फलटण – “दक्षिण काशी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र श्रीक्षेत्र फलटणमध्ये आज महानुभाव पंथीयांची प्रसिद्ध घोडा यात्रा व चक्रपाणी पालखी महोत्सव दिमाखात पार पडला. संपूर्ण शहरात भक्तिभावाने भारावलेले वातावरण पाहायला मिळाले.
या उत्सवाची सुरुवात श्रीमंत आबासाहेब मंदिर येथे स्थान पूजन व पालखी पूजनाने झाली. यावेळी आमदार सचिन पाटील, सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सौ. मनीषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर, रणवीरराजे समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे CEO मोरे साहेब, नगरसेवक अनुप शहा, सुदामराव मांढरे, महानंदचे डिके पवार, नवामळा झांज पथकाचे माणिक शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
महाआरतीनंतर पितळी घोडे डोक्यावर घेऊन मानकरी नगरप्रदक्षिणेस निघाले. चक्रपाणी पालखी छबिनाही गुलाल उधळत श्रीमंत आबासाहेब मंदिरातून मार्गस्थ झाला. या पालखीने तेली गल्ली, श्रीकृष्ण मंदिर, शुक्रवार पेठ, रंगारी महादेव मंदिर, अवस्थान मंदिर, बाणगंगा नदी असा प्रवास करत पुन्हा रात्री श्रीकृष्ण मंदिरात पोहोचून महाआरती झाली. अंतिम टप्प्यात पालखी पुन्हा श्रीमंत आबासाहेब मंदिरात सन्मानपूर्वक पोहोचली.
दरम्यान शहरातील गणेश मंडळे, बिल्डर-डेव्हलपर्स, नगरसेवक यांनी सरबत, मठ्ठा, पाण्याची सुविधा दिली. चार टँकरद्वारे रस्त्यावर पाणी फवारणी करून उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यात आले.
श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरांमध्ये भाविकांसाठी सर्व सुखसोई पुरवण्यात आल्या. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आचार्य कवीश्वर कुलाचार्य शामसुंदर विद्वांस शास्त्री बाबाजी, विश्वस्त सुदामराज बाबा विद्वांस, अर्जुनराव नाळे, बाळासाहेब ननावरे, बाळासाहेब शिंदे, सिताराम शिंदे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
व्यवस्थापक मुरलीधर बाबाजी, संत-महंत, तपस्विनी व हजारो देश-विदेशातील सद्भक्तांच्या उपस्थितीने संपूर्ण शहर भक्ति आणि उत्साहाच्या लहरींमध्ये न्हालं.