Wednesday, September 30, 2026
Homeफलटणतालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत मुधोजी हायस्कूलचा दबदबा; १४, १७ व १९ वर्षांखालील...

तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत मुधोजी हायस्कूलचा दबदबा; १४, १७ व १९ वर्षांखालील तिन्ही गटांत विजेतेपद

तिन्ही अंतिम सामन्यांत दमदार विजय; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मुधोजीचे संघ सज्ज

फलटण प्रतिनिधी | दि. ३० सप्टेंबर २०२६ : श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई), जाधववाडी यांच्या वतीने अभियांत्रिकी महाविद्यालय, ठाकुरकी येथे आयोजित फलटण तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणच्या मुलांच्या संघांनी अभूतपूर्व कामगिरी करत १४, १७ आणि १९ वर्षांखालील तिन्ही गटांत विजेतेपद पटकावले. या कामगिरीमुळे तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मुधोजी हायस्कूलचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

या स्पर्धेत मुधोजी हायस्कूल, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई व एसएससी), व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, फरंदवाडी तसेच मालोजीराजे शेती विद्यालय यांसह तालुक्यातील विविध संघांनी सहभाग घेतला.

१४ वर्षांखालील गटात १० धावांनी विजय

१४ वर्षांखालील गटातील अंतिम सामना मुधोजी हायस्कूल आणि श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई), जाधववाडी यांच्यात झाला. नाणेफेक जिंकून मुधोजी हायस्कूलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित ५ षटकांत मुधोजीने ३ गड्यांच्या मोबदल्यात ४४ धावा केल्या.

सिद्धेश घनवटने १२, हर्षदीप चौहान व रागवीर पवार यांनी प्रत्येकी ११, तर वैष्णव भोसलेने २ धावांचे योगदान दिले.

४५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाला मुधोजीच्या अचूक गोलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे ५ षटकांत ३४ धावाच करता आल्या. हर्षदीप चौहानने २, वैष्णव भोसलेने १ बळी घेतला, तर सिद्धेश घनवटने एक खेळाडू धावचित केला. मुधोजीने हा सामना १० धावांनी जिंकत विजेतेपद पटकावले.

१७ वर्षांखालील गटात ८ धावांनी बाजी

१७ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विरुद्ध व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल असा सामना रंगला. नाणेफेक जिंकून व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मुधोजीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ४६ धावा केल्या. इंद्रजीत गुंजवटेने १२, सुजय बोडकेने ११, हासिम राजा शहाने ६ आणि मयुरेश कुंभारने ६ धावांचे योगदान दिले.

४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलचा संघ ५ षटकांत ३९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने हा सामना ८ धावांनी जिंकत १७ वर्षांखालील गटाचे विजेतेपद मिळवले.

१९ वर्षांखालील गटात ६२ धावांचा दणदणीत विजय

१९ वर्षांखालील गटात मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने फलंदाजीत आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत निर्धारित ५ षटकांत बिनबाद १०७ धावा उभारल्या.

या धावांचा पाठलाग करताना मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण संघाला ३ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ४५ धावा करता आल्या. परिणामी मुधोजी हायस्कूलने हा सामना तब्बल ६२ धावांनी जिंकत १९ वर्षांखालील गटाचेही विजेतेपद आपल्या नावे केले.

या सामन्यात श्रवण खाडेने नाबाद ४२ धावा, तर विनायक दळवीने नाबाद २७ धावा करत संघाच्या मोठ्या धावसंख्येत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

पंच व क्रीडा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

स्पर्धेप्रसंगी फलटण तालुका क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष तायप्पा शेंडगे, उत्तमराव घोरपडे, अमोल नाळे, सुजीत जमदाडे, शिवलिंग सावंत, संजय गोफणे, सूरज ढेंबरे, अमित काळे, महेश निंबाळकर, अमर कोकरे व सोमनाथ चौधरी उपस्थित होते.

सामन्यांचे पंच म्हणून ज्येष्ठ क्रिकेट पंच संजय गायकवाड, रवींद्र दळवी, अमोल नाळे व रोहन निकम यांनी काम पाहिले.

विजेत्या संघांचे अभिनंदन

मुधोजी हायस्कूलच्या तिन्ही संघांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय लोंढे पाटील, सौ. पूजा पाटील, फ.ए.सो. क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सर्व विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

तिन्ही गटांत तालुकास्तरीय विजेतेपद मिळवल्याने मुधोजी हायस्कूलचे संघ आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज झाले असून, या पुढील स्पर्धेतही दमदार कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments