
फलटण:- तालुका परिसरात नीरा उजवा कॅनॉलमध्ये गणेश विसर्जनानंतर अनेक मूर्ती पाण्याबाहेर उघड्यावर दिसत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. धार्मिक श्रद्धेने भक्तांनी विसर्जित केलेल्या या गणेशमूर्ती पाण्यात न विरघळता कॅनॉलच्या काठावर व उघड्यावर पडलेल्या दिसत असल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव असून विसर्जन ही पवित्र प्रक्रिया मानली जाते. मात्र विसर्जनानंतर मूर्ती अशा अवस्थेत पडलेल्या पाहून अनेकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर व योग्य विसर्जन स्थळांची व्यवस्था करण्याबाबत दरवर्षी आवाहन केले जाते. तरीदेखील अशा घटना घडत असल्याने पर्यावरणाबरोबरच भक्तांच्या श्रद्धेलाही धक्का बसत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मूर्तींची योग्य ती व्यवस्था करावी, तसेच पुढील काळात नीरा उजवा कॅनॉलसह इतर जलस्रोतांमध्ये अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.








