केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क; मागणीवर सकारात्मक प्रतिसाद
पंढरपूर | प्रतिनिधी : ब्रिटिशकालीन काळापासून चर्चेत असलेल्या फलटण ते पंढरपूर रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने पंढरपूर येथे आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पासाठी जमीन संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा प्रमुख्याने उपस्थित करण्यात आला.
बैठकीदरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना चालू बाजारभावाच्या तब्बल चौपट दराने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून जमीन संपादनाच्या प्रक्रियेत योग्य व समाधानकारक मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. या मागणीवर रेल्वेमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीस आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकयन, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, शिवरूप राजे खर्डेकर, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते.
काही अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले. फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या जमिनी, नुकसानभरपाई आणि पुनर्वसनाशी संबंधित बाबींवर प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही अपेक्षित आहे.
या बैठकीमुळे दीर्घकाळ चर्चेत असलेल्या फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून, चौपट मोबदल्याच्या मागणीबाबत पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
