


महाराष्ट्र राज्य सरकारने १ मे रोजी एक राज्य, एक नोंदणी योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे नागरिकांना राज्यातील कोणत्याही सब-रजिस्ट्रार कार्यालयात मालमत्ता कागदपत्रांची नोंदणी करण्याची परवानगी मिळणार आहे. विशेष म्हणजे ती मालमत्ता कुठेही असली तरी त्याची नोंदणी एकदाच होणार आहे. मालमत्ता नोंदणी प्रक्रिया ही नागरिकांसाठी अधिक अनुकूल आणि सोईस्कर बनविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेचा मालमत्तेच्या किमती आणि कर दरांवर परिणाम होणार नाही. मात्र, मालमत्तेची खरेदी-विक्री अधिक सुरळीत आणि सुरक्षित होऊ शकते.
काय आहे हे धोरण?
आधीच्या नियमांनुसार, खरेदीदारांना मालमत्ता असलेल्या परिसरातील सब-रजिस्ट्रार कार्यालयात त्यांच्या कागदपत्रांची नोंदणी करणे आवश्यक होते. म्हणजेच जर तुम्ही पुण्यात घर खरेदी केलं असेल, तर तुम्ही संबंधित सब-रजिस्ट्रार कार्यालयातच व्यवहाराची नोंदणी करू शकता. त्यामुळे कार्यालयांतील वेळखाऊ गर्दी, प्रक्रियेत विलंब व लॉजिस्टिक या सगळ्याचीच गैरसोय होत असे.
नवीन धोरणामुळे ठिकाणासंदर्भातील तसेच इतर अडचणीही दूर होतील. यापुढे तुम्ही पुणे, नागपूर किंवा नाशिकमध्ये मालमत्ता खरेदी करीत असलात तरी तुम्ही तुमच्या सोईनुसार महाराष्ट्रातील कोणत्याही सब-रजिस्ट्रार कार्यालयात मालमत्तेच्या कागदपत्रांची नोंदणी करू शकता. हा बदल सुरुवातीला मुंबईत करण्यात आला. त्यानंतर १ एप्रिलपासून त्याची पुणे आणि ठाण्यात अंमलबजावणी करण्यात आली. एकंदर पुण्यातील ४९ आणि ठाण्यातील २७ कार्यालये आधीपासून या प्रणालींतर्गत कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारने १ मेपर्यंत सर्व ५१९ सब-रजिस्ट्रार कार्यालयांना समाविष्ट करून टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी अंमलबजावणीची योजना तयार केली आहे. हे धोरण प्रामुख्याने मुंबई, पुणे व ठाणे यांसारख्या हजारो रिअल इस्टेट व्यवहार होणाऱ्या या शहरांमध्ये लक्षणीयरीत्या सोईस्कर ठरेल. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत बोलताना सांगितले, “या धोरणामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक सुरळीत आणि सुलभ होईल. त्यामुळे वेळ वाचेल आणि लोकांसाठी कागदपत्रांचा त्रास कमी होईल”.
हे धोरण प्रामुख्याने अनिवासी भारतीय आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त आहे. त्याशिवाय कायदेशीर क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक आणि रिअल इस्टेट एजंट्सनाही याचा पुरेपूर फायदा होणार आहे. ते अधिक कार्यक्षमतेने व्यवहार करू शकतात.
नोंदणीच्या खर्चावर काय परिणाम होईल?
नव्या धोरणामुळे नोंदणी प्रक्रियेत बदल झाला असला तरी त्याचा परिणाम नोंदणी शुल्क किंवा मुद्रांक शुल्कावर होणार नाही. हे शुल्क मालमत्तेचा बाजारभाव आणि ती कुठे आहे यावर अवलंबून असल्याने शुल्कात कोणतीही वाढ किंवा घट होणार नाही. मात्र, प्रवासाचा खर्च, कुरिअरमार्फत कागदपत्रे पाठविणे, असंख्य फेऱ्या किंवा कायदेशीर पाठपुराव्यात विलंब अशा खर्चाची तसेच वेळेचीही बचत होणार आहे.
तंत्रज्ञान किंवा कागदपत्रांमधील बदल
नव्या धोरणामुळे मुलभूत कायदेशीर औपचारिकतेत बदल होणार नाहीत. खरेदीदार आणि विक्रेत्यांना आताही विक्री करार, भेट करार, भाडेपट्टा करार, ७/१२ उतारे, उत्परिवर्तन नोंदी, कर पावत्या, पॅन व आधार कार्डसारखे ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि मालमत्तेवर कोणतीही कायदेशीर देय बाब नाही याची खात्री करण्यासाठी एक प्रमाणपत्र यांसारखी मानक कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहेच.
इतर संबंधित प्रक्रियांसाठी तंत्रज्ञानामध्येही राज्य सरकार गुंतवणूक करत आहे. सरकारचे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) सॉफ्टवेअर प्रणालींचे आधुनिकीकरण करीत आहे. त्यामध्ये भौगोलिक माहिती, ड्रोन मॅपिंग यांसारख्या तंत्रज्ञानात्मक बाबींचा समावेश आहे. त्यामुळे अधिक अचूक कागदपत्रे उपलब्ध होतील, कामाचा वेग वाढेल आणि फसवणुकीला आळा बसू शकतो.
रिअल इस्टेट क्षेत्राला फायदा
महाराष्ट्राने २०२३ मध्ये मुद्रांक शुल्कातून ४० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले. नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी करून राज्यात रिअल इस्टेट क्षेत्राला चालना आणि गुंतवणूक वाढण्याची आशा राज्य सरकारला आहे. या धोरणाचे दीर्घकालीन फायदे आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. “रिअल इस्टेट व्यवहारांचे लोकशाहीकरण आणि डिजिटलायजेशन करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. त्यामुळे अधिकाधिक लोक बाजारात प्रवेश करतील आणि मोठी गुंतवणूक होईल”, असे मुंबईतील एका मालमत्ता सल्लागाराने सांगितले आहे.



Mock Drill: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. संभाव्य युद्धस्थितीचा सामना करण्यासाठी दोन्ही देशानी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचं काम आता सुरु झालंय. या युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून बुधवारी देशव्यापी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. संभाव्य हवाईहल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी हे मॉकड्रिल अत्यंत महत्वाचे मानले जाते. पण हे मॉक ड्रील म्हणजे काय? याचा युद्धाशी काय संबंध? याची ए टू झेड प्रक्रीया काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.
भारत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानचा बिमोड करण्याआधी भारत सज्ज झालाय. पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. अशा युद्धाच्या प्रसंगी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी? काय उपाययोजना कराव्या यासाठी बुधवारी देशभरात रंगीत तालीम होणार आहे. या मॉकड्रीलमधून नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
मॉक ड्रिल हा एक पूर्वनियोजित सराव आहे. ज्यामध्ये आपत्ती किंवा धोक्याची परिस्थिती नाट्यमयरित्या प्रतिकृती बनवली जाते. जेणेकरून त्या वेळी लोक कशी प्रतिक्रिया देतील हे पाहता येईल. यामध्ये बऱ्याच वेळा वास्तववादी परिस्थिती निर्माण केली जाते. जसे की, कुठेतरी आग लागलीय, दहशतवादी हल्ला झालाय किंवा भूकंप झालाय. त्या परिस्थितीत लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची आणि मदतकार्य करण्याची संपूर्ण प्रक्रिया सरावली जाते. यात विशिष्ट परिस्थितीचे अनुकरण केले जाते आणि त्याचा सराव केला जातो. मॉक ड्रिल हे एक प्रशिक्षण तंत्र आहे. एखाद्या व्यक्तीला वास्तविक जीवनात उद्भवू शकणाऱ्या परिस्थितींसाठी तयार करणे हा यामागचा उद्देश आहे.
मॉक ड्रिल करण्याचे अनेक फायदे आहेत. मॉक ड्रील व्यक्तीला वास्तविक जीवनात येणाऱ्या परिस्थितींसाठी तयार करते. यामुळे व्यक्तीला त्याच्या क्षमता समजून घेण्याची आणि त्या सुधारण्याची संधी मिळते. यातून व्यक्तीला स्वतःला स्वावलंबी बनवण्याची संधी मिळते. यामुळे त्यांना त्यांच्या कमतरता ओळखण्याची आणि त्या दूर करण्याची संधी मिळते. यासोबतच एखाद्या व्यक्तीला विविध परिस्थितीत सक्रिय राहण्यास सक्षम केले जाते. मॉक ड्रीलमुळे नागरिकांना स्वरंक्षणाचा सराव करता येतो. आणि त्यांच्या कामाच्या पद्धती सुधारता येतात. थोडक्यात मॉक ड्रिल ही व्यक्तीला वास्तविक जीवनातील परिस्थितींसाठी तयार करण्यासाठीचा एक व्यायाम आहे. त्यांने स्वतःला सुधारण्याची आणि वेगवेगळ्या परिस्थितीत सक्रिय राहण्याची क्षमता मिळते.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. या संदर्भात गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक ठिकाणी, शाळा, मॉल, रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि इतर गर्दीच्या ठिकाणी मॉक ड्रिल म्हणजेच सराव कवायती आयोजित करण्याच्या सूचना जारी केल्यायत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सामान्य जनता, सुरक्षा कर्मचारी आणि बचाव पथकांचा तात्काळ प्रतिसाद आणि तयारी तपासणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
आजच्या काळात जेव्हा कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती अचानक उद्भवू शकते, तेव्हा आधीच तयारी करणे खूप महत्वाचे झाले आहे. धोक्याच्या परिस्थितीत सामान्य लोक कसे वागतील? सुरक्षा आणि बचाव पथके किती जलद प्रतिसाद देतील? सध्याची सुरक्षा साधने आणि अलर्ट सिस्टम किती प्रभावी आहेत? आणखी काय सुधारणा आवश्यक आहे? हे सर्व कळण्यासाठी मॉक ड्रिल आवश्यक आहे.
पूर्वनिर्धारित वेळी अलार्म किंवा अलर्ट वाजवतो. यानंतर लोकांना परिस्थिती काय आहे ते सांगितले जाते. (जसे की आग, बॉम्बचा धोका किंवा भूकंप) यानंतर सर्वांना जलद आणि सुरक्षितपणे बाहेर काढले जाते.
अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिस आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी पोहोचतात.संपूर्ण प्रक्रियेचे मूल्यांकन करून त्यात किती वेळ लागला, कोणत्या कमतरता होत्या आणि काय चांगले करता येईल हे पाहिले जाते.
मॉक ड्रिल कसे केले जाते हे एका उदाहरणासह समजून घेऊया. शाळेत भूकंप मॉक ड्रिलवेळी अलार्म वाजताच मुले ताबडतोब डेस्कखाली लपतात आणि नंतर मोकळ्या मैदानात जमतात. कार्यालयात अग्निशामक मॉक ड्रिलवेळी कर्मचाऱ्यांना आपत्कालीन एक्झिटमधून बाहेर पडण्याचा सराव करायला लावला जातो. मॉल किंवा स्टेशनवर दहशतवादी हल्ल्याचा मॉक ड्रिलवेळी सुरक्षा कर्मचारी अचानक गोळीबार झाल्याची माहिती देतात, त्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सराव केला जातो.




फलटण : प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवन व आपली शाळा येथील विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामाच्या निवडक लेखनातून दरवर्षी ‘नवनीत’ नावाची वार्षिक पत्रिका प्रकाशित केली जाते.यावर्षी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड(MKCL) चे संचालक, श्री.विवेक सावंत यांच्या हस्ते ‘नवनीत’ नावाची वार्षिक पत्रिका प्रकाशित करण्यात आली.यावेळी संस्थेच्या विश्वस्त तथा उपाध्यक्ष डॉ.मंजिरी निंबकर यांनी ‘नवनीत’ या वार्षिक पत्रिकेच्या जन्माची माहिती सांगताना यावर्षीचा अंक व त्यातील विद्यार्थ्यांचे लेखन दाखवत असताना ‘नवनीत’ च्या मलपृष्ठावर सुनिता विल्यम्स यानातून स्पेस स्टेशन मध्ये गेल्या आणि यानाच्या झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे बराच काळ त्या तिथेच अडकून पडल्या मात्र त्या जेव्हा पृथ्वीवर आल्या त्याचा व्हिडिओ या बालवाडीतील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला होता. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे रेखाटन करुन चित्र काढून त्याविषयी अभिज्ञा सावंत या बालवाडीच्या मोठ्या गटातील मुलीचे चित्र व तिने त्या चित्राची सांगितलेली गोष्ट वाचताना महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड(MKCL) चे संचालक, श्री.विवेक सावंत यांच्या तोंडून वाक्ये निघाली, ” Wow fantastic! किती अद्भुत आहे हे! विश्वासच बसत नाही!किती बारकावे तिने या चित्रात टिपलेले आहेत. ” असे उद्गार काढले.
शैक्षणिक वर्षाच्या शेवटाकडे जाताना शिक्षकांपासून,पालकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांचेच लक्ष लागलेले असते ते कमला निंबकर बालभवन व आपली शाळा येथील मुलांच्या वर्षभरातील कामाच्या निवडक लेखनातून तयार होणाऱ्या वार्षिक ‘नवनीत’ कडे. जवळजवळ साहित्याच्या सर्वच प्रकारांमध्ये विद्यार्थी लेखन करतात. कथा,कविता, प्रवासवर्णन, आपल्या जीवनातील अविस्मरणीय क्षण!आणि बरच काही……..
मुलांच्या अभिव्यक्तीला जागा देणारे हे नवनीत मुलांच्या कल्पकतेतून व शिक्षकांच्या अथक परिश्रमातून तयार होते. मुखपृष्ठ, मलपृष्ठ अगदी संपादकीय ही विद्यार्थी व शिक्षक मिळून लिहितात. त्यामुळे ते एक वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचते.
यात विद्यार्थ्यांचे लेखन मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा छापले जाते. यातील प्रत्येक लेख,कविता विद्यार्थ्यांची कल्पकता, सृजनशीलता आणि संवेदनशीलतेला गवसणी घालणारे असतात. यातील लेखन निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाचा विचार रुजवणारे असते.
यावर्षीच्या नवनीत च्या मुखपृष्ठा वर कासव असून त्याविषयी आयुक्त कांगुणे या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनीने आपला अनुभव व्यक्त केला आहे. शाळेत कासव मित्र मोहन उपाध्ये यांच्याशी ऑनलाईन झालेल्या गप्पा आणि त्यातून सागरी कासव संवर्धनामध्ये त्यांनी केलेले काम याविषयी विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. मुलांनी कासव थीम वापरून बनवलेल्या काही भेटवस्तू मोहन दादांना पाठवायच्या असं ठरवून अमूर्त आकार घेऊन त्यातून वेगवेगळ्या रेषा, पोत आणि पॅटर्न चा वापर करून काढलेल्या कासवाचे चित्र हे यावर्षीचा मुखपृष्ठ ठरलं.
मुखपृष्ठ मांडणी आणि अंक मांडणी करणे हे एक कौशल्य असते.ते शिव धनुष्य पेलण्यासारखेच कठीण काम आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण ही जबाबदारी अतिशय आवडीने, निष्ठेने आणि एका अद्भुत कलाकाराच्या नजरेने मांडण्याचे काम एक हरहुन्नरी अवलिया कलाकार, अतिशय संवेदनशील व सर्जनशील अभिव्यक्ती आपल्या कलेतून मांडणारे रमाकांत धनोरकर हे गेली काही वर्ष करत आले आहेत.म्हणून त्याला एक विविधांगी आकार आला.
यावेळी संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले,संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सोमीनाथ घोरपडे उपस्थित होते.तेव्हा या विद्यार्थ्यांच्या अद्भुत अभिव्यक्तीला, कल्पकतेला साहित्याच्या विविध प्रकारातून आपल्यासमोर आणणाऱ्या कमला निंबकर बालभवन व आपली शाळा मधील विद्यार्थ्यांच्या लेखणीतून तयार झालेल्या नवनीत अंक संस्थेच्या फेसबुक पेजवर जाऊन पाहण्याचे आव्हान शाळेच्या वतीने करण्यात आले.
‘नवनीत’ वार्षिक पत्रिकेचे प्रकाशन करताना MKCL चे विवेक सावंत, डॉ. मंजिरी निंबकर, प्रकाश अनभुले

हल्ली सोशल मीडियाचा वाढती क्रेझ बघता, बरेचसे कलाकारही सोशल मीडियामार्फत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. तर काही कलाकारांनी तर स्वत:ची यूट्यूब चॅनेल्सही सुरू केली आहेत. त्यातलीच एक म्हणजे दिग्दर्शिका फराह खान. फराह खानने २०२४ मध्ये मागच्या वर्षी तिचं फराह खान नावाने यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. ज्याचे आता दशलक्षांमध्ये सबस्क्रायबर्स आहेत.
फराह खान या चॅनेलमार्फत अनेक कलाकारांचे कुकिंगचे व्हिडीओज शेअर करीत असते. यादरम्यान कलाकार स्वत: विविध पदार्थ बनविताना दिसतात. महत्त्वाचं म्हणजे फराह खान हे सगळं एकट्यानं करत नाही, तर तिचा कूक दिलीप कायम तिच्याबरोबर प्रत्येक व्हिडीओमध्ये असतो. विशेष म्हणजे सर्व कलाकार त्याच्याबरोबर मज्जा-मस्ती करीत असतात; तर दिलीपही अनेकदा विनोद करताना दिसतो. त्याचा साधा, सरळ स्वभाव अनेकांना भावतो. त्यामुळे आता त्याचाही चाहतावर्ग तयार झाला आहे.
एवढेच काय तर दिलीपच्या या शोमधील अनेक रील्स सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशातच आता फराह खानचा कूक दिलीप लवकरच शाहरुख खानबरोबर झळकणार आहे. फराह खाननं स्वत: याबद्दल सांगितलं आहे. नुकताच फराह खाननं बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान यांच्याबरोबर एक एपिसोड शूट केला. या एपिसोडमध्येच फराहनं याबाबत सांगितलं आहे. कबीर खान यांच्याशी गप्पा मारत असताना ती म्हणाली “नुकतीच दिलीपनं शाहरुख खानबरोबर मिंत्रा (Myntra) साठी एक जाहिरात शूट केली आहे.”
त्यामुळे आता लवकरच दिलीप बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानसह जाहिरातीमध्ये झळकणार आहे. दिलीपच्या वाढत्या प्रसिद्धीबद्दल बोलताना फराहनं शाहरुखचा एक किस्सादेखील सांगितला आहे. ती म्हणाली की, जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी दिलीपबरोबर गेली असताना शाहरुख तिला म्हणाला, “माझे हे दिवस आलेत की, मी तुझ्या कुकबरोबर काम करतोय”. त्यावर ती म्हणाली, “आणि माझे असे दिवस आलेत की, मी तुला सोडून त्याला डिरेक्ट करतेय”.
दरम्यान, फराह खानच्या यूट्यूब चॅनेलवर आजवर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. करण जोहर, अभिषेक बच्चन, शेहनाज गिल, कबीर खान, रेमो डिसोझा, गौरव खन्ना यांसारखे अनेक कलाकार या चॅनेलवरील शोमध्ये सहभागी झाले आहेत.