
‘ओले आले’ ही एका बापाची कथा असून, ती मुलाच्या नजरेतून सांगितली जाणार आहे, हे टीझरवरूनच कळत आहे. या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला नाना पाटेकर पाठमोरे उभे राहून योग करताना दिसले आहेत. तर, यानंतर मागून आवाज येतो तो अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याचा… यात तो बोलतो की, ‘जनरली बाप कसा असतो. वक्तशीर सगळं कसं एकदम टाईम टू टाईम. कर्तव्यनिष्ठ म्हणजे रिस्पॉन्सिबल. जबाबदार – रुबाबदार. कायम खंबीर पण सतत गंभीर. पण माझा…’ सिद्धार्थ चांदेकरच वाक्य पूर्ण होण्याच्या आताच नाना पाटेकर यांचा वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतो. ‘ओले आले’च्या टीझरमध्ये नाना पाटेकर यांच्यासोबत अभिनेते मकरंद अनासपुरे यांची झलक देखील पाहायला मिळाली आहे.








