार महिला मजूर ठार | पुढारी

0









सातारा/कोडोली, पुढारी वृत्तसेवा : सातारा तालुक्यातील कारंडवाडी येथील शेतात काम करणार्‍या महिलांसाठी शनिवार घातवार ठरला. शेतात गेलेल्या महिला पावसामुळे टॉलीतून घरी परतत होत्या. मात्र, पावसाने झालेल्या चिखलामुळे ही ट्रॉली पुलावरील वळणावर घसरून कण्हेर उजव्या कालव्यात उलटली. त्यामुळे पाण्यात बुडून चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला व चालक बचावले आहेत. जखमी महिलेची प्रकृती गंभीर आहे. या हृदयद्रावक घटनेने कारंडवाडीवर शोककळा पसरली आहे. शनिवारी सायंकाळी 5 वा. सुमारास ही घटना घडली.

अरुणा शंकर साळुंखे (वय 58), लीलाबाई शिवाजी साळुंखे (60), सीताबाई निवृत्ती साळुंखे (65) व उल्का भरत माने (55, सर्व रा. कारंडवाडी, ता. सातारा) अशी मृत महिलांची नावे आहेत. या दुर्घटनेत लता गुलाबराव माने या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अपघातग्रस्त महिला गुलाब रामचंद्र माने यांच्या शेतात कामासाठी शनिवारी सकाळी 10.30 वाजता गेल्या होत्या. दुपारनंतर जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे गुलाब माने या महिलांना ट्रॅक्टर ट्रॉलीतून घरी घेऊन जात होते. पावसामुळे कालव्यालगतचा रस्ता निसरडा झाला होता. अगोदरच अरुंद रस्ता त्यात पावसाने झालेला चिखल यामुळे वाट धोकादायक बनली होती. महाडिक कॉलनीजवळआल्यानंतर चिखलामुळे टायर घसरल्यामुळे पुलाच्या वळणावर ट्रॉली थेट कालव्यात उलटली. ट्रॉलीमध्ये पाच महिलांसह शेळी व दुचाकीही होत्या. पाण्यात कोसळल्यानंतर दोन महिलांचा वाहत जाऊन तर दोन महिलांचा ट्रॉलीखाली सापडल्याने बुडून मृत्यू झाला. या घटनेने कारंडवाडी शोकसागरात बुडाली.

अपघाताची माहिती कळताच जो-तो घटनास्थळी पोहचला. या ठिकाणचे वातावरण भयावह झाले होते. मृत महिलांच्या कुटूंबिय व नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. महिलांचे मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. तेथेही कारंडवाडीच्या नागरिकांनी गर्दी केली होती.











Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: चित्रपट शाहरुख खानचा, पण पोस्टरवर मात्र कुणी दुसराच अभिनेता!

0
माझ्या हिश्श्याचे किस्से: चित्रपट शाहरुख खानचा, पण पोस्टरवर मात्र कुणी दुसराच अभिनेता!


रूमी जाफरी7 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘दीवाना’ चित्रपटाचे हेच ते पोस्टर, ज्यात दिव्या भारती यांच्यासोबत रणदीप आर्या आहे. मात्र, चित्रपटात मुख्य भूमिका शाहरुख खान यांनी केली होती.

‘दीवाना’ सुपरहिट झाल्यावर त्यातील कलाकारांना जी ट्रॉफी मिळाली, त्यावरचा फोटो म्हणजे तेच पोस्टर आहे, जे रणदीप आर्या आणि दिव्या भारती यांच्या फोटोशूटचे होते. हे पोस्टर लोकांना इतकं आवडलं की राज कंवर यांनी त्या चित्रपटाच्या शीर्षक गीताच्या शेवटी शाहरुख खान यांना घेऊन तशाच पोजचं चित्रीकरण केलं.

भारतीय चित्रपटांच्या इतिहासात असंख्य चित्रपट तयार झाले. मोठमोठे ब्लॉकबस्टर चित्रपट लोकांच्या लक्षात राहतात, पण त्यामागील किस्से एक तर लोकांच्या लक्षात राहत नाहीत किंवा ते लोकांसमोर येत नाहीत. आज मी तुम्हाला जो किस्सा सांगणार आहे, तो हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुपरस्टारचा आहे, ज्याला लोक बादशाह खानच्या नावाने ओळखतात. हा सुपरस्टार म्हणजे शाहरुख खान. त्यांचा पहिला चित्रपट होता ‘दीवाना’. गुड्डू धनोआ, राजू कोठारी आणि ललित कपूर या तिघा भागीदारांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली होती. राज कंवर यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट होता. यामध्ये दिव्या भारती, ऋषी कपूर आणि शाहरुख खान होते. आजपासून बरोबर ३१ वर्षांपूर्वी, म्हणजे २५ जून १९९२ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

शाहरुखच्या आधी या चित्रपटात निर्माता-दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा पुत्र अरमान कोहलीला घेण्यात आले होते. पण, अरमानच्या वडिलांची म्हणजेच राजकुमार कोहलींची अट होती की, अरमानला घेऊन ते ज्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत, तो आधी प्रदर्शित होईल. दुसरीकडे, ‘दीवाना’च्या निर्मात्यांनी सांगितले की, आम्ही दिव्या भारती आणि ऋषी कपूर यांच्या तारखा आधीच घेऊन ठेवल्या आहेत. त्यामुळे आमचा चित्रपट आधीच तयार होईल, मग आम्ही तुमच्या चित्रपट प्रदर्शनाची वाट कशाला बघायची? आम्ही चित्रपट प्रदर्शित करू. त्यामुळे अरमान कोहलीने हा चित्रपट केला नाही आणि त्यानंतर शाहरुख खानला त्यात घेण्यात आले.

शाहरुख खान यांनी ‘हो’ म्हणेपर्यंत दिव्या भारती यांच्या फोटोसेशनच्या तारखा आल्या होत्या. आता नायकाशिवाय फोटोसेशन कसे करायचे? हा निर्माते-दिग्दर्शकांसमोर प्रश्न होता. गुड्डू धनोआ यांच्या पत्नी संतोष यांनी पोस्टरची एक संकल्पना मांडली, ज्यामध्ये नायकाचा चेहरा दिसणार नाही आणि पोस्टरदेखील खूप सुरेख असेल. चेहरा दिसणार नाही, तरी फोटो सेशनसाठी मुलगा हवाच. आता तो मुलगा कोण असेल आणि कुठून येणार, हा प्रश्न होता. तर गुड्डू धनोआ यांनी जो मुलगा शोधला तो धर्मेंद्र यांचे नातेवाईक वीरेंद्र यांचा मुलगा रणदीप आर्या होता. वीरेंद्र यांनी गुड्डू धनोआ यांचा ‘मेरा लहू’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. रणदीपला बोलावून त्याचे आणि दिव्या यांचे फोटोसेशन करण्यात आले. त्यानंतर शाहरुख खान यांनी हा चित्रपट साइन केला. पुढे काही दिवसांत हा चित्रपट तयार झाला. आजवरच्या संस्मरणीय चित्रपटांपैकी एक असलेला हा ‘दीवाना’ खूप यशस्वी चित्रपट ठरला. त्याची गाणीही सुपरहिट झाली. ऋषी कपूर, दिव्या भारती आणि शाहरुख खान यांचा अभिनय, राज कंवर यांचे दिग्दर्शन हे सगळेच सुपरहिट होते.

या साऱ्यामध्ये एक गोष्ट मात्र बदलली नाही, ती म्हणजे रणदीप आर्या आणि दिव्या भारती यांचे फोटोसेशन केलेले ते पोस्टर. चित्रपट सुपरहिट झाल्यावर त्यातील कलाकारांना जी ट्रॉफी मिळाली, ती आज त्या प्रत्येकाच्या घरात आहे. पण, त्यावरचा फोटो म्हणजे तेच पोस्टर आहे, जे रणदीप आर्या आणि दिव्या भारती यांच्या फोटोशूटचे होते. त्यानंतर रणदीप आर्याने प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती भटनागरसोबत लग्न केले. ते पोस्टर लोकांना इतकं आवडलं की राज कंवर यांनी त्या चित्रपटाच्या शीर्षक गीताच्या शेवटी शाहरुख खान यांना घेऊन तशाच पोजचं चित्रीकरण केलं. ते आपल्याला गाण्यामध्ये पाहायला मिळतं.
एक प्रसिद्ध शेर आहे…

क़िस्मत का लिखा तो मुझे ख़ुद ही मिलेगा आक़ा वो दीजिए मुझको जो मेरी क़िस्मत में ना हो। अरमान कोहलीचा चित्रपट शाहरुख खान यांना मिळण्याच्या घटनेमुळे या ओळींना सार्थ ठरतात. ‘दीवाना’ चित्रपटाशी संबंधित किश्श्यांबद्दल बोलायचे तर प्रत्येक किस्सा खूपच खास आहे. पण, मला आणखी एक किस्सा आठवतोय, जो अतिशय मनोरंजक आणि रोमांचकही आहे. ‘दीवाना’चे चित्रीकरण मढ आयलँड इथे सुरू होते. गुड्डू धनोआ हे त्यांच्या अ‍ॅक्शनसाठी ओळखले जात होते. जसे रोहित शेट्टी आजच्या चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शनसाठी ओळखले जातात, तसेच गुड्डू धनोआही ९० च्या दशकात त्यांच्या अ‍ॅक्शनसाठी प्रसिद्ध होते. गुड्डू धनोआ हे धर्मेंद्र यांचे नातेवाईक आणि खूप मोठे दिग्दर्शक आणि निर्मातादेखील आहेत. ते स्वत:जवळ नेहमी परवाना असलेली रिव्हॉल्व्हर ठेवायचे. एके दिवशी चित्रीकरणादरम्यान दिव्या भारतींना संधी मिळाली आणि त्यांनी गुड्डू धनोआ यांची रिव्हॉल्व्हर काढली. ही चित्रीकरणासाठीची खोटी रिव्हॉल्व्हर आहे, असंच दिव्या समजत होत्या. दुसरीकडे, गुड्डू धनोआ दिव्या यांना वारंवार सांगत होते की ही खरी रिव्हॉल्व्हर आहे. परंतु, मुळातच खोडकर असलेल्या दिव्या रिव्हॉल्व्हर घेऊन हसत गुड्डू धनोआंना चिडवण्यासाठी सारखं विचारत होत्या, ‘चालवू का..? चालवू..?’ गुड्डू धनोआंनी खूपदा सांगूनही त्या काही ऐकत नव्हत्या. आता दिव्या ट्रिगर दाबणार असं गुड्डू यांना दिसताच त्यांनी विजेच्या वेगाने दिव्या यांचा हात वर केला आणि एकदम एक गोळी झाडली गेली, ती थेट मढ आयलँडच्या आकाशात उडाली.

या घटनेमुळे दिव्या आणि गुड्डू धनोआ यांनाही खूप धक्का बसला. अर्धा तास दिव्या नुसत्या गप्प बसून राहिल्या, कोणाशी काहीही बोलल्या नाहीत. आता तुम्हीच विचार करा, गुड्डू धनोआ यांनी योग्य वेळी दिव्या यांचा हात वर केला नसता, तर किती मोठी दुर्घटना घडली असती. गुड्डू धनोआ यांचे तारतम्य आणि तत्परतेमुळे एक मोठा दुर्घटना घडता घडता टळली होती.

तेव्हा मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. योग्य वेळी शहाणपण आणि विवेकाचा वापर केल्यास मोठी दुर्घटना टळू शकते. तुम्हाला माझ्या हिश्श्याचा हा किस्सा आवडला असेल, तर दिव्या भारती यांच्या आठवणीत, त्यांच्या ‘दीवाना’मधील हे गाणे
नक्की ऐका…
ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं, मैंने इसलिए…
जाने जाना दीवाना… तेरा नाम रख दिया।
स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.

रूमी जाफरी बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक



Source link

नेटस्ट्रीम: समाजाची गुंगी उतरवणारे, बालभिक्षुकीचे वास्तव

0
नेटस्ट्रीम: समाजाची गुंगी उतरवणारे, बालभिक्षुकीचे वास्तव


समीर गायकवाड7 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

काही वर्षांपूर्वी दक्षिणेतील एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाने बंगळुरूमधील भीक मागणाऱ्या माफियांबद्दल एक चौकशी अहवाल प्रकाशित केला होता. त्यासाठी संबधित महिला पत्रकाराने एका बाळाला ‘भाड्याने’ घेऊन शहरातील रस्त्यांवर भीक मागण्यासाठी गुप्तपणे नेले होते. तिने बाळाला कसे मिळवले आणि पुढे जाऊन त्यातून काय घडले, याच्या तपशिलातून बऱ्याच धक्कादायक गोष्टी समोर आल्या. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यामागे खूप काही दडलेले असते, तिथले अख्खे जगच आपल्याला अनभिज्ञ असते, हेही जाणवले. त्यामुळे विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये लक्ष वेधणाऱ्या पृथ्वी कोनानूरचा ‘पिंकी एली’ (पिंकी कुठे आहे?) हा कन्नड चित्रपट अशाच गोष्टींपासून प्रेरणा घेऊन निर्मिला असावा, असे वाटते.

आपला पती मंजुनाथ (दीपक सुब्रमण्य) याच्यापासून दुरावलेली बिंदुश्री (अक्षता पांडवपुरा) तिचा पार्टनर गिरीश (अनुप शून्या) आणि आठ महिन्यांची मुलगी पिंकीसोबत राहते. गृहिणीखेरीज नोकरदार महिला असणारी बिंदुश्री आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी सनम्मा (गुंजालम्मा) या मदतनीस महिलेच्या भरवशावर घर सोडत असते. आपल्या मुलीच्या अंगाला कसला तरी विचित्र वास येतोय, हे एकदा तिच्या लक्षात येते. तर, आणखी एका प्रसंगी तिच्या एका सॉक्समध्ये दोन रुपयांचे नाणे अडकते, तरीही बिंदुश्रीला त्यातून कुठल्या मिसप्लेचा संशय येत नाही. वास्तवात बिंदुश्री घराबाहेर पडली की, सनम्माचं खरं रूप समोर येत असतं. पिंकीला गुंगी यावी म्हणून सनम्मा अल्कोहोलयुक्त दूध पाजत असते, जेणेकरून अनसू नावाचा तिचा मित्र रस्त्यावर भीक मागण्यासाठी साधन म्हणून पिंकीला वापरू शकेल. सनम्माचा हा उद्योग बिनबोभाट सुरू असतो. बिंदुश्रीला याची भनक देखील नसते. मात्र एकेदिवशी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अनसूकडून पिंकी हरवते! त्यानंतर पिंकीच्या शोधाची जी जीवघेणी कसरत सुरू होते त्याचा हा सिनेमा. अंगावर काटे आणणारा अन् विचार करण्यास भाग पाडणारा!

कथेला मुख्य प्लॉट पॉइंटवर नेण्यात सिनेमा वेळ घालवत नाही. पहिल्या पाच मिनिटांतच कथेतली मुख्य पात्रे – एक जोडपं, एक मूल, घरातली मदतनीस आणि लहानगी मुलगी यांच्या विश्वात आपण शिरतो. त्यानंतर लगेचच पिंकीचे बेपत्ता होणं आपल्यासमोर येतं. या तान्हुलीला शोधण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करत असतानाच दिग्दर्शकाने चतुराईने काही उपकथानके एकत्र विणलीत. पिंकीच्या आडून काही अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी सनम्मावरचा संशय, पिंकीच्या पालकांचे ताणले गेलेले परस्परसंबंध, पोलिसांचा तिरकस तपास हे सर्व रंजक पद्धतीने समोर येतं. एखादे मूल चुकीच्या व्यक्तीच्या हाती जाते तेव्हा काय होऊ शकते, याचा हा थरारक प्रवास आहे. पृथ्वीचा हा चित्रपट कोणत्याही सेलिब्रिटी नायक-नायिकेला घेऊन निर्मिलेला नाही. सनम्माचे पात्र साकारणारी गुंजालम्मा असो, अनसूच्या भूमिकेत तिची चुलत बहीण अनसूयम्मा असो की कॉर्पोरेशनचे सफाई कामगार, त्यांचा सावळा एजंट, इतर लोक आणि उलगडत जाणाऱ्या वेगवान घटना असोत; हे सर्व गणित वास्तववादी लोकेशनमधील नॉन-अॅक्टर्सच्या ‘परफॉर्मन्स’वर पेललं आहे. अर्जुन राजाच्या हँडीकॅमेऱ्याने केलेलं चित्रीकरण अफलातून आहे. धडधडत जाणाऱ्या कॅमेऱ्यातून चित्रित केलेली अनेक दृश्ये अक्षरशः अंगावर येतात.

‘पिंकी एली’ हा ईझी वॉच मूव्ही नाही. आपण संवेदनशील असू आणि प्रत्येक सिग्नलवर भीक मागण्यासाठी वापरलेली लहान मुले जवळपास नेहमीच गुंगीत असल्यासारखी का दिसतात, असा प्रश्न जर कधी पडला असेल, शिवाय जोडीला आपण तरुण पालक असू, नोकरीसाठी रोज घराबाहेर पडत असू आणि आपले घर हेच सर्वात सुरक्षित ठिकाण असेल, असे गृहीत धरून दीर्घकाळ बाहेर राहत असू, तर हा सिनेमा आयओपनर ठरावा! असे चित्रपट पाहिल्यावर लक्षात येतं की, आपल्या बालपणी घरात कुणी वृद्ध माणूस असणं किती महत्त्वाचं आणि गरजेचं होतं. ज्यांच्या घरी आजी-आजोबा होते, त्यांच्यासाठी तर घर म्हणजे स्वर्गच होता. मात्र, ज्यांना सांभाळण्यास रक्ताचं कुणी घरी नसतं त्यांचं काय, यावर हा सिनेमा अप्रत्यक्ष भाष्य करतो. ‘पिंकी एली’ अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजलेला असल्याने सिनेमागृहांमध्ये तो पुरस्कार विजेता सिनेमा म्हणून मिरवतच दाखल होतोय. एरवी फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजणारे सिनेमे ठराविक विचार आवडणाऱ्या गर्दीचे लक्ष्य असतात. सुदैवाने पिंकीचे तसे होणार नाही, कारण हा एक गंभीर मास मूव्ही आहे, जो पाठलागावर भर देतो. कोणतीही अतिरिक्त सजावट नसणाऱ्या, मात्र विचार करण्यास भाग पाडणाऱ्या या सिनेमाला पार्श्वसंगीतही नाही! हा जसा नेहमीच्या पठडीतील सिंगल स्क्रीन सिनेमा नाही, तसा तो चकचकीत मल्टिप्लेक्स मूव्हीसुद्धा नाही. याचा कंटेन्ट लोकांना आवडेल असा असला, तरी त्याचे स्क्रीन टाइम स्लॉटदेखील महत्त्वाचे ठरतील. कारण सगळ्यांनाच असे चित्रपट आवडतील, याची ग्वाही कुणीच देऊ शकणार नाही. या सिनेमाचे ओटीटी रिलीज जूनअखेरीस आयएमडीबी आणि नेटफ्लिक्सवर होईल.

समीर गायकवाड sameerbapu@gmail.com संपर्क : ९७६६८३३२८३



Source link

कबीररंग: आतम ज्ञान बिना जग झूठा…

0
कबीररंग: आतम ज्ञान बिना जग झूठा…


हेमकिरण पत्की7 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

कबीरांच्या अमुक गीतातून हा दाखला दिला आहे किंवा त्यांच्या तमुक दोह्यातून तो दृष्टांत आला आहे, या विधानामागची अभ्यासकाची दृष्टी कोणती आहे, ते आपल्याला जाणवतं. खरं वाचन पुस्तकी जिज्ञासेतून होतं की, ते जीवनरसानं ओथंबलेल्या हृदयातून होतं, हा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कबीरांसारख्या फकीर वृत्तीच्या माणसाची स्थिती आपली कशी असेल! आपण कधी भौतिक वस्तूंच्या इच्छेनं तळमळत असतो, तर कधी मानसिक शांतता आणि समाधानाच्या प्राप्तीच्या इच्छेनं व्याकूळ होत असतो. आपलं मन कधीच इच्छेवेगळं नसतं. मग आपल्या मनाची तहानभूक ही कबीरांची तहानभूक कशी असेल? याचं तात्पर्य असं आहे की, आपले मूलभूत प्रश्न आपल्याला उमजायला हवेत. कबीरांनी जे प्रश्न त्यांच्या गीत-दोह्यांतून मांडले आहेत; ते त्यांच्या साधनेच्या भावस्थितीतून जन्माला आले आहेत. कबीरांचे प्रश्न, त्यांची भावस्थिती आणि अभिव्यक्ती ही सर्वथा त्यांचीच आहे. गीत-दोहे वाचताना ती आपल्यारीतीनं समजून घेणं, हे शुद्ध आकलन नाही आणि त्यांचा शब्दांपलीकडचा बोधही नाही.

स्वतःला समजून घ्यायचं असेल, तर कबीर आपल्याला सहायक होऊ शकतात, मार्गदर्शक होऊ शकतात. कबीरांचं हृद्गत आरशासारखं आहे. आपण त्यात आपलं स्वरूप पाहू शकतो. हाच तर आपल्या रंजल्या-गांजल्या मनासाठीचा अभ्यास आहे. आता कबीरांचं हे गीत पाहा… पानी बीच मीन पियासी, मोंही सुन सुन आवै हाँसी। घर में वस्तु नजर नहिं आवत, बन बन फिरत उदासी। आतम ज्ञान बिना जग झूठा, क्या मथुरा क्या कासी? आपल्या प्रापंचिक, व्यावसायिक अडचणी असलेले कितीएक श्रोते कबीरांना भेटत असावेत. त्यांच्या अडचणी त्यांच्याच परिभाषेत ऐकल्यावर कबीरांना आक्रित वाटत असावं. जलाशयातली मासोळी तहानलेली कशी? तिला तर तहान पाण्याची आणि तिच्या अवतीभवती पाणीच पाणी. मग शोष कसला, तहान कसली!

खरं ‘मी’पण न उमजलेला माणूस घराबाहेर पडतो. वनावनांत फिरतो. उदास होतो. हे ‘मी’पण त्याच्या आत असतं की बाहेर? मग हा बहिर्मुख होऊन केलेला शोध कशाचा? खऱ्या ‘मी’चा शोध घेत पद, प्रतिष्ठा, मानसन्मान, लौकिक यामागं माणूस आयुष्यभर वणवण करत फिरतो. या साऱ्या ‘मी’पणाच्या उपाधी तर असतात! त्या उपाधी जाणिवेत येत नाहीत. त्यांचे स्वच्छ आकलन होत नाही. मग मनाच्या मागं धावून धावून कुठला ठाव गाठणार! जलाशयातल्या मासोळीला आपली तहान उमजणं हाच तिच्यासाठी पाणीदार बोध असतो. मासोळीला पाण्यावेगळं अस्तित्व नाही. म्हणूनच तिच्यासाठी हा जलबोध महत्त्वाचा आहे. कबीरांनी आत्मज्ञानाचं महत्त्व विशद करण्यासाठी पाण्यात राहूनही तहानलेल्या मासोळीची प्रतिमा या गीतात योजली आहे. ती यथार्थ आहे. देहभावात रमलेला, मनोभावात हरवलेला आणि निरंतर आत्मभावाला पारखा असलेला मूढ माणूस या मासोळीसारखाच तर आहे! कबीरांनी वर्णिलेली मूढ माणसाची ही मन:स्थिती ज्यानं त्यानं स्वतः जाणून घेत घेत हृदयाच्या निवांतपणात अवश्य पाहावी अशीच आहे. पाहणाऱ्याला आत्मरूपाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.

कबीरांसारख्या संतांचे शब्द सूर्यासारखे दाहक आणि संजीवक असतात. ते अभावग्रस्त जाणिवेला जाळून टाकतात आणि भावग्राही बोध उजळवतात. तेरा साईं तुज्झ में ज्यो पुहूपन में बास। कस्तूरी का मिरग ज्यों फिर फिर ढूंढे घास।। आपल्या देहात नांदणारं चैतन्य फुलातल्या दरवळासारखं आहे. ते फुलाच्या आकारात असूनही मोकळं आहे. कस्तुरीमृगाच्या नाभीतच कस्तुरीगंध असतो आणि तरीही तो रानोमाळ धावत त्याचा शोध घेत राहतो. ही धाव त्या तहानेचा उगम न उमजलेल्या जलाशयातल्या मासोळीसारखीच तर आहे‌! तहान म्हणजे मनात निर्माण होणारी इच्छा. ती शमवायची, शमवत राहायची की, जाणत्याचा निर्देश उमजून घेऊन निवारायची, याचा विवेक आपल्याच हाती आहे, असा कबीरांचा अनुभव आहे. हे जीवनसूत्र देहात नांदणाऱ्या चैतन्याशी जोडलं, तर इच्छेला शाश्वताचा रंग येतो. मन बाहेरल्या वस्तुप्राप्तीत संतोष शोधत नाही. ते चैतन्याच्या ठायी स्थिर होतं. अर्थात ही स्थिती संतांच्या चित्ताची असते. आपलं मन सक्तीनं आत वळत नाही. शाब्दिक आकलनानं स्थिरावत नाही. कबीरांच्या गीतातल्या, दोह्यांतल्या भावदर्शनानं घटकाभर आपलं मन सुखावतं. पुन्हा प्रश्नांकित होतं, दुःखांकित होतं. कबीरांच्या वृत्तीच्या अभ्यासयोगाचं आपण निरंतर चिंतन करत राहू आणि आपल्याच भावस्थितीच्या केंद्राला आत्मभावानं पाहू तर कबीरांच्या हितोपदेशानं रसरसलेला एखादा दोहा आपली अनुभूती होईल.

हेमकिरण पत्की hemkiranpatki@gmail.com संपर्क : ९४०३७६८८९१



Source link

रसिक स्पेशल: वेगळं होताना… गोष्ट सांगतो ऐका…

0
रसिक स्पेशल: वेगळं होताना… गोष्ट सांगतो ऐका…


अरविंद जगताप7 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

गावातले दिंडीवाले अस्वस्थ होते. भाऊराव मोठा आर्थिक भारही उचलायचे. टेम्पोचा खर्च करायचे. यंदा सगळा खर्च कसा करायचा, ही पण चर्चा चालू होती. अचानक भाऊराव देवळात आले. वारकरी मंडळी जमली होती. भाऊरावनी नेहमीप्रमाणं टेम्पोचे पैसे देऊन टाकले. सगळे त्यांच्याकडं बघत राहिले. भाऊराव म्हणाले, ‘विठ्ठलाला शब्द दिलाय. माझं काम मी केलं. फक्त या वर्षी मी वारीला येणार नाही..’ भाऊराव आणि मीना पालखीसोबत चालत होते… दरवर्षी वारीला जाण्याचा नेम चुकला नव्हता. गेली दहा वर्षे दोघं वारीला जात होती. यंदा गावात कुणालाच वाटलं नव्हतं की दोघं वारीला जातील. कारणही तसंच होतं. गेले चार-पाच महिने नवरा-बायको एकमेकांशी बोलत नव्हते. खूप वर्षे लांबत राहिलेल्या वाटण्या यावर्षी झाल्या. भाऊराव आणि भाऊ गणेश. बहीण नाही. गणेश भाऊरावचा लाडका. त्यात जरा तब्येतीनं नाजूक. भाऊरावांनी त्याला शिकवायचा प्रयत्न केला, पण शिकला नाही.

भाऊराव आणि गणेश दोघे शेतीच करतात. भाऊराव राजकारणात असल्यानं त्यांची पत मोठी. सरपंचही होते. त्यांनी वाटणीच्या वेळी आठ एकरातली पाच एकर शेती गणेशच्या नावावर केली. आणि तिथंच भडका उडाला. मीना संतापली. कधीपर्यंत भावाचे लाड करणार? त्यात भाऊरावला दोन मुली. मीनाच्या डोक्यात त्यांच्या भविष्याचा विचार. शेतीत दर दोन वर्षाला नुकसान ठरलेलं. पुढचं कुणी सांगितलंय? बरं शेती जास्त दिली ती दिली, भाऊरावनी वाडा पण भावाला दिला. त्यांचं कारण सरळ होतं. त्यांनी नवीन घर बांधलं होतं. ते तिथंच राहणार होते. पण, मीनाचा जीव वाड्यात अडकला होता. दोन खोल्या तरी आपल्याकडं ठेवल्या पाहिजे होत्या, असं तिला वाटत होतं. वाटण्या चालू असताना खूप वेळ ती गप्प राहिली. पण, शेवटी न राहवून बोललीच. ‘वाड्यात दोन खोल्या पाहिजेत,’ म्हणाली. भाऊराव संतापले. बायको पहिल्यांदा त्यांच्या विरोधात बोलली होती. ती पण चारचौघात. आजपर्यंत कधी त्यांना मीनाचा एवढा राग आला नव्हता. त्यांनी तिला इशाऱ्यानं गप्प राहायला सांगितलं. पण, ती बोलत राहिली. भाऊराव भडकले. त्यांनी चारचौघात तिला नको ते बोलायला सुरुवात केली. एवढ्या जोरात ओरडले की, मीना तिथंच रडायला लागली. गणेशने मोठ्या भावाला समजवण्याचा प्रयत्न केला. पण, भाऊराव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी मीनाला उठून जायला सांगितलं. मीना रडत निघून गेली.

भाऊरावनी जसं ठरवलं होतं, तशीच वाटणी झाली. पण, मीना रागावून थेट माहेरी निघून गेली. सतरा-अठरा वर्षांच्या संसारात पहिल्यांदा नवऱ्याला न विचारता मीना माहेरी गेली. घरचे सगळे हैराण झाले. मीनाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, ती ऐकायला तयार नव्हती. ज्या घरात फक्त कौतुक ऐकायची सवय होती, त्या घरात शिव्या ऐकाव्या लागल्या. चारचौघात. खूप दुखावली होती बिचारी. तरीही तिला आशा होती की, भाऊराव तिला न्यायला येतील. समजूत घालतील. पण, आठवडा झाला तरी भाऊराव आले नाही. घरच्यांनी फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला. पण, भाऊरावही जिद्दीला पेटले होते. त्यांनाही खूप राग आला होता. ते माघार घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. छोटा भाऊ गणेश समजूत काढत होता. खरं तर त्याला वाटणी नको होती. पण, भाऊरावनी मनानेच ठरवलं होतं. वाटण्या करायच्या. गणेशला कारण माहीत नव्हतं. बिचाऱ्याला वाटलं आपली काही वागण्यात चूक झाली का? त्यानं तसं विचारलही होतं. पण, भाऊरावचं कारण वेगळं होतं. जिल्हा परिषदेच्या कामाला शहरात गेले होते. एका सदस्याच्या कारमध्ये. आणि रात्री कारला अपघात झाला. नशीब बलवत्तर होतं म्हणून वाचले. ड्रायव्हर जागीच ठार झाला होता. भाऊरावनी घरी कुणाला सांगितलं नाही. तसा मुका मार होता म्हणून कुणाला लक्षात आलं नाही. पण, ड्रायव्हरच्या गावी दहाव्याला भांडण सुरू झालं. त्याच्या बायका-पोरांना उघड्यावर पडायची वेळ आली. त्यांच्या नावावर काही नव्हतं. भाऊराव अस्वस्थ झाले. गणेशच्या नावावर शेती असली पाहिजे, असं त्यांना वाटू लागलं. जिवाचं काही खरं नाही, असं अचानक त्यांना वाटू लागलं. आणि घाईघाईत वाटणी उरकून घेतली.

मीना माहेरी जाऊन तीन महिने होऊन गेले. आता पावसाळा जवळ आला. शेतीतली कामं अडली होती. पण, भाऊराव अजूनही रागातच होते. त्यांनी मीनाला बोलवणं पाठवलं नाही. स्वतःही गेले नाहीत. पण, वारीचा दिवस जवळ आला तसं त्यांनाही अस्वस्थ वाटू लागलं. गेली दहा वर्षे त्यांनी वारी चुकवली नव्हती. नवरा-बायको सोबत जायचे. गावातले वारकरी एकमेकांत विचारपूस करू लागले. भाऊराव येणार का? पण, कुणी त्यांना विचारायला गेलं नाही. विचारणार कसं? सगळ्यांना दिसत होतं. मीना माहेरी निघून गेलीय. बोलण्यातून कुणाला वाटत नव्हतं की पुन्हा ती परत येईल. घर फुटलं होतं. मुली पण माहेरीच होत्या. खूपदा डोळ्यात पाणी यायचं भाऊरावच्या. पण, मीनाला आणायचा विषय काढला की ओरडायचे. गावातले दिंडीवाले अस्वस्थ होते. भाऊराव मोठा आर्थिक भारही उचलायचे. टेम्पोचा खर्च करायचे. यंदा सगळा खर्च कसा करायचा, ही पण चर्चा चालू होती. अचानक भाऊराव देवळात आले. बाकी वारकरी मंडळी जमली होती. भाऊरावनी नेहमीप्रमाणं टेम्पोचे पैसे देऊन टाकले. सगळे त्यांच्याकडं बघत राहिले. भाऊराव म्हणाले, ‘विठ्ठलाला शब्द दिलाय. माझं काम मी केलं. फक्त या वर्षी मी वारीला येणार नाही..’ सगळ्यांना धक्का बसला. ते भाऊरावला आग्रह करू लागले. ‘तुम्ही आले नाही तर दिंडी जाणार नाही,’ म्हणू लागले. ‘दोघं जोडीनं यायचं..’ बायका म्हणू लागल्या.. ‘सगळं विसरून जायचं. एकदा विठ्ठलाच्या दारी चला दोघं. विठ्ठलाला फैसला करू द्या.. वारीतून परत येताना तुम्हाला दोघाला वाटलं की नाही सोबत राहायचं, तर आम्ही काही म्हणणार नाही. पण, एवढी वारी करा. देवानी जोडी जमवलीय. देवाला ठरवू द्या..’

भोळीभाबडी माणसं. त्यांना सोन्यासारखा संसार मोडताना बघवत नव्हता. देवाच्या नावानं भाऊरावला बोलायची हिंमत करत होते. खूप आग्रह झाल्यावर भाऊरावने मान डोलवली. गणेशने वहिनीला फोन केला. आणायला गेला. वारीच्या दिवशी मीना घरी आली. नवरा-बायको सोबत निघाले. मनात खूप गाऱ्हाणी होती एकमेकांविषयी. पण, टाळ वाजू लागला की विसरून जायचे काही वेळासाठी. अर्थात पहिल्यासारखं बोलणं नव्हतं. ‘हो’ ला ‘हो’ करत होते. भाऊराव पुरुष मंडळीत आणि मीना महिला मंडळीत. असाच प्रवास चालू होता. जेवायला कधी एकत्र बसायचे. या वेळी भाऊरावचे पाय दुखू लागले. सुजले होते. मीना बळजबरीने ते दाबून द्यायची. पण, बोलणं नाही. उलट दुरावा वाढतच चालला होता. सगळे जोडीने फोटो काढत होते. पण, भाऊराव आपल्यासोबत फोटो काढायला जवळ उभे राहत नाहीत, याचा मीनाला जास्त त्रास होत होता.

पंढरी जवळ आली. सोबतचे वारकरी समजून चुकले की, ही जोडी काही पुन्हा जमणार नाही. दोघंही हट्टाला पेटलेले. शेवटी सगळं विठ्ठलाच्या हाती सोपवून वारकरी चालत राहिले. भाऊरावसोबतचे लोक पण तेच करत होते. पंढरीत चंद्रभागेमध्ये स्नान करून दर्शनाच्या रांगेत उभे राहिले. सगळ्यांना विठ्ठलाला भेटायची ओढ लागली होती. दशमीला मध्यरात्रीच्या सुमारास भाऊराव, मीना अन् गावकरी देवळाच्या दारी पोहोचले नि दर्शन रांग एकदम थांबली. मग अचानक जाहीर झालं की, मुख्यमंत्र्यांसोबतची पूजा करण्याचा मान भाऊराव आणि मीनाला मिळणार! हे ऐकून गावातल्या वारकऱ्यांना आनंदानं वेड लागायचं बाकी राहिलं. भाऊराव आणि मीना विठ्ठल-रुखमाईपुढं उभे राहिले आणि एकएकी लहान मुलासारखं रडू लागले. मुख्यमंत्री गोंधळून गेले. कमरेवर हात ठेवलेल्या विठुरायानं मिटल्या डोळ्यातूनही आपल्याकडं बघितल्यासारखं वाटून भाऊराव अन् मीना सगळं भांडण विसरून गेले. दुसऱ्या दिवशी दोघांचा फोटो पेपरच्या पहिल्या पानावर छापून आला. भाऊराव म्हणाले, ‘आपल्या मनात वेगळं व्हायचं होतं. पण, विठ्ठलाच्या मनात वेगळंच होतं..’

अरविंद जगताप jarvindas30@gmail.com



Source link

रसिक स्पेशल: माझिये जातीचें मज भेटो कोणी…

0
रसिक स्पेशल: माझिये जातीचें मज भेटो कोणी…


प्रवीण दशरथ बांदेकर7 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • लोक-संचित

आजकालच्या दिवसांत संवेदनशील असणं, विवेकनिष्ठ विचार करणं, सामान्यांच्या बाजूनं विचार करणं हे एकूण त्रासदायकच ठरू लागलंय. अशा वेळी आपले जवळचे मित्र, नातेवाईक, अगदी घरातली माणसंदेखील आपल्याकडं संशयानं बघू लागतात. एखाद्या अन्यायग्रस्ताच्या बाजूनं बोलणं म्हणजे व्यवस्थेच्या, शासनाच्या विरोधात बोलणं, असा त्यांचा समज होतो. आपण असं करून त्यांच्या सुखासमाधानानं, आनंदानं, शांतपणे जगण्यामध्ये अडथळे निर्माण करतोय, असं त्यांना वाटतं. अलीकडे काय बिघडलंय कळत नाही, पण सतत चिडचिड होत असते. कारण काही कळत नाही. खरं तर, कारण असं काही नसतंच. कुणी आलं, गेलं, फोन वाजला, लाइट गेला, फुलझाडाची पानं किडीनं कुरतडली, पाऊस लांबला; काहीही झालं तरी जिवाचा नुसता संताप संताप होत राहतो. हे असं वैतागत राहणं, त्रागा करणं निरर्थक आहे, काहीही फरक नाही पडायचा आपल्या आदळाआपट करण्याने, हेही कळत असतं. असं करून आपण आपलंच आयुष्य कमी करून घेतोय, असंही मनात येत राहतं. मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या एका मित्राला म्हटलं, ‘काय करायचं सांग, सगळ्याच गोष्टींचा त्रास होऊ लागलाय!’

तो म्हणाला, ‘उदाहरणार्थ, नेमका कशाकशाचा त्रास होतोय ते तरी सांग. म्हणजे मलाही विचार करता येईल, जमलंच तर तुला काही सल्ले देता येतील.’ मी म्हटलं, ‘असं एक असेल तर सांगता आलं असतं. पण जवळपास प्रत्येक गोष्टीचाच त्रास होतो. चिडचिड होते. आदळआपट करावीशी वाटते. आता हेच बघ ना, ते एक म्हातारं जोडपं माझ्या आधीपासून येऊन बसलंय. ती प्रौढाही कधीपासून तिष्ठत असावी. पण, मी तुझा मित्र म्हणून तू लगेच मला आत बोलावलंस. मीही सुखावून, बाकी काही विचार न करता आत आलो. पण, त्यामुळेही कुठे तरी आतल्या आत धुसफूस सुरू झालीय. तलवारी खणखणू लागल्यात. माझंच मन विचित्र झालंय बहुतेक. एकीकडे, मित्राने बाकीच्या अपॉइंटमेंट बाजूला ठेवून लगेचच वेळ दिला, यामुळे मला बरंही वाटतंय. आपण कुणी तरी विशेष आहोत, आपला वेळ महत्त्वाचा आहे, हे आपला मित्र जाणतोय, याचं समाधान वाटतंय. तर दुसरीकडे वाटतंय, माझ्या आधीच्यांना डावलून मला बोलवायला मी एवढा कोण मोठा लागून गेलोय? साधा लेखकच तर आहे. डॉक्टरचा मित्र असलो म्हणून काय झालं? इतरांचाही वेळ तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांचेही प्रॉब्लेम गंभीर असू शकतात. मी थोडा वेळ थांबतो, तू आधी बाकी पेशंटना बघ, असंही म्हणता आलं असतं. पण, हे का नाही सुचलं मला? प्रत्येक वेळी आपल्यातला स्वार्थी, अप्पलपोटी घटक का डॉमिनंट होतो बाकीच्या चांगुलपणाच्या घटकांवर? म्हणजे मला वाटतं, मला हे हवंय आणि नकोयसुद्धा. आपल्या प्रत्येक कृतीला नैतिक-अनैतिक, पाप-पुण्याच्या तराजूत घालून नको तितका कीस पाडत बसायची सवय लागलीय. एक असं काहीच ठामपणे ठरवता येत नाही. मग ते बरं असेल किंवा वाईट, समाज-परंपरेला मान्य असेल वा नसेल; पण त्याबद्दल मला काय वाटतंय, ते नक्की करायला हवं ना? हेही हवं, तेही हवं, असं करता करता जगण्यातील कुठल्याच गोष्टीचा निखळ, स्वच्छ आनंद घेता येत नाहीय.’

मित्र शांतपणे ऐकत होता. मी बोलायचा थांबल्यावर माझ्याकडे पाहत स्मित करत म्हणाला, “आमच्या मानसशास्त्राच्या परिभाषेत याला हे हे असं असं म्हणतात. हे असं फक्त तुझ्याच बाबतीत होतंय असं नव्हे, तर जवळपास प्रत्येक संवेदनशील आणि अतिविचार करणाऱ्या माणसांना हे भोगावं लागतंय. वैयक्तिक पातळीवर आपण बरेचसे दुर्बल असतो. हतबल असतो. कराल दातांनी सर्वच बऱ्या-वाईट गोष्टींचा घास घ्यायला टपलेल्या विक्राळ व्यवस्थेच्या विरोधात आपण काही करू शकत नाही, ही गोष्ट आपल्याला अस्वस्थ करीत असते. आपलं सामान्य असणं, सत्ताहीन वा अधिकारहीन असणं, आपल्याला पावलोपावली जाणवत असतं. त्यामुळेच बहुधा, आपल्यावर अन्याय होतोय, आपल्याला चिरडायला सगळे जण टपलेत, अशी एक सूक्ष्म पातळीवरची भीती आपल्या अंतर्मनात नेहमीच असते. संधी मिळेल तेव्हा डॉमिनंट होऊन जगावर सूड उगवायची भावनाही यातूनच जन्मत असावी. पण, आपला मूळचा चांगुलपणा आपल्याला जाणीव करून देतो, हे असं करणंही ठीक नाहीय, यात आपण फक्त आपला विचार केला, पण आपल्यासारख्या इतर सामान्यजनांचं काय? त्यांना का वेठीस धरावं आपण? हा आपला सबकॉन्शसनेस अनेक पिढ्यांच्या संस्कारांची पुटं चढलेला आहे. ती पुटं खरडून काढून नितळ, स्वच्छ होणं परवडणारं आहे का आपल्याला? अर्थात, हे सगळं इतकं साधं-सरळंही आहे, असं नाही म्हणता येणार. आजच्या वर्तमानाइतकंच गुंतागुंतीचं आहे सगळं. असंख्य कंगोरे असतात आपल्या जगण्याला, एकमेकांत मिसळून गेलेले कैक घटक असतात. ते असे सुटे सुटे करू पाहणं आणि काही निष्कर्ष काढणं तसं अवघडच आहे. तू लेखक आहेस, त्यामुळे मला नेमकं काय म्हणायचंय, हे तुला चांगलं कळू शकेल.’

मित्राचं म्हणणं थोडं फार पटत होतं. आजकालच्या दिवसांत संवेदनशील असणं, विवेकनिष्ठ विचार करणं, सामान्यांच्या बाजूनं विचार करणं हे एकूण त्रासदायकच ठरू लागलं होतं. अशा वेळी आपले जवळचे मित्र, नातेवाईक, अगदी घरातली माणसंदेखील आपल्याकडं संशयानं बघू लागतात. एखाद्या अन्यायग्रस्ताच्या बाजूनं बोलणं म्हणजे व्यवस्थेच्या, शासनाच्या विरोधात बोलणं, असा त्यांचा समज होतो. आपण असं करून त्यांच्या सुखासमाधानानं, आनंदानं, शांतपणे जगण्यामध्ये अडथळे निर्माण करतोय, असं त्यांना वाटतं. सरकार कधी चुकत नाही, सरकारचे सगळे निर्णय लोकांच्या हिताचेच असतात, अशी त्यांची ठाम समजूत असते. तिकडे दिल्लीत शेतकऱ्यांनी सरकारच्या काही निर्णयांच्या विरोधात मोर्चा काढला आणि आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं किंवा आपल्या कोकणातल्या एका गावात गाववाल्यांच्या विरोधाला न जुमानता एखादा प्रकल्प लादला जातोय म्हणून आपण गाववाल्यांच्या बाजूने उभे राहिलो, काही महिला खेळाडूंनी आपलं लैंगिक शोषण होतंय म्हणून सरकारमधल्या एखाद्यावर आरोप केले आणि आपण त्या खेळाडूंची बाजू घेत सरकारच्या सोयिस्कर मौन पांघरण्याच्या वृत्तीचा निषेध केला किंवा आपल्याच राज्यातल्या एका दलित तरुणाची क्षुल्लक आणि खोट्या आरोपावरून हत्या झाली, त्याविषयी आपण बोलू लागलो, तर प्रत्येक वेळी आपल्या या जवळच्यांना आपल्या कृतींचा त्रास होऊ लागतो. ही आपली माणसं मनानं आपल्यापासून दूर जाऊ लागतात. हळूहळू नात्यांच्या घट्ट विणीतून उसवत, तुटत जातात. आपल्याला हे जाणवत असतं नि आपली प्रचंड चिडचिड होत असते. तुम्ही जाणूनबुजून स्वीकारलेलं हे आंधळेपण बाजूला सारून जरा स्वच्छ नजरेनं या घटनांकडे पाहा, कोण चूक कोण बरोबर हे सोडून द्या, पण किमान काही माणुसकी आणि संवेदनशीलता असेल, तर या सत्ता आणि संपत्तीच्या टाचांखाली चिरडल्या जाणाऱ्या लोकांचाही विचार करून पाहा, असं आपण कुणाला समजावू गेलो, तरी लोक विचित्रपणे आपल्याकडे पाहू लागतात. आपल्याला टाळू लागतात.

आणि आपल्याला तर त्यांच्यासारखं डोळे मिटून घेत, स्वतःपुरतं पाहत जगता येत नाहीय. त्रास होतोय तो याच गोष्टीचा. चिडचिड होतेय, ती याच अवतीभवतीच्या माणसांच्या बथ्थडपणामुळे. हे या डॉक्टर मित्राला तरी काय सांगणार? तो पुन्हा एखादं मानसशास्त्रीय किचकट नाव सांगून हे हे असं असं आहे म्हणणार. पण, माझी अस्वस्थता ही त्या पलीकडची आहे. तुकोबांसारखं ‘माझिये जातीचें मज भेटो कोणी..’ असं म्हणत अस्वस्थपणे तळमळणंच जर आपल्या अस्तित्वाची निजखूण असेल, तर त्या गोष्टीला निमूटपणे सामोरं गेल्यावाचून गत्यंतर नाही. तोवर आपण आपलं बिघडलेल्या गोष्टींविषयी उच्चरवात बोलत राहावं, हेच बरं.

प्रवीण दशरथ बांदेकर samwadpravin@gmail.com



Source link

रसिक स्पेशल: मानवतेची वैश्विक वारी

0
रसिक स्पेशल: मानवतेची वैश्विक वारी


डॉ. श्रीरंग गायकवाड7 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

पंढरीच्या वारीमागे एक वैश्विक विचार आहे. जगात जेव्हा युद्ध, हिंसा, द्वेष, विखार पसरवणाऱ्या घटना घडतात, तेव्हा या वारकरी विचारांची मानवाला गरज भासते. हा विचार आहे मानवतेचा, बंधुभावाचा, शांती-प्रेमाचा! तो जगभर पोहोचवण्याचा ध्यास भास्कर हांडे या जागतिक कीर्तीच्या एका मराठी चित्रकाराने घेतला आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने समता-सलोख्याच्या परंपरेचा वेध घेणाऱ्या या दुसऱ्या लेखातून डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी भास्कर हांडे यांच्या चित्र-शिल्परूपातील वैश्विक संतकार्याला दिलेले शब्दरूप… दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील सर्वात रक्तरंजित युद्ध लढले गेले इराक आणि इराण या दोन देशांदरम्यान. आठ वर्षे चाललेल्या या युद्धात लाखो लोकांना जीव गमवावा लागला. असंख्य लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. यातील बहुतेक लोक युरोपात आले. युरोपातील देशांनी या स्थलांतरितांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्यातील कलाकारांना हॉलंडमध्ये व्यासपीठ देण्याचा प्रयत्न सुरू झाला. ‘80 क्वेशन्स’ नावाच्या संस्थेने त्यासाठी ‘शो युवर होप’ नावाचा उपक्रम सुरू केला. त्यासाठी देशात यापूर्वी स्वेच्छेने आलेल्या कलाकारांची मदत घेण्यात आली. या कलाकारांमध्ये पुण्यातील चित्रकार भास्कर हांडे होते. हांडे 1982 मध्ये हॉलंडमध्ये गेले होते. हॉलंड सरकारने देशात स्थायिक झालेल्या हांडे आणि त्यांच्यासारख्या इतर कलाकार, शिल्प-चित्रकारांना आवाहन केले. युद्धपीडितांना तेथील समाजात सामावून घेण्यासाठी काय करता येईल, याबद्दल विचारणा केली. त्याला प्रतिसाद देत हांडे आणि त्यांचे कलाकार मित्र ‘शो युवर होप’मध्ये सहभागी झाले. त्यात प्रामुख्याने चित्रकारांकडून चित्रे काढून घेण्याचा उपक्रम सुरू झाला. चित्रांच्या माध्यमातून ते व्यक्त होऊ लागले. सोसाव्या लागलेल्या युद्धाच्या झळांचे अनुभवकथन करू लागले. युद्ध होऊ नये, शांततेने सहजीवन जगता यावे म्हणून काय करता येईल, याबाबतचे विचार ते चित्रांच्या माध्यमातून कॅन्व्हासवर उतरवू लागले. हे काम पुढे नेताना भास्कर हांडेंना प्रेरणा मिळाली, ती भारतातील बंधुभाव सांगणाऱ्या वारकरी विचारांची. हांडेंनी सांगितलेले हे विचार त्या परदेशी कलाकारांनाही आपले वाटले. साडेसातशे वर्षांपूर्वी हे मानवतेचे विचार सांगत संत नामदेवांनी देशभर भ्रमंती केली होती. सततची आक्रमणे, वारंवारची युद्धे यातून उसवणारी सामाजिक वीण त्यांनी प्रेमविचारांच्या धाग्याने पुन्हा शिवली होती. त्यासाठी हातात कुठलेही शस्त्र नसलेला, समता, ममता, विश्वकल्याणाचे प्रतीक असणारा पंढरपूरचा सावळा विठोबा त्यांनी जणू चालताबोलता केला होता. या विचारांचा पाया घालणारे संत ज्ञानेश्वर यांचे ‘भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचें॥’ हे पसायदान देशभर रुजवत होते. अशा संतशिरोमणी नामदेवरायांचा आदर्श समोर ठेवून हांडे त्यांच्या पुणे येथील ‘वैश्विक कला पर्यावरण’च्या माध्यमातून ‘गिव्ह अँड टेक’ या प्रकल्पाच्या रूपाने पूर्वीच कार्यरत होते. त्याअंतर्गत भारतातील कलाकार हॉलंडमध्ये आणि हॉलंडचे कलाकार भारतात येऊन परस्पर विचार, संस्कृतीची देवाण-घेवाण करत होते. त्याद्वारे एकदा इजिप्त, इस्रायल, इराक, हॉलंड, बेल्जियम या पाच देशांतील चित्रकार पुण्यात आले होते. त्यांनी वारीचा उगम असलेल्या आळंदी, देहू या ठिकाणी भेट दिली होती. एकोप्याच्या वारकरी विचाराने नांदणाऱ्या इथल्या समाजाचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले होते. त्या कलाकारांच्या अनुभवावर तीन पुस्तकेही डच, इंग्रजी आणि मराठी भाषेत प्रकाशित झाली. या उपक्रमाच्या अनुभवाचा उपयोग हांडे यांना ‘शो युवर होप’ हा प्रकल्प उभा करताना झाला. स्थलांतरित कलाकारांचे सेमिनार सुरू झाले. त्यात त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे व्यक्त होण्याची संधी मिळाली. त्यांनी चितारलेल्या चित्रांमध्ये होती, केवळ मानवी करुणा आणि शांतिपूर्ण सहजीवनाची आशा! मग ही चळवळ जगभर पोहोचवण्याचे नियोजन झाले. चित्रकारांनी काढलेल्या सर्व चित्रांचे जगभर प्रदर्शन करणे आणि त्या निमित्ताने प्रत्येक देशातील चित्रकारांना या शांतियात्रेत जोडून घेणे सुरू झाले. हांडेंच्या सूचनेवरून या चित्रांची वारी भारताकडे निघाली. हॉलंड, जर्मनी, बल्गेरिया, टर्की, ऑस्ट्रिया, जॉर्जिया, इराण आणि भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाघा बॉर्डरवरून ही चित्रवारी भारतात दाखल झाली. भारतातील अमृतसर, चंदीगड, दिल्ली, आग्रा, जयपूर, अहमदाबाद, बडोदा, नाशिक, पुणे, मुंबई, गोवा, बंगळुरू या शहरांमध्ये ही प्रदर्शने झाली. या प्रदर्शनात युद्धाच्या खाईत होरपळलेल्या स्थलांतरित चित्रकारांची 100 निवडक चित्रे होतीच, परंतु प्रदर्शन ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणच्या स्थानिक चित्रकारांनाही यात सामावून घेण्यात आले. 2022 मध्ये हॉलंडच्या एन्ड होपन या शहरात या उपक्रमातील निवडक चित्रांचे ‘आर्टिस्ट फ्रॉम अराऊंड द वर्ल्ड’ हे प्रदर्शन पार पडले.

‘शो युवर होप’मध्ये जगभरातील हजारभर चित्रकार सहभागी झाले आहेत. त्यांच्या अभिव्यक्तीतून मानवतेचा विचार जागवला जात आहे. हाच विचार सांगणारी ‘पंढरीची वारी” काय आहे, हे जगभरातील लोकांना समजावे म्हणून हांडेंनी पंढरीची वारी आणि पालखी सोहळ्यावर “पालखी सोहळा 325 वर्षे’ हे मराठी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तक लिहिले. 2018 मध्ये ‘Pilgrimage VARI : Dehu-Alandi to Pandharpur’ हे इंग्रजी भाषेतील पुस्तकही त्यांनी लिहिले. लंडनमधील नेहरू सेंटरमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले. तिथे उपस्थित असलेल्या ब्रिटिश मंडळींना वारीच्या परंपरेबद्दल मोठे कौतुक वाटले. अशी पायी वाटचाल करत शांतता, सलोख्याचा संदेश देणारी वारी प्रत्येक देशात निघायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या मताला अनुसरून युरोपात गेलेल्या मराठी लोकांनी आता तेथेच वारी सुरू केली आहे. हांडेंच्या पुस्तक प्रकाशनाचे आयोजक असलेले, इंग्लडमध्ये राहणारे अनिल खेडकर या ‘ग्लोबल वारी’चे प्रणेते आहेत. आषाढी वारीसाठी देहू-आळंदीहून संतांच्या पालख्या प्रस्थान ठेवतात, त्याच वेळी खेडकर आणि त्यांची मित्रमंडळी संतांच्या विचारांचे स्मरण करत, आपापल्या शहरांमध्ये पायी चालू लागतात. पंढरीच्या वारीत वारकरी रोज जेवढे अंतर चालतात, तेवढेच अंतर ही मंडळी चालतात. असे दररोज चालणाऱ्या सदस्यांची नावे आणि त्यांचे अंतर यांची नोंद एका एक्सेल शीटमध्ये ठेवली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी इंग्लंडमधील ग्लोबल वारीचे सदस्य प्रत्यक्ष आणि ऑनलाइनच्या माध्यमातून लंडनसारख्या मध्यवर्ती ठिकाणी एकत्र जमतात आणि वारीचा समारोप करतात. तिथे जमलेल्या लोकांना, मुले-तरुणांना संतांचा समतेचा विचार समजावून सांगितला जातो. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. या सर्व प्रवासात भास्कर हांडेंच्या सुप्रसिद्ध ‘तुझे रूप, माझे देणे’ या चित्र-शिल्प प्रदर्शनाचाही मोठा वाटा आहे. हे प्रदर्शन घेऊन १९९५ पासून ते जगभर फिरत आहेत. या प्रदर्शनात संतांच्या; विशेषत: तुकोबारायांच्या अभंगातील विचार सांगणारी चित्रे आणि शिल्पे आहेत. ती हांडेंनी स्वत: साकारली आहेत. त्यातील विश्वबंधुत्वाचा विचार जगभरातील माणसांच्या हृदयाला हात घालतो आहे. त्यातून युद्धापेक्षा परस्परांवर प्रेम करणाऱ्या आनंददायी सहजीवनाची गरज जगाच्या लक्षात येऊ लागली आहे. या वैश्विक संतकार्यात आपण खारीचा वाटा उचलतो आहोत, याचे भास्कर हांडेंना अतीव समाधान आहे.

डॉ. श्रीरंग गायकवाड dnyanabatukaram@gmail.com संपर्क : ९८३३६६१४४३



Source link

रसिक स्पेशल: भारत – अमेरिका संबंध : संभ्रम, विभ्रम अन् वास्तव

0
रसिक स्पेशल: भारत – अमेरिका संबंध : संभ्रम, विभ्रम अन् वास्तव


डॉ. रोहन चौधरी7 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात झालेले व्यापार-उद्योग, संरक्षणविषयक आणि अन्य करार-मदार उपयुक्त असले, तरी जागतिक राजकारणात भारताचे नि:संदिग्ध आणि निर्णायक स्थान निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी भारताला आपल्या परराष्ट्र धोरणातील संदिग्धता दूर करून त्यात वास्तववादी दृष्टिकोन आणावा लागेल. तसे झाले आणि त्यातून आगामी काळात अमेरिकेने भारताला संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी समितीत स्थान देण्यासाठी आपली इच्छाशक्ती यशस्वीरीत्या वापरली, तर हा दौरा खऱ्या अर्थाने ‘ऐतिहासिक’ ठरेल. भारतीय माध्यमांमध्ये भारत-अमेरिका संबंधांची जेवढी जास्त चर्चा होते, तेवढी जास्त चर्चा क्वचितच इतर देशांशी असलेल्या संबंधांची होते. परराष्ट्र धोरणात राष्ट्रीय हिताऐवजी राजकीय हितांना अधिक प्रकाशझोतात ठेवण्याच्या काळात हे नैसर्गिक असले, तरी त्यामुळे परराष्ट्र आणि संरक्षण धोरणासारख्या संवेदनशील विषयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होण्याचा धोका असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात कमी-अधिक प्रमाणात हेच घडले. द्विपक्षीय संबंधांचे यश, हेतू किंवा साध्य हे व्यक्तिगत पातळीवर न मोजता बदलत्या जागतिक परिस्थितीशी ते कसे सुसंगत आहे, या आधारावर तपासले पाहिजे. या दृष्टिकोनातून पंतप्रधानांच्या या अमेरिका दौऱ्याकडे पाहावे लागेल. नरसिंह राव ते नरेंद्र मोदी या सर्व पंतप्रधानांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध सुधारण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे प्रथमतः मान्य करून या दौऱ्याची गोळाबेरीज करावी लागेल. मोदींच्या दौऱ्यात झालेले महत्त्वाचे करार, दौरा सर्वसमावेशक राहील, याचे केलेले सूक्ष्म नियोजन, अमेरिकी संसदेतील पंतप्रधानांचे भाषण यावरून द्विपक्षीय संबंध किती विशेष आहेत, याची प्रचिती येते. बायडेन यांनी भारतीय पंतप्रधानांच्या दौरा ‘अविस्मरणीय’ राहील, याचीदेखील खूप चांगल्या प्रकारे तजवीज केली, याबद्दल दुमत नाही. परंतु, द्विपक्षीय संबंधांत असणारे हे सातत्य जागतिक राजकारणाला कशा प्रकारे कलाटणी देणार, यावर या दौऱ्याचे यशापयश अवलंबून असेल.

मोदींच्या या औपचारिक अमेरिका दौऱ्यापूर्वी जागतिक राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अमेरिकेचा अफगाणिस्तानातील मानहानिकारक पराभव, लांबलेले रशिया-युक्रेन युद्ध, पाकिस्तान – चीन – रशिया यांची उदयाला येत असणारी भागीदारी, सौदी अरेबिया – चीन – इराण यांच्यातील नवी समीकरणे, भारताचा नवा अलिप्ततावाद, जागतिक आर्थिक संकटांना हाताळण्यात अमेरिकाप्रणीत जागतिक वित्तीय संघटनांना आलेले अपयश, संयुक्त राष्ट्रांची अगतिकता अशा कारणांमुळे जग अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभे आहे. अशा स्थितीत जागतिक राजकारणाचा लंबक कोणत्या बाजूला झुकेल, याबाबतीत कमालीची अनिश्चितता आहे. या अनिश्चिततेत भारत-अमेरिका यांच्या परस्परविरोधी दृष्टिकोनाची भर पडली आहे.

जागतिक व्यवस्था ही नियमाधिष्ठित असली पाहिजे, यावर उभय देशांमध्ये एकमत आहे. परंतु, ती कशा प्रकारे आणली पाहिजे, याबाबत दोघांमध्ये मतभेद आहेत. अमेरिकेची जागतिक महत्त्वाकांक्षा ही परिस्थितीनुसार बदलत असते. जो देश किंवा समूह अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देईल, तो तिचा शत्रू क्रमांक एक असतो. जो आपल्याबरोबर नाही, तो आपला विरोधी हा अहंपणा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा गाभा आहे. याउलट भारताचे परराष्ट्र धोरण हे सातत्य आणि बदल यांचे अनोखे मिश्रण आहे. देशांतर्गत विकास, पाकिस्तान आणि चीन यांना प्रतिबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया आहे. मतभेदाचे हे स्वरूप हे दोन्ही देशांतील मुख्य अडथळा आहे. त्यावर या दौऱ्यात किमानपक्षी चर्चा होईल, अशी अपेक्षा होती.

वास्तविक भारताच्या राष्ट्रीय हिताकडे अमेरिकेने सातत्याने दुर्लक्ष केले, हा भारताचा आक्षेप आहे. 2001 मध्ये जागतिक दहशतवादविरोधी लढ्यात याची प्रचिती आली होती. 2001 मध्ये जेव्हा अमेरिकेला दहशतवादी हल्ल्याचा अनुभव आला तेव्हाच त्याची दाहकता त्यांना समजली. तोपर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला गोंजारण्याचेच काम केले. इतकेच नव्हे, तर हवामान बदलासारख्या अराजकीय, परंतु महत्त्वाच्या विषयावरही भारतावरच खापर फोडण्याचे अमेरिकेचे धोरण राहिले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी समितीतील आपल्या समावेशाबद्दलही तोंडी आश्वासनाशिवाय भारताच्या हाती काहीच लागले नाही. भारताच्या रशिया-युक्रेनबाबतच्या धोरणाची ‘डळमळीत’ अशा शब्दांत जो बायडेन यांनी केलेली हेटाळणी हे अमेरिकेच्या वर्चस्ववादी धोरणाचे अलीकडचे उदाहरण आहे.

भारत-अमेरिकेतील या मतभेदाला भारताचे संदिग्ध परराष्ट्र धोरणही जबाबदार आहे, अशी अमेरिकी धुरीणांची धारणा आहे. 1999 नंतर भारत बदलला असून त्याने परराष्ट्र धोरणात आदर्शवादी धोरण नाकारत वास्तववादी धोरणाचा स्वीकार केला आहे, अशी प्रतिमा तयार करायची. परंतु, प्रत्यक्षात मात्र जुनेच धोरण नाव बदलून सुरू ठेवायचे, असा भारताचा पवित्रा असल्याची प्रतिमा अमेरिकेत निर्माण झाली आहे. भारताच्या उक्तीत आणि कृतीत प्रचंड तफावत आहे, अशी अमेरिकेची भावना आहे.

उदाहरणार्थ, जागतिक शांतता आणि व्यवस्था टिकवण्यात भारत सर्वतोपरी सहकार्य करेल, असे जाहीर भाषणातून सांगायचे; पण प्रत्यक्ष कृती करताना मात्र धोरणाचा ठामपणा न दाखवणे, आण्विक प्रसार रोखण्यात बांधिलकी दर्शवूनही इराणच्या आण्विक प्रसाराविरोधात कृतिशील भूमिका न घेणे, अमेरिकानिर्मित ‘क्वाड’सारख्या चीनविरोधी रचनेमध्ये सामील व्हायचे, परंतु त्याला औपचारिक रूप येऊ नये, याचीही खबरदारी घेणे, हे भारताचे परराष्ट्र धोरण राहिले आहे. युक्रेन युद्धातदेखील याची प्रचिती अमेरिकेला आली. युक्रेन युद्धाला आणि पर्यायाने जागतिक अशांततेला पुतीन सर्वस्वी जबाबदार असूनही त्यांच्याविरुद्ध कोणतीही ठोस भूमिका न घेणे भारताने पसंत केले. या अनुभवावरून भारताच्या परराष्ट्र धोरणात काहीच बदल झालेले नाहीत, उलट त्यातून संभ्रम निर्माण होत असल्याची अमेरिकेची धारणा बनली आहे. वास्तविक भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध एका वेगळ्या उंचीवर पोहोचले असूनही उभय पक्षांतील मतभेदांचे न झालेले निराकरण हे या दोन देशांसमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे. अमेरिका वर्तमानकाळाचे भान ठेवून आपले परराष्ट्र धोरण आखत असतो. याउलट भारतीय परराष्ट्र धोरणावर भूतकाळातील विभ्रमांचा प्रभाव असतो. मोदींच्या अमेरिकी संसदेतील भाषणाचा भर ही गुंतागुंत सोडवण्यावर असायला हवा होता. रशिया-युक्रेन युद्ध असो अथवा जागतिक दहशतवाद; या समस्यांना ती स्वतःच कशी जबाबदार आहे, हे भारतीय मानवी अधिकाराविषयी गळे काढणाऱ्या अमेरिकेला सांगणे आवश्यक होते. ज्याप्रमाणे ओबामांनी भारतीय संसदेत भारतालाच जागतिक राजकारणाचे धडे दिले होते, त्याप्रमाणे मोदींनीदेखील अमेरिकी काँग्रेसला ‘ही वेळ’ युद्धाची नाही, असे सांगण्यापेक्षा ‘कोणतीच वेळ’ ही युद्धाची नसते, असे निक्षून सांगण्याची गरज होती. मोदींना अमेरिकेच्या संसदेत दुसऱ्यांदा भाषण करण्याची दुर्मिळ संधी प्राप्त झाली होती. परंतु, अमेरिकेचे कोडकौतुक आणि भारताचा आत्तापर्यंतचा प्रवास यापलीकडे ते गेले नाहीत. जागतिक राजकारणाच्या सद्य:स्थितीला अमेरिकेचे भूतकाळातील धोरणच कारणीभूत आहे, हे सांगण्याचे धाडस भारताने दाखवायला हवे होते.

अमेरिकेला कधीतरी याची जाणीव करून द्यावी लागणार आहेच. खरे तर या दौऱ्यात मोदींना तशी आयती संधी चालून आली होती. डॉ. मनमोहनसिंग यांचा 2009 चा अमेरिका दौरा किमान एका अर्थाने तरी ऐतिहासिक मानता येईल. अमेरिकेने देशातील आणि जगातील सर्व नियम शिथिल करून भारतासोबत अणुकरार केला होता. हा भारताचा नैतिक विजय होता. मोदींच्या या दौऱ्यात झालेले व्यापार-उद्योग, संरक्षणविषयक आणि अन्य करार-मदार उपयुक्त असले, तरी जागतिक राजकारणात भारताचे नि:संदिग्ध आणि निर्णायक स्थान निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी भारताला आपल्या परराष्ट्र धोरणातील संदिग्धता दूर करून त्यात वास्तववादी दृष्टिकोन आणावा लागेल. तसे झाले आणि त्यातून आगामी काळात अमेरिकेने भारताला संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी समितीत स्थान देण्यासाठी आपली इच्छाशक्ती यशस्वीरीत्या वापरली, तर हा दौरा खऱ्या अर्थाने ‘ऐतिहासिक’ ठरेल.

डॉ. रोहन चौधरी, rohanvyankatesh@gmail.com संपर्क : ९९२२९८९००६



Source link

गावकऱ्यांच्या विनंतीला मान देत मुख्यमंत्र्यांनी घेतली वृद्ध दाम्पत्याची भेट; मदतीचं आश्वासन

0


CM Eknath Shinde In Satara: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसापासून त्यांच्या साताऱ्यातील (Satara News) दरे या त्यांच्या गावी मुक्कामी आले होते. वातावरणातील बदलामुळे ते हेलिकॉप्टरने न जाता कारने मुंबईला रवाना झाले. यावेळी त्यांनी जाता जाता गावकऱ्यांनीन केलेल्या विनंतीला मान देत वृद्ध दाम्पत्याची भेट घेत मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपरी हे गाव लागले. या पिंपरी गावानजीक असलेल्या भागडी या ठिकाणी विठ्ठल गोरे यांच्या घराजवळ मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबला. यावेळी त्यांनी गोरे यांच्या अंगणात बसून कुटुंबाची विचारपूस केली. तसेच या कुटुंबाला लागणाऱ्या दैनंदिन जीवनातील वस्तूंची पूर्तता केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा एक आगळावेगळा स्वभाव उपस्थितांना अनुभवायला मिळाला. यावेळी विठ्ठल गोरे भारावून गेले होते.

कोण आहेत विठ्ठल गोरे?

विठ्ठल गोरे हे वृद्ध  दाम्पत्य आहे. या दोघांना मूलबाळ नाही. वयोवृद्ध दाम्पत्याला सध्या सांभाळ करण्यास कोणीही नाही. तसेच ते राहत असलेल्या घराची सुद्धा पडझड होत चालली आहे. ही बाब काही ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली. त्यामुळे त्यांनी आपला ताफा महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रोडकडे न वळवता विरुद्ध दिशेला असलेल्या पिंपरी गावापर्यंत नेला. त्या ठिकाणी कुटुंबाची व्यथा समजून घेत या सर्वातोपरी मदत करण्याचं जाहीर केलं.

मुख्यमंत्री रमले शेतात

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात पत्नीसह केळीची लागवड केली. त्यांनी पाच हजार केळींच्या झाडांची लागवड केली. तसेच नारळाच्या झाडांची देखील लागवड केली. मला शेतीची आवड आहे. मी प्रत्येक वेळी आलो की झाडे वाढवतो असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्नी लताताई शिंदे या देखील शेतात उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मला शेतीची आवड आहे. मी हमेशा शेताकडे येत असते. गेल्या वेळेस हळदीच्या झाडांची लागवड केली होती. यावेळेस केळीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. माझ्या मुलाला तसेच साहेबांना देखील शेतीची आवड असल्याची माहिती लताताई शिंदे यांनी दिली. 

विविध प्रकारच्या फळांची लागवड 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे या गावी शेती आहे. दरे हे सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोर्‍यातील डोंगरांमध्ये आणि कोयना धरणाच्या काठावर वसलेलं आहे. या शेतामध्ये त्यांनी आंबा, चिकू, स्ट्रॉबेरी, मोसंबी, सफरचंद, नारळ, केली या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी ते गावातील शेतीत रमतात. आपल्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीत लक्ष घालून त्यांनी आपली शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Battalion 60: एका शूर सैनिकाची कथा सांगणारा ‘बटालियन ६०’ चित्रपटाची चर्चा

0
Battalion 60: एका शूर सैनिकाची कथा सांगणारा ‘बटालियन ६०’ चित्रपटाची चर्चा


मराठमोळ्या मातीत तयार झालेल्या एका शूर वीर नायकाची कथा या चित्रपट मांडण्यात येणार आहे. शून्यापासून प्रयत्न करून हे शूर वीर कसे घडत जातात याचं हुबेहूब वर्णन या चित्रपटात करण्यात आलं आहे. नुकताच या चित्रपटाच पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या पोस्टरमध्ये पाठमोरा वीर पाहायला मिळतोय, तसेच बॉर्डरवर हातात बंदूक घेऊन सैनिक दिसत आहेत, यावरून चित्रपटात एका शूर सैनिकांची गाथा पाहायला मिळणार असल्याचं कळतंय, पाठमोरी असलेली व्यक्ती म्हणजे ‘बलोच’ फेम अभिनेता गणेश शिंदे आहे.अद्याप चित्रपटातील इतर कलाकार गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून लवकरच चित्रपटातील इतर कलाकारांची नाव समोर येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी सांभाळली आहे. तर ‘किंग प्रोडक्शन’ आणि तुषार कापरे पाटील यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे.



Source link