सायबर फसवणूक टाळा – सजग व्हा : बारामतीत विद्यार्थ्यांची जनजागृती मोहिम

0
16
सायबर फसवणूक टाळा – सजग व्हा : बारामतीत विद्यार्थ्यांची जनजागृती मोहिम

बारामती : विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत बी.बी.ए. (सीए) विभागाच्या विद्यार्थ्यांनी “सायबर फसवणूक टाळा – सजग व्हा” ही जनजागृती मोहिम हाती घेतली.

या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी मोबाईलवर येणारे अज्ञात कॉल्स, बनावट लिंक्स, लॉटरी स्कॅम, ऑनलाइन गेमिंग फ्रॉड यांसारख्या फसवणुकीच्या पद्धतींची माहिती दिली. प्रत्यक्ष उदाहरणे देऊन शालेय विद्यार्थ्यांना अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी आवश्यक काळजी कशी घ्यावी हे समजावून सांगितले.

साक्षी कदम व श्रावणी कदम या विद्यार्थिनींनी सायबर सुरक्षेचे धडे देत सरकारी सेवा ऑनलाईन कशा उपलब्ध होतात हे स्पष्ट केले. त्याचबरोबर डिजीटल साक्षरतेमुळे समाजातील सर्व घटकांना मिळणारे फायदे, रोबोटिक्समधील भविष्यातील संधी व रोजगाराच्या नवीन शक्यता यांवरही विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.

सायबर सुरक्षा ही आजच्या डिजिटल युगातील महत्त्वाची गरज असल्याचे प्रतिपादन करून विविध प्रात्यक्षिकांद्वारे फसवणुकीपासून बचावाचे मार्ग दाखवण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर अवेअरनेसविषयी मोठी उत्सुकता व्यक्त केली.

‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमाचा बारामतीतील हा टप्पा अत्यंत यशस्वी ठरला असून विद्यार्थ्यांचा हा पुढाकार समाजात डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.