Tuesday, September 15, 2026
Homeसाताराविडणी (फलटण) येथे अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला; नरबळीचा संशय?

विडणी (फलटण) येथे अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला; नरबळीचा संशय?

विडणी, फलटण: विडणी (ता. फलटण) येथील २५ फाटा परिसरातील ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी गुलाल, कुंकू, दिव्याची वात, नारळ, काळी बाहुली, सुरी, व कापलेले केस आढळून आल्याने आघोरी प्रथांमुळे नरबळी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

प्रकरणाचा तपशील:

प्रदीप जाधव यांच्या ऊसाच्या शेतात चार-पाच दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने या महिलेचा खून करून मृतदेह टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह अर्धवट सडलेल्या अवस्थेत सापडला. हिंस्र प्राण्यांनी मृतदेहाचे काही भाग शेतातून ओढून बाहेर आणल्यामुळे ही घटना उघडकीस आली.

महिलेचा कंबरखालचा भाग व कवटी शरीरापासून वेगळा सापडला. कवटी पाण्याच्या पाटात सापडली, तर मधला भाग अद्याप सापडलेला नाही. फलटण ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस तपास सुरू:

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राहूल धस, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील, शिवाजी जायपजे व शिवानी नागवडे यांनी भेट देऊन पाहणी केली. परिसरात पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

नरबळीची शक्यता:

घटनास्थळी महिलेच्या साडीच्या जवळ नारळ, गुलाल, कापलेले केस, तेलाचा दिवा व काळी बाहुली सापडल्यामुळे आघोरी प्रथा व नरबळी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तपास प्रगती:

पोलिस पाटील शीतल नेरकर यांनी घटनेची माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना दिली. अधिक तपास पोलीस करत असून परिसरातील रहिवाशांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments