
फलटण :- फलटण शहरात आज पहाटे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई करत यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात ईडीचे पथक दाखल झाले.
प्राथमिक व खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्यांनी प्रथम बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी तपास सुरू केला. त्यानंतर पथक थेट यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. बँकेचे कार्यालय सुरू होताच सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली.
कारवाईदरम्यान बँकेतील महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक नोंदी, कर्जप्रकरणांशी संबंधित फाईल्स तसेच डिजिटल रेकॉर्डची सखोल तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईमुळे बँकेचे कामकाज काही काळासाठी पूर्णतः ठप्प झाले असून, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, यशवंत बँकेत ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी काही दिवसांपूर्वीच मोठी कारवाई झाली होती. या प्रकरणात बँकेच्या चेअरमनसह सुमारे ५० जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील लेखापरीक्षण तसेच १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ या लेखापरीक्षणपूर्व कालावधीत कार्यरत असलेल्या संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अपहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या प्रकरणी पुण्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी फिर्याद दिली असून, ९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत बँकेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांनी परस्पर संगनमताने बँकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केल्याचा आरोप आहे.
फिर्यादीत बोगस कर्जप्रकरणे उभी करणे, बनावट कागदपत्रांचा वापर, तारण न घेता कर्जवाटप, जुनी थकीत खाती बंद दाखवून नवीन खाती उघडणे, निधीचा उद्देशबाह्य वापर करून तो तृतीय पक्षांकडे वळवणे तसेच दस्तऐवजांत फेरफार करून बँकेच्या निधीचा गैरविनियोग केल्याचे गंभीर आरोप नमूद करण्यात आले आहेत.
या गुन्ह्यात यशवंत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर, ३६ संचालक, ३ कार्यकारी अधिकारी, २ व्यवस्थापक व अन्य ९ जणांवर गुन्हा दाखल असून पोलीस तपास सुरू आहे.
सदर ईडीची कारवाई याच अपहारप्रकरणाच्या अनुषंगाने असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी ईडीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अधिकृत माहितीनंतरच या कारवाईचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.








