
भीम-फुले गीतकाव्य वाचन महोत्सवात आयु. भीमराव लोंढे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक
फलटण/पुणे प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भीम-फुले गीतकाव्य आणि कविता वाचन महोत्सव’ स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत फलटण येथील भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. भीमराव हरिबा लोंढे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे.
महामानव महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी तसेच अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेतील प्रवेशिकांचे परीक्षण प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे आणि श्रीमती सुजाता चंद्रकांत गायकवाड यांनी केले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
आयु. भीमराव हरिबा लोंढे यांच्या या यशाबद्दल त्यांचे भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका, सातारा जिल्हा पूर्व, विविध सामाजिक, शैक्षणिक व बौद्ध धम्म क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.










