
फलटण, दि. १० नोव्हेंबर – तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (सोमवार) पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रशासक निखिल जाधव यांनी दिली.
यंदाच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पद सर्वसाधारण असून एकूण १३ प्रभागांमध्ये २७ नगरसेवक जागा आहेत. यापैकी १४ महिला व १३ पुरुषांसाठी राखीव जागा आहेत.
पहिल्या दिवशी उमेदवारी दाखल न झाल्याने निवडणूक विभागात शांतता होती. तथापि, अनेक नागरिक कर भरणा, शौचालय दाखला आदी कामांसाठी पालिकेत दाखल झाले होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरून त्याची प्रत निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.
दरम्यान, फलटणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. विशेषतः प्रभाग १, ४, ५, १२ आणि १३ मध्ये चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. उमेदवारी मिळवण्यासाठी तसेच पक्षांतराच्या हालचालींना वेग आला असून, खरी लढत ‘खासदार गट विरुद्ध राजे गट’ अशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दोन्ही गटांनी आपापल्या चिन्हावर लढायचे की आघाडी करून, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
नगरसेवक पदासाठी २७ जागांसाठी शंभरहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल होतील, असा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे. तसेच नगराध्यक्ष पदासाठी किमान पाच उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत अर्ज दाखल प्रक्रियेला वेग येईल, अशी अपेक्षा आहे.
📅 फलटण नगरपरिषद निवडणूक २०२५
📍 १३ प्रभाग | २७ नगरसेवक जागा | थेट नगराध्यक्ष निवडणूक
🗳️ पहिल्या दिवशी: शून्य अर्ज








