फलटण-कोरेगाव विधानसभेत बौद्ध समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लढाई; संविधान समर्थन समितीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

0
2
फलटण-कोरेगाव विधानसभेत बौद्ध समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लढाई; संविधान समर्थन समितीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

फलटण :- २९ ऑक्टोबर २०२४ – फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीत बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी संविधान समर्थन समितीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतून सचिन पाटील, तर शरद पवार गटाकडून दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. मात्र, बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व न दिल्याने संविधान समर्थन समिती आणि फलटण तालुक्यातील विविध बौद्ध संघटनांनी एकत्र येत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

यासाठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन येथून तहसील कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत “एकच निर्धार – बौद्ध आमदार”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, आणि क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

संविधान समर्थन समितीच्या वतीने नंदु मोरे, बुवासाहेब हुंबरे, गंगाराम रणदिवे, आणि प्रा. रमेश आढाव यांनी अपक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विधानसभेत बौद्ध समाजाचे हक्कांचे प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी संपूर्ण समाज एकत्र आला आहे, आणि या लढाईला समाजाच्या सर्व स्तरांतून जोरदार पाठिंबा मिळत आहे.

संविधान समर्थन समितीने विधानसभेत बौद्ध समाजाचा आवाज बुलंद करण्याच्या निर्धारासह बौद्ध आमदाराच्या निवडीसाठी अपक्ष उमेदवारीची भूमिका स्पष्ट केली आहे.