Sunday, September 13, 2026
Homeफलटणडॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फलटणमध्ये वाचनालयाचे नूतनीकरण; विद्यार्थ्यांसाठी नव्या उपक्रमांची घोषणा

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फलटणमध्ये वाचनालयाचे नूतनीकरण; विद्यार्थ्यांसाठी नव्या उपक्रमांची घोषणा

फलटण : फलटण नगरपरिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील वाचनालयाचे नूतनीकरण करण्यात आले. आगामी काळात विद्यार्थ्यांची स्वतंत्र कमिटी स्थापन करून त्यांच्या गरजेनुसार पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपरिषद घेणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी दिली.
मलठण येथील भीमज्योत जागृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका मंगलादेवी नाईक निंबाळकर, नगरसेवक अशोक जाधव, किरण राऊत आणि युवा नेते प्रतापसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
नगराध्यक्षांनी महतपुरा पेठेच्या योगदानाचे कौतुक करत, या भागाच्या विकासावर सातत्याने लक्ष ठेवले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच सामाजिक उपक्रमांसाठी नगरपरिषदेचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात निवृत्त वॉरंट ऑफिसर जे. एस. काकडे, ग्रंथमित्र आबासाहेब यादव आणि महाराष्ट्र पोलीस दलातील मयुरी चव्हाण यांचा समावेश होता. सन्मानपत्राचे वाचन सुरुची बडेकर आणि श्रावस्ती अहिवळे यांनी केले.
मुख्य वक्ते अॅड. आकाश आढाव यांनी आपल्या भाषणातून महापुरुषांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत, सकारात्मक बदलासाठी पंचशील आणि विपश्यना यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या स्वरचित कवितांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. कार्यक्रमात अंतरा बल्लाळ, दिक्षा कांबळे यांची भाषणे झाली, तर तनिष्का गायकवाड हिने भीमगीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
या सोहळ्यास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेंद्र अहिवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संग्राम बल्लाळ यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments