Saturday, September 19, 2026
Homeसातारासंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे फलटणमध्ये भव्य स्वागत; विमानतळावर एक दिवसाचा मुक्काम

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे फलटणमध्ये भव्य स्वागत; विमानतळावर एक दिवसाचा मुक्काम

फलटण | २९ जून:  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सायंकाळी ५ वाजता फलटण नगर परिषदेच्या हद्दीत जिंती नाका येथे पोहोचला. फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. निखिल मोरे यांच्या उपस्थितीत नगरवासीयांनी अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. सायंकाळी ६.३० वाजता हा सोहळा फलटण विमानतळावर पोहोचून मुक्कामी विसावला.

पहाटे तरडगाव येथे सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते माऊलींची नित्य पूजा व आरती झाल्यानंतर सकाळी ६ वाजता पालखी सोहळा ऐतिहासिक फलटणनगरीकडे मार्गस्थ झाला. स्वच्छ व निरभ्र वातावरणात निघालेल्या या सोहळ्याने दत्तमंदिर काळज येथे विश्रांती घेतली. सकाळी ९ वाजता सुरवडी येथे पोहोचून न्याहारी व त्यानंतर निंभोरे ओढ्यावर नैवेद्य व भोजन घेतले.

सोहळ्याच्या वाटचालीत कधी तळपता सूर्य तर कधी ढगाळ वातावरण जाणवत होते. पावसाची अपेक्षा असलेल्या वारकऱ्यांना मात्र उकाड्याने दमछाक केली. तरीही मुखी ‘विठ्ठल विठ्ठल’चा जयघोष करत वारकरी भक्तिभावाने मार्गक्रमण करत होते.

दुपारी वडजल येथे विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पालखी अश्वांसह मलठण, उंबरेश्वर चौक, संत हरीबाबा मंदिर मार्गे तीन बत्ती चौकातून कसबा पेठेत दाखल झाली. येथे बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळाने पुष्पवृष्टी केली. नंतर नाईक-निंबाळकर परिवाराच्यावतीने श्रीराम मंदिर येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर व इतर मान्यवरांनी स्वागत केले.

फलटण विमानतळावर १०० एकराच्या विस्तीर्ण जागेत मध्यभागी ज्ञानराजांचा भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. सभोवताली मानकऱ्यांचे तंबू व भक्तांचा उत्साही जनसमुदाय दिसत आहे. टाळ, मृदुंगाच्या गजरात सायंकाळी ७ वाजता माऊली व तुकोबारायांची आरती पार पडली. यानंतर हा सोहळा ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण नगरीत एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावला.

फलटण नगरपालिकेच्यावतीने सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांचे प्रतिनिधी तुकाराम, बाळासाहेब व राजाभाऊ आरफळकर, चोपदार राजाभाऊ रंधवे, रामभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे व इतर मानकऱ्यांचा फेटा व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments