सासकल येथील अवैध दारू बंदीसाठी भैरवनाथ फाउंडेशनचा पुढाकार

0
4
सासकल येथील अवैध दारू बंदीसाठी भैरवनाथ फाउंडेशनचा पुढाकार


सासकल येथील दारू विक्री न करण्याबाबतचे लेखी पत्र देताना शैला भोसले व गोरख बाबा मुळीक….


फलटण : मौजे सासकल ता. फलटण जि.सातारा येथील अवैधरित्या दारू विक्री अनेक वर्ष सुरू होती या विरुद्ध सासकल जन आंदोलन समितीने अनेकदा आंदोलने करून पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात आली होती. तरीही राहून राहून दारू विक्रेते अवैधरित्या दारू व्यवसाय करतच होते. परंतु सासकल गावामध्ये नव्याने स्थापन झालेल्या श्री.भैरवनाथ फाउंडेशन च्या वतीने कायमस्वरूपी गावातील अवयव दारू व्यवसाय बंद करावेत यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्यादृष्टीने ज्ञानेश्वर हरिबा मुळीक यांच्या वस्तीवर रात्री भैरवनाथ फाउंडेशनचे पदाधिकारी, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींना बोलावून त्यांना सक्त ताकीद देऊन त्यांच्याकडून दारू बंद करत असल्याबाबतचे लेखी पत्र देण्यासाठी सांगण्यात आले. त्यानुसार गावातील दोन्हीही दारू विक्रेत्यांनी आज ग्रामपंचायत ऑफिस मध्ये येऊन दोघांनीही लेखी पत्र देऊन पुन्हा व्यवसाय सुरू केला तर कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी संमती दिली. गावच्या विधायक विकासासाठी व गावच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या भैरवनाथ फाउंडेशनच्या मार्फत येत्या काळात जलसंधारण व मृदा संधारण याही क्षेत्रात भरीव काम करण्याचा मनोदय भैरवनाथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दारूबंदीसाठी घेतलेल्या पुढाकारामुळे भैरवनाथ फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले असून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी विक्रेत्यांच्या या कृतीचे स्वागत केले असून भैरवनाथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.गावाचे पोलीस पाटील हणमंत सोनवलकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी दारू विक्रेत्यांनी लेखी पत्र भैरवनाथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत ऑफिस मध्ये सुपूर्त केले.
यावेळी दारू विक्रेते गोरख बाबा मुळीक व शैला विनोद भोसले यांनी “आम्ही यापुढे गावामध्ये कोणत्याही प्रकारची अवैध दारू विक्री करणार नाही असे आम्ही लिहून देत आहोत. यापुढे आम्ही जर गावांमध्ये अवैध दारू विक्री केली तर भारतीय दंड संहिता अधिनियम अंतर्गत सदर गुन्ह्यासाठी असणारी शिक्षा व कारवाई आमच्यावर करण्यात यावी असे आम्ही लेखी देत आहोत.”
यावेळी माजी सरपंच हणमंत गंगाराम मुळीक, माजी उपसरपंच सत्ता ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र घोरपडे, ज्ञानेश्वर हरिबा मुळीक, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मदने,दीपक घोरपडे,देविदास विनोद भोसले, कमलाकर आडके, शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक मदने, अजित मुळीक, संदीप फडतरे, अनिल मुळीक,विनोद भोसले, शैला विनोद भोसले, किसन पवार उपस्थित होते.