Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रबारामतीत राजकीय तापमान वाढलं! माळेगाव कारखान्यावरून पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ सामना

बारामतीत राजकीय तापमान वाढलं! माळेगाव कारखान्यावरून पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ सामना

बारामती : राज्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीमुळे बारामतीतील राजकीय वातवरण चांगलंच तापलं आहे. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काका-पुतण्याचा थरार बघायला मिळणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे आमने-सामने येणार आहेत.

निवडणूक प्रचारात अजित पवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत भावनिक साद घातली आहे. पणदरे गावात झालेल्या सभेत ते म्हणाले, “मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो. माझ्या चुलत्याच्या कृपेने झालो, पण कामाच्या बदल्यात मी एक रुपया घेतला नाही. त्यामुळे मी ताठ मानेने बोलतो. काही जण सीएसपींच्या बदल्यांसाठी कोटींनी पैसे घेतात, पण मी कधीही तसं केलं नाही.”

तसेच, CSR फंडामधून कोट्यवधींची मदत करत असल्याचं नमूद करत ते म्हणाले, “माझ्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही. मला कारखाना खाजगी करायचा वेड लागलं आहे का? मी सहकाराचा पुरस्कर्ता आहे.” पुढे त्यांनी स्पष्ट केलं, “माझं संपूर्ण आयुष्य शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांशी जोडलेलं आहे. आम्ही योजना बंद करणारे लोक नाही.”

500 कोटींचं वचन!

अजित पवारांनी मतदारांना आश्वासन दिलं, “पुढच्या पाच वर्षात माळेगावला 500 कोटी रुपये देणार आहे. तुमचं प्रत्येक काम अजित पवारच करणार आहे. कोणी माईचा लाल मला रोखू शकत नाही. कोणीही सांगावं की अजित पवार खोटं बोलतोय, तर मी राजकारण सोडून देईन.”

त्यांनी आपल्या राजकीय सफरीचाही उल्लेख केला – “1991 साली शरद पवारांना काहींनी माझं नाव चेअरमनसाठी सुचवलं, पण त्यांनी थोडा अनुभव घ्या असं सांगितलं. मात्र एकदा बँकेत प्रवेश केला की परत मागे वळून पाहिलं नाही.”

‘काका विरुद्ध पुतण्या’ पुन्हा रंगात

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या 22 जूनला होणार आहे. या निवडणुकीत अजित पवार स्वतः ‘ब’ गटातून अध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. तर दुसऱ्या बाजूला, युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचं मार्गदर्शन थेट शरद पवार करत आहेत.
यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर बारामतीत तिसऱ्यांदा पवार विरुद्ध पवार ही जोरदार लढत रंगणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments