
कोल्हापूर : संततधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने पहाटे ३९ फूट ही इशारा पातळी बुधवारी दुपारी ओलांडली. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला होता, पण सायंकाळी पुन्हा मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान या पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील ४० हून अधिक मार्ग बंद आहेत. अनेक मार्गांवरील वाहतूक, दळणवळण ठप्प झाले आहे. शाळा बंद आहेत.
त्यामुळे पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी पहाटे पाच वाजता ३९ फूट या इशारा पातळीवर पोहोचली. सायंकाळी ती ४० फूट या इशारा पातळीवर राहिली. राधानगरी धरणाच्या स्वयंचलित ७ दरवाजांपैकी ४ दरवाजे बंद झाले असून ७५८४ क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. अलमट्टी धरणाचा विसर्ग आज सकाळी २ लाख क्युसेकवरून २ लाख ५० हजार क्युसेक करण्यात आला आहे. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पुराचा फटका
जिल्ह्यात आठ राज्य मार्ग, २२ प्रमुख जिल्हा मार्ग, दहा ग्रामीण मार्ग, एक इतर जिल्हा मार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. धामणी खोऱ्यातील म्हासुर्ली, गवशी, अंबर्डे, पनोरे गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात ६८ घरांची पडझड होऊन ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे आतापर्यंत दोन कोटी ४८ लाख रुपयांचा फटका बसला.
कोल्हापुरात पाणी
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील संजयसिंह गायकवाड पुतळ्यासमोर पाणी आले आहे. यामुळे मंगळवारी सायंकाळी गंगावेश ते शिवाजी पुलापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.
१३९ शाळा बंद
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे भुदरगड तालुक्यातील ७, गगनबावडा ४०, करवीर ५, पन्हाळा ३४, राधानगरी ३० व शाहूवाडी तालुक्यातील १५ अशा एकूण १३९ शाळा आज बंद असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली आहे.
कोल्हापुरात कुटुंब स्थलांतरित
कोल्हापूर शहरातील सुतारवाडा परिसरात पंचगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीजवळ पोहोचल्याने सुरक्षेच्या दृष्टीने एका कुटुंबाला चित्रदुर्ग मठ येथील महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरीत केले आहे. पुरग्रस्त भागातील नागरिकासाठी शहरात ३० निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत.
रुग्णालयांना स्थलांतरित नोटीस
आरोग्य विभागाने शहरातील पूरबाधीत क्षेत्रातील डायमंड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस (विन्स) हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, ॲपल सरस्वती हॉस्पिटल या पाच रुग्णालयांना स्थलांतरित करण्यासंदर्भात नोटीस लागू केल्या आहेत.