
फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपालिकेतील कामकाजात मोठा बदल घडवून आणण्याचा ठाम निर्धार भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. ‘ त्यांनी आपल्या कामकाजाच्या पद्धतीबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले.
नाईक निंबाळकर म्हणाले की, लोकांनी त्यांना संधी दिल्यास “नगरपालिका ही नागरिकांचीच आहे” असे प्रत्येकाला वाटेल असे प्रशासन उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अधिक कार्यक्षम आणि सर्वांसाठी सुलभ करण्यास ते प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेत बसवलेली लिफ्टची सोय कायमस्वरूपी सर्व नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येईल, ही नागरिकांसाठी दिलासादायक घोषणा त्यांनी केली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि कामकाज यावर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी हालचाल नोंदवही (अटेंडन्स रजिस्टर) अनिवार्य करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सध्या जन्म आणि मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते, ती गैरसोय दूर करून सोपे व पारदर्शक प्रशासन देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्यांवर नियंत्रण ठेवून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होतील याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले.
त्यांच्या या भूमिकेमुळे फलटण शहरात सुशासनाबाबत नवीन आशा निर्माण झाली असून आगामी नगराध्यक्ष निवडणुकीला वेगळी दिशा मिळत आहे.








