अकलूज, 27 डिसेंबर 2024: अकलूज नगर परिषदेच्या स्थापनेसाठी रात्रंदिवस संघर्ष, उपोषण आणि सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नागरिकांना आता या परिषदेच्या प्रशासनाच्या कारभारामुळे निराशा येत आहे. जनतेला अपेक्षित सुविधा मिळण्याऐवजी भ्रष्टाचार, पैशाची लूट, आणि प्रशासकीय अकार्यक्षमता उघड होत असल्याचे चित्र आहे.
कर भारले जात असताना सुविधा गायब
अकलूज नगर परिषदेने विविध प्रकारचे कर जाहीर केले असून, नागरिक ते प्रामाणिकपणे भरण्यास तयार आहेत. मात्र, काही कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे आणि वर्तणुकीमुळे या करांचा वापर योग्य प्रकारे होत नसल्याची भावना जनतेत आहे.
नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून जनतेच्या पैशांची लूटमार सुरू असून, अशा प्रकारच्या कारभाराला पाठबळ प्रशासकांचे तर नाही ना, असा सवाल उपस्थित होतो. या प्रकारामुळे अकलूजच्या जनतेत रोष निर्माण झाला आहे.
कोट्यवधींचा निधी पण विकासाचा अभाव
नगर परिषदेच्या स्थापनेपासून अकलूज येथे कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, त्या निधीचा वापर कसा झाला याबाबत कोणतीही ठोस माहिती जनतेला दिली जात नाही. माहितीच्या अधिकाराचा वापर करून विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तर मिळत नाही. त्यामुळे “नेमकं चाललंय काय?” असा संतप्त सवाल अकलूजकर उपस्थित करत आहेत.
प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा माज आणि जनतेची नाराजी
नगर परिषदेतील काही कर्मचाऱ्यांच्या अरेरावीला सध्या जनता वैतागली आहे. प्रशासकीय सेवेतील “पेटकर” सारखे रानबोके माजलेले दिसत आहेत, यावर आळा घालण्यासाठी प्रशासक कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत.
अकलूज नगर परिषदेने जनतेला दाखवलेली स्वप्ने:
नगर परिषद झाल्यास खालील गोष्टींची हमी दिली होती:
1. गटारी, रस्ते आणि पाणीपुरवठा व्यवस्था
2. सांडपाण्याचे नियोजन आणि टाकाऊ व्यवस्थापन
3. हरित क्षेत्रांची निर्मिती
4. शहरातील स्वच्छता मोहीम
5. आरोग्य सेवा आणि नागरिक सुविधा
मात्र, या योजना आजतागायत प्रभावीपणे राबविल्या गेल्याचे दिसत नाही.
जनतेचा प्रशासनाला इशारा
जनतेने नगर परिषदेच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त केली असून, “अकलूज नगर परिषदेतील प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे”, असे नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत. जर प्रशासनाने तातडीने सुधारणा केली नाही, तर पुढील काळात आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे आहेत.