फलटण: फलटण तालुका भाजपाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटण येथे लाडकी बहीण सन्मान सोहळा व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या विराट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित असून, विराट शक्ती प्रदर्शनही होणार आहे. अशी माहिती आयोजक जयकुमार शिंदे यांनी दिली.
भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत फलटण विधानसभा मतदारसंघातून १८,००० मताधिक्य मिळवले होते. त्यामुळे भाजपने या मतदारसंघातील जागा महायुतीतून आपल्यासाठी राखून ठेवावी, अशी आग्रही मागणी भाजपच्या नेतृत्वाकडे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिशा ठरवणार आहेत.
या मेळाव्यासाठी फलटण विधानसभा मतदारसंघातून १५ ते २० हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित असून, भव्य मंडपाची तयारी करण्यात आली आहे. भाजपातर्फे सचिन कांबळे-पाटील हे निवडणूक लढवणार असल्याचे समजते. माजी खासदार नाईक निंबाळकर महायुतीच्या माध्यमातून राज्य व फलटण मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेऊन आगामी निवडणुकीसाठी सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व भाजप कार्यकर्ते व मतदारांनी या भव्य मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमोल सस्ते व बजरंग गावडे यांनी केले आहे.