
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे नगरपरिषदेचे आवाहन
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे नगरपरिषदेचे आवाहन
फलटण प्रतिनिधी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेकडून संबंधित मार्गांवरील नागरिक, व्यावसायिक व दुकानधारकांना अतिक्रमणे स्वखर्चाने हटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरपरिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, रस्त्यांच्या कडेला असलेली कच्ची-पक्की बांधकामे, अनधिकृत वाढीव बांधकामे तसेच व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा नगरपरिषद प्रशासनाकडून थेट कारवाई करण्यात येणार असून, त्या कारवाईदरम्यान होणाऱ्या नुकसानीस संबंधित व्यक्ती स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या मोहिमेत दुकानधारक, व्यावसायिक, टपरीधारक, हातगाडी चालक आदींनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अतिक्रमण हटविण्याची कारवाई पुढील मार्गांवर करण्यात येणार आहे :
गिरवी नाका ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा
श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते गजानन चौक
गजानन चौक ते पांचबत्ती चौक
पांचबत्ती चौक ते उबेश्वर चौक
उबेश्वर चौक ते जिंती नाका
डेक्कन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाना पाटील चौक
नाना पाटील चौक ते श्रीराम कारखाना
फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून अतिक्रमणे स्वखर्चाने हटवावीत, असे आवाहन केले आहे.









