
फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषदेची अत्यंत महत्त्वाची विशेष सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत सन २०२६–२०२७ या आर्थिक वर्षासाठी तब्बल ३५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शहराच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प मंजूर झाला असला, तरी सभागृहात घडलेल्या राजकीय घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधले.
सकाळी सुमारे ११ वाजता झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नगराध्यक्षांच्या आदेशानुसार अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर समितीने मंजुरी दिल्यावर दुपारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प बहुमताने आणि सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
अर्थसंकल्पाचा तपशील
यंदाच्या अर्थसंकल्पात महसुली आणि भांडवली लेखाशीर्षांत नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत.
प्रारंभीची शिल्लक: ५९,३७,६०,९४४ रुपये
महसुली जमा: ५०,५८,२८,५०० रुपये
एकूण जमा (शिल्लकसह): ३५१,६९,१९,४४४ रुपये
महसुली खर्च: ५६,८०,९२,४८० रुपये
भांडवली खर्च: २,९४,८३,००,००० रुपये
एकूण खर्च: ३५१,६३,९२,४८० रुपये
अखेरची शिल्लक: ५,२६,९६४ रुपये
‘बैठक व्यवस्था’ वादाचा ठरला मुख्य मुद्दा
सभेदरम्यान सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो बैठक व्यवस्थेचा. विरोधी गटाचे स्वीकृत नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित असताना त्यांना मागील बाकावर बसवण्यात आले, तर अनुपस्थित असलेले शिवसेना गटनेते व माजी नगराध्यक्ष पांडुरंग (आबा) गुंजवटे यांची जागा पहिल्या रांगेत राखीव ठेवण्यात आली होती.
या निर्णयामुळे शिवसेना गटातील काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत थेट नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना पहिल्या रांगेत बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. या घटनेमुळे नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
निधी वाढवण्याची मागणी
आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती सचिन अहिवळे यांनी अर्थसंकल्पातील २९ शीर्षकांमध्ये विकासकामांसाठी निधी अपुरा असल्याचे सांगत निधी वाढवण्याची मागणी केली. या मागणीला भाजपा गटनेते रोहित नागटिळे यांनी अनुमोदन दिले.
अर्थसंकल्प सादरीकरणातील विलंबावरून सवाल
विरोधी नगरसेवक पंकज पवार आणि विकास काकडे यांनी अर्थसंकल्प उशिरा सादर झाल्याबद्दल प्रशासनाला जाब विचारला. “२८ फेब्रुवारीपूर्वी अर्थसंकल्प सादर होणे अपेक्षित असताना तो उशिरा का सादर करण्यात आला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सर्व गटनेत्यांशी चर्चा करूनच आणि शासकीय नियमांनुसार अर्थसंकल्प सादर केल्याचे स्पष्ट केले.
‘लहान फॉन्ट’वरही आक्षेप
विरोधी नगरसेवक विकास काकडे यांनी अर्थसंकल्पाची छपाई लहान अक्षरात करण्यात आल्याची तक्रार केली. पुढील बैठकीत अहवाल मोठ्या फॉन्टमध्ये देण्याची मागणी त्यांनी केली, ज्यास अध्यक्षांनी मान्यता दिली.
उपस्थित मान्यवर व नगरसेवक
या सभेस सार्वजनिक बांधकाम सभापती सोमाशेठ जाधव, आरोग्य सभापती सचिन अहिवळे, नियोजन सभापती संदीप चोरमले, पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. मोहिनी हेंद्रे, मागासवर्गीय समिती सभापती सौ. सुपर्णा अहिवळे उपस्थित होते.
याशिवाय स्वीकृत नगरसेवक अशोकराव जाधव, भाजपा गटनेते रोहित नागटिळे, पंकज पवार, अझरुद्दीन (पप्पू) शेख, विशाल तेली, किरण राऊत, तसेच सौ. रुपाली सस्ते, अमित भोईटे, सौ. अस्मिता लोंढे, सुदाम (अप्पा) मांढरे, सौ. कांचन व्हटकर, सौ. मीना काकडे, सौ. स्मिता शहा, सौ. रुपाली जाधव, सौ. श्वेता तारळकर आदी नगरसेवक-नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अखेर, विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर हा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला.







