भारतीय बौद्ध महासभेच्या संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा; उपासक-उपासिकांचा उत्स्फूर्त सहभाग
कोरेगाव : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत कोरेगाव तालुका ग्राम शाखा दुघी या शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस आयु. सुनील कदम सर आणि कोरेगाव तालुका अध्यक्ष आयु. राजाराम कांबळे सर यांच्या हस्ते ग्रामशाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमास तालुका कोषाध्यक्ष निलेश सपकाळ, माजी तालुकाध्यक्ष मिलिंद माने सर, संस्कार सचिव संजय भोसले, संस्कार सचिव दगडू मोरे, समता सैनिक दलाचे अमोल गायकवाड, निलेश मोरे, संदेश कांबळे, रमेश भोसले यांच्यासह दुघी गावातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन ग्रामशाखेच्या माध्यमातून गावातील बौद्ध समाजाला संघटित करून तथागत भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, धम्माचे आचरण, सामाजिक प्रबोधन तसेच समाजातील युवक, महिला आणि नागरिकांना संघटनेच्या विविध उपक्रमांशी जोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
यावेळी दुघी ग्रामशाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. ग्रामशाखेच्या अध्यक्षपदी जयसिंग जगताप, तर सचिवपदी दिलखुश जगताप यांची जबाबदारी सोपविण्यात आली. याशिवाय संजय जगताप, मनीषा जगताप, कांता ताई जगताप तसेच माजी सरपंच आणि गावातील मान्यवर उपासक-उपासिका उपस्थित होते.
ग्रामशाखेच्या उद्घाटनामुळे दुघी गावात भारतीय बौद्ध महासभेच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळाले असून, धम्मविचार आणि सामाजिक समतेचा संदेश गावागावांत पोहोचविण्यासाठी ही शाखा प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात उपस्थित उपासक-उपासिकांनी ग्रामशाखेच्या माध्यमातून धम्मकार्य, सामाजिक प्रबोधन आणि संघटन मजबूत करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
