
फलटण :- क्रीडा क्षेत्रातील आपली विजयी परंपरा कायम ठेवत मुधोजी हायस्कूलने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेत या शाळेच्या तिन्ही संघांनी घवघवीत यश संपादन केले.
१७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात मुधोजी हायस्कूलने साताऱ्याच्या सैनिक स्कूलवर मात करून प्रथम क्रमांक पटकावला. यासह १५ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुलांच्या गटातही मुधोजी हायस्कूल विजयी ठरले. या यशामुळे तिन्ही संघांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राष्ट्रीय प्रशिक्षक महेश खुटाळे, सचिन धुमाळ आणि क्रीडा शिक्षक खुरंगे यांचे मार्गदर्शन तसेच माजी खेळाडू विनय नेरकर, ऋषिकेश पवार आणि कपिल मोरे यांची साथ या यशामागे महत्त्वाची ठरली. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य पातळीवर मुधोजी हायस्कूलचा दबदबा राहिला असून, यंदा राज्य विजेतेपद मिळवणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.
या विजयामुळे मुधोजी हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, फलटण शहरासाठीही हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.







