आई हा केवळ शब्द नाही, ती संपूर्ण जीवनाची भावना आहे” – महेंद्र गायकवाड

0
83
आई हा केवळ शब्द नाही, ती संपूर्ण जीवनाची भावना आहे” – महेंद्र गायकवाड

“आई हा केवळ शब्द नाही, ती संपूर्ण जीवनाची भावना आहे” – महेंद्र गायकवाड
फलटण : “आई हा केवळ शब्द नाही, ती संपूर्ण जीवनाची भावना आहे,” असे भावनिक प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा, बारामती शाखेचे संस्कार सचिव महेंद्र गायकवाड (मामा) यांनी केले. ते कालकथित पुष्पावती सर्जेराव भालेराव यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी आपल्या बहिणीच्या आठवणीत ते अतिशय भावुक झाले. त्यांनी कवी फ. मु. शिंदे यांच्या ‘आई’ या कवितेतील ओळी उद्धृत करत सांगितले की – “आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. म्हणजेच जिथे आई असते, तिथे जीवन, हालचाल, ऊब आणि संवाद असतो.
आई नसलेलं घर म्हणजे ओसाड वाडा. पण जिथे आई असते, तिथे प्रत्येक कोपऱ्यात हसू, काळजी, प्रेम आणि आपलेपणा भरलेला असतो.”गायकवाड म्हणाले, “त्या उक्तीप्रमाणे माझी बहीण संपूर्ण आयुष्य जगली. अपार कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तिनं आपल्या मुलांना घडवलं. तिच्या जाण्याने कुटुंबाची आणि समाजाची प्रचंड हानी झाली आहे.”

श्रद्धांजली आणि आदरांजलीचा अर्थ –
कार्यक्रमात भंते काश्यप जी यांनी श्रद्धांजली आणि आदरांजलीचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की –“श्रद्धांजली म्हणजे आपल्यातून निघून गेलेल्या व्यक्तीप्रति मनःपूर्वक आदर, कृतज्ञता आणि प्रेमभाव व्यक्त करून त्याला श्रद्धेने वंदन करणे.तर आदरांजली म्हणजे त्या व्यक्तीला सन्मानाने प्रणाम करून त्याच्या कार्याला नतमस्तक होणे. जर आदराने वंदन करायचे असेल तर ती ‘आदरांजली’ आणि श्रद्धेने वंदन करायचे असेल तर ती ‘श्रद्धांजली’ होय.परंतु ही श्रद्धा आणि हा आदर केवळ शब्दांत नसावा, तर तो कृतीत आणि जीवनमूल्यांमध्ये दिसायला हवा,” असे ते म्हणाले. कार्यक्रमात उपस्थित सर्व वक्त्यांनी समाजाला दिशा देणाऱ्या मातांना वंदन केले. कर्मयोगी संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, तसेच जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महामाया माता गौतमी या मातांना नमन करून त्यांच्या कार्याची उजळणी करण्यात आली. या मातृशक्तीच्या परंपरेत कालकथित पुष्पावती सर्जेराव भालेराव यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि उपस्थितांनी त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली. “आई म्हणजे त्याग, समर्पण आणि प्रेरणा” पतीच्या निधनानंतरही पुष्पावती भालेराव यांनी अपार जिद्दीने आपल्या तीन मुलांना महावीर भालेराव (भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका अध्यक्ष), सतीश भालेराव (अण्णा) – साहित्यिक, विचारवंत, आणि भगिनी पंचशिला साबळे(आक्का)यांना शिक्षण, संस्कार आणि माणुसकीचे मूल्य दिले.“आई म्हणजे त्याग, प्रेम आणि प्रेरणेचं मूर्तिमंत उदाहरण आहे,” असे मत उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने व्यक्त केले.

या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभाग उपाध्यक्ष बजरंग गायकवाड सर यांनी वृद्ध आई-वडिलांप्रती कर्तव्यभाव व्यक्त करून भालेराव कुटुंबाच्या सामाजिक, धार्मिक योगदानविषयी मांडणी केली. आईच्या स्वभावातील वैशिष्ट्य आणि समाजाप्रती कुटुंबाप्रती असणारी समर्पित भावना यावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ज्ञान, ज्ञानातून श्रद्धा, श्रद्धेतून धम्माचरण आणि धम्म आचरणातून दुःखमुक्तीकडे वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ठाणे जिल्ह्याच्या संस्कार सचिव आणि राज्य संघटक आयुनि अविंदा वाघमारे मॅडम यांनी पुष्पावती भालेराव यांच्या कार्याची तुलना फुले–शाहू–आंबेडकर विचारधारेतील मातांच्या आदर्शाशी केली. खटाव तालुक्याचे केंद्रिय शिक्षक आयु. सुनील कदम यांनी कुटुंबाने पारंपारिक कर्मकांडाऐवजी धम्मसंस्कार विधी केल्याबद्दल प्रशंसा केली.
समता सैनिक दलाचे माजी पदाधिकारी आयु. लक्ष्मण निकाळजे यांनी जुन्या आठवणी उजळवत कुटुंबाच्या समाजोपयोगी कार्याचा उल्लेख केला.

गीत आणि कवितांमधून श्रद्धांजली – कार्यक्रमात “आई माझी मायेचा सागर” हे गीत बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांनी सादर केले.कवी फ. मु. शिंदे यांची ‘आई’ कविता महेंद्र गायकवाड यांनी सादर केली.तसेच “हंबरून वासराले चाटती जवा गाय” हे गीत फलटण तालुका महासचिव बाबासाहेब जगताप यांनी सादर करून उपस्थितांना भावूक केले.

या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय, राज्य, जिल्हा आणि तालुका पदाधिकारी, कुटुंबातील बंधू सतीश सर्जेराव भालेराव, भगिनी पंचशिला साबळे (आक्का), समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले, आयुनि अर्चना चव्हाण, आयुनि सोनल खरात, आयु. विठ्ठल निकाळजे, आयु. संपत भोसले, आयु. केशव ठोंबरे, आयु. सतीश कांबळे, संघटक विजयकुमार जगताप, आनंद जगताप, स्वप्नील गायकवाड, ऍड.चंद्रशेअर मोरे, बौद्धाचार्य संजय प्रल्हाद घोरपडे,जेष्ठ समाजसेविका कांताताई काकडे, लोक कलावंत लक्ष्मण निकाळजे, वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी चित्राताई गायकवाड, माजी तालुका अध्यक्ष शंकर कांबळे, तसेच नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंतिम आदरांजली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी एक मिनिट मौन पाळून कालकथित पुष्पावती सर्जेराव भालेराव यांच्या प्रति मनःपूर्वक श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण केली.