फलटण–कोरेगाव मतदारसंघासाठी राज्य अर्थसंकल्पातून ९३.३५ कोटींचा विकास निधी; रस्ते व दळणवळणाच्या कामांना मोठी चालना

0
3
फलटण–कोरेगाव मतदारसंघासाठी राज्य अर्थसंकल्पातून ९३.३५ कोटींचा विकास निधी; रस्ते व दळणवळणाच्या कामांना मोठी चालना


फलटण | प्रतिनिधी. राज्याच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल ९३ कोटी ३५ लाख रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून, या निधीतून मतदारसंघातील अनेक महत्त्वपूर्ण रस्ते व दळणवळणाशी संबंधित विकासकामे मार्गी लागणार आहेत.
या निधीमुळे मतदारसंघातील ग्रामीण रस्ते, प्रमुख जिल्हा मार्ग, जोडरस्ते, काँक्रीटीकरण, रुंदीकरण, संरक्षक भिंती, गटार बांधकाम तसेच काही ठिकाणी पुलांचे बांधकाम अशी अनेक कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांना प्रवास सुलभ होणार आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापूर्वीही त्यांनी फलटण शहरात प्रशासकीय इमारत, महसूल भवन, शहरातून जाणारा पालखी महामार्ग, शहरातील अंतर्गत रस्ते, तारांगण तसेच आधुनिक स्टेडियम यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातील अनेक कामे सध्या सुरू असून काही कामे पूर्णत्वाकडे जात आहेत.
फलटणच्या इतिहासात प्रथमच राज्याच्या अर्थसंकल्पातून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. या निधीतून सासवड–भाडळे–सोनवडी–विडणी–सांगवी मार्ग, गिरवी–मांडवखडक–वाखरी–निरगुडी–निंभोरे–फडतरवाडी–जिंती मार्ग, जिंती–साखरवाडी–नांदल–मिषी–वाघोशी–उपळवे मार्ग, भुईंज–देगाव–राऊतवाडी–वाघोली–पिंपोडे–तडवळे मार्ग, वाई–परखंडी–मुंगसेवाडी–साळशी–नांदवळ–सोनके–पिंपोडे मार्ग यांसह अनेक प्रमुख रस्त्यांची सुधारणा, रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
याशिवाय गिरवी–दुधेबावी–वडले–पिंप्रद–राजाळे–सांगवी, फलटण–कुरवली–मांडवखडक–दालवडी–उपळवे, सर्कलवाडी–राऊतवाडी–देहिगाव–वाठार स्टेशन, नायगाव–करंजे, जाधववाडी–गिरवी, पिंप्रद–सोनवडी, सरडे–शेंडगेवाडी, शिंदेवाडी–हनुमाननगर, चौधरवाडी, घिगेवाडी तसेच अनेक ग्रामीण जोडरस्त्यांचे काँक्रीटीकरण व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.
काही ठिकाणी आरसीसी गटार बांधकाम, गावांतर्गत सीसी रस्ते, संरक्षक भिंती उभारणे यासारखी कामे देखील केली जाणार आहेत. तसेच निरगुडी येथील लांडगेवस्ती परिसरात ओढ्यावर नवीन पूल उभारण्यात येणार असून गुणवरे–मठाचीवाडी रस्त्यावरही पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
दरम्यान, हा ऐतिहासिक निधी मंजूर केल्याबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी फलटण–कोरेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी कायम सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगत, मंजूर झालेली सर्व विकासकामे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
या निधीमुळे मतदारसंघातील रस्ते व दळणवळणाच्या सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.