Thursday, October 22, 2026
Homeफलटणफलटणमध्ये २४ ऑक्टोबरपासून ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’; खरेदी, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!

फलटणमध्ये २४ ऑक्टोबरपासून ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’; खरेदी, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!

लावणी महोत्सव, भव्य डान्स स्पर्धा, होम मिनिस्टर पैठणी शो आणि ऑटोमोबाईल्स प्रदर्शन ठरणार आकर्षण; २८ ऑक्टोबरपर्यंत रंगणार महोत्सव

फलटण | प्रतिनिधी फलटण शहरासह परिसरातील नागरिकांना खरेदी, खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाचा आनंद एकाच ठिकाणी घेता यावा, यासाठी ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर, एस.टी. स्टँडसमोर, श्री सद्गुरू हरिबाबा नगरी येथे हा महोत्सव रंगणार आहे. विविध वस्तूंची खरेदी, चविष्ट खाद्यपदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक प्रदर्शनांमुळे हा महोत्सव फलटणकरांसाठी विशेष पर्वणी ठरण्याची अपेक्षा आहे.

महोत्सवाचे उद्घाटन शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी दिली.

खरेदीपासून मनोरंजनापर्यंत विविध आकर्षणे

फलटण फेस्टिव्हलमध्ये गृहोपयोगी साहित्य, विविध प्रकारचे कपडे, हस्तकलेच्या वस्तू आणि अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. लहान मुलांसाठी खेळाची साधने तसेच ऑटोमोबाईल्सचे भव्य प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व वयोगटांतील नागरिकांना या महोत्सवात विविध अनुभव घेता येणार आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पर्वणीत भव्य डान्स स्पर्धा, ‘होम मिनिस्टर पैठणी शो’, बहारदार हिंदी-मराठी गाण्यांचे कार्यक्रम आणि दापोली येथील प्रसिद्ध लावणी नृत्यांगनांचा लावणी महोत्सव विशेष आकर्षण ठरणार आहे. मनोरंजनासोबतच खरेदीचा आनंद घेण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.

स्थानिक व्यावसायिकांसाठी मोठी संधी

या महोत्सवामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि लघुउद्योजकांना आपली उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. नागरिकांची वाढती उपस्थिती स्थानिक बाजारपेठेला चालना देण्यास तसेच व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करण्यास मदत करेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

महोत्सवाची वेळ दररोज सकाळी ११ ते रात्री १० अशी राहणार आहे. महोत्सवाची रूपरेषा उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी स्पष्ट केली असून, कार्याध्यक्ष रणजितसिंह भोसले आणि उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी फलटण शहरासह परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.

पाच दिवसांची खरेदी, खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाची रंगतदार पर्वणी घेऊन येणारा फलटण फेस्टिव्हल २०२६ आता फलटणकरांच्या भेटीला येत असून, या महोत्सवाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments