फलटणमध्ये बुद्ध जयंती महोत्सवाचा उत्साह; भव्य मैत्री भावना बाईक रॅली आणि विविध कार्यक्रमांनी जल्लोष

0
9
फलटणमध्ये बुद्ध जयंती महोत्सवाचा उत्साह; भव्य मैत्री भावना बाईक रॅली आणि विविध कार्यक्रमांनी जल्लोष

फलटण : समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारी बुद्ध पौर्णिमा यंदा फलटण शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीच्या सहकार्याने साहस क्रीडा मंडळाच्या वतीने १ मे २०२६ रोजी भव्य बुद्ध जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने सकाळी ९.०० वाजता शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक येथून सुरू होणारी ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत पुन्हा त्याच ठिकाणी येऊन समाप्त होणार आहे. रॅलीचा मार्ग राम मंदिर, शिंपी गल्ली, रविवार पेठ, पंचशील चौक, मंगळवार पेठ, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, राजे उमाजी नाईक चौक आणि महात्मा गांधी चौक असा निश्चित करण्यात आला आहे.

यावेळी सकाळी १०.०० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पारंपरिक लेझीम प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार असून कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

जगभरातील सुमारे १८० देशांमध्ये साजरी होणारी बुद्ध पौर्णिमा ही अत्यंत मंगलमय मानली जाते. याच दिवशी भगवान बुद्धांचा जन्म, बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना घडल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.