
हैदराबाद : वृत्तसंस्था, भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आज (दि.25) पासून सुरुवात झाली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा कसोटी सामना खेळवला जात आहे. (IND vs ENG 1st Test)
भारताचा Playing XI संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, एस. भरत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)
इंग्लंडविरुद्ध मागील 12 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत भारताने गाजवलेल्या उत्तम वर्चस्वाचा यंदा 5 कसोटी सामन्यांच्या प्रतिष्ठेच्या कसोटी मालिकेत खरा कस लागणे अपेक्षित आहे. मागील 12 वर्षांच्या कालावधीत भारताने इंग्लंडविरुद्ध सलग 16 मालिका जिंकल्या असून यातील 7 मालिकांमध्ये क्लीन स्विप नोंदवला आहे. आजपासून हैदराबादमध्ये खेळवल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळाला सकाळी 9.30 वाजता सुरुवात झाली.
यापूर्वी 2012 मध्ये लिस्टर कूकच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाने भारताला 2-1 फरकाने धूळ चारली होती. मात्र, त्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध सातत्याने एककलमी वर्चस्व गाजवले आहे. भारताने मायभूमीत सर्व संघाविरुद्ध खेळलेल्या मागील 44 सामन्यांत फक्त 3 कसोटी सामने गमावले आहेत. यावरूनही भारताचे वर्चस्व अधोरेखित होते. मागील दशकभराच्या कालावधीत आपल्या खेळाडूंनी अनुकूल खेळपट्टीचा पुरेपूर लाभ घेतला आहे. मात्र, यात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन व डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा या दोन दिग्गज खेळाडूंनी प्रतिकूल स्थितीतही आपल्या खेळाची उत्तम चुणूक दाखवून दिली आहे.
चौथ्या स्थानी नेहमीच आश्वासक फलंदाजी करत आलेला विराट कोहली या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळणार नसून याचा लाभ घेण्याचा इंग्लंड येथे प्रयत्न करेल, हे साहजिक आहे. विराटने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 28 कसोटी सामन्यांत 5 शतकांसह 1991 धावांची आतषबाजी केली. मात्र, या धावांपेक्षाही संघाला आवश्यकता असताना ठाण मांडून उभे राहण्याची विराटची क्षमता येथे उपलब्ध असणार नाही, याची भारतीय थिंक टँकला मुख्य चिंता असणार आहे. (IND vs ENG 1st Test)
इंग्लंडकडून जोरदार प्रतिकार अपेक्षित
पाहुण्या इंग्लंडसाठी भारतीय हवामान नेहमीच प्रतिकूल ठरत आले आहे, हा पूर्वेतिहास आहे. मात्र, येथे भारतीय खेळपट्ट्यांचे स्वरूप लक्षात घेत इंग्लंडने डावखुरे जॅक लीच व टॉम हार्टलीसह पदार्पणवीर लेगस्पिनर रेहान अहमद असे तीन फिरकीपटू उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. हार्टलीने 20 प्रथमश्रेणी सामन्यातं 40 बळी घेतले आहेत. जलद गोलंदाजीची मुख्य भिस्त मार्क वूडवरच असणार आहे. इंग्लंडचे तिन्ही फिरकीपटूंमध्ये अनुभवाची कमतरता आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमधील अनिश्चितता पाहता, भारताला कोणत्याच आघाडीवर गाफील राहून चालणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.
पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीसाठी महत्त्वाकांक्षी अश्विन-जडेजा!
अश्विन-जडेजा ही जोडगोळी पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरली आहे. यातही प्रामुख्याने अश्विनचा सामना कसा करायचा, हाच यक्षप्रश्न सतावत राहिला तर यातही आश्चर्याचे कारण असणार नाही.
आज पहिली कसोटी
स्थळ : हैदराबाद.
वेळ : सकाळी 9.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेची रूपरेषा
तारीख लढत वेळ ठिकाण
25 ते 29 जानेवारी पहिली कसोटी स. 9.30 पासून हैदराबाद
2 ते 6 फेब्रुवारी दुसरी कसोटी स. 9.30 पासून विशाखापट्टणम
15 ते 19 फेब्रुवारी तिसरी कसोटी स. 9.30 पासून राजकोट
23 ते 27 फेब्रुवारी चौथी कसोटी स. 9.30 पासून रांची
7 ते 11 मार्च पाचवी कसोटी स. 9.30 पासून धर्मशाला








