
मेलबर्न, वृत्तसंस्था : नोव्हॅक जोकोव्हिच, कोको गॉफ, साबालेंका यांनी शानदार विजय संपादन करत येथील ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली. जोकोव्हिचने अर्जेंटिनाच्या टॉमस इचेव्हेरीला 6-3, 6-3, 7-6 (2) अशा फरकाने पराभूत करत आपल्या ऐतिहासिक 25 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या दिशेने आगेकूच कायम राखली. त्याची पुढील फेरीतील लढत फ्रान्सचा 20 वा मानांकित ड्रियन मॅनारिनो व अमेरिकेचा 16 वा मानांकित बेन शेल्टॉन यांच्यातील विजेत्यांशी होईल.
जवळपास अडीच तास चाललेल्या या लढतीत जोकोव्हिचला पूर्ण लढतीत एकाही सिंगल ब्रेक पॉईंटला सामोरे जावे लागले नाही, इतके त्याने एककलमी वर्चस्व गाजवले. तिसर्या सेटमध्ये टॉमसने सर्वस्व पणाला लावले; पण अगदी अंतिम क्षणी त्याची निराशा झाली. जोकोव्हिचचा हा मेलबर्न पार्कमधील 100 वा सामना असून, येथे सर्वाधिक सामने खेळलेल्या टेनिसपटूंच्या यादीत रॉजर फेडरर (117) व सेरेना विल्यम्स (105) यांच्यापाठोपाठ तो तिसर्या स्थानी विराजमान आहे.
अन्य लढतींत जॉन सिन्नरने अर्जेंटिनाच्या बाएजला 6-0, 6-1, 6-3, रुबलेव्हने अमेरिकेच्या सेबॅस्टियनला 6-2, 7-6 (4), 6-4, त्सिसिपसने ल्युका व्हानला 6-3, 6-0, 6-4 असे नमवले. महिला एकेरीत साबालेंकाने लेसिया त्सुरेंकोविरुद्ध 6-0, 6-0, तर अमेरिकेच्या गॉफने आपलीच राष्ट्रीय सहकारी ल्सियाला 6-0, 6-2 अशा फरकाने पराभवाचे धक्के दिले.
बोपण्णा-एबडेन पुरुष दुहेरीत तिसर्या फेरीत
या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा व मॅथ्यू एबडेन या जोडीने जॉन मिलमॅन व एडवर्ड विंटर यांच्याविरुद्ध 6-2, 6-4 अशा फरकाने सरळ सेटस्मध्ये विजय मिळवत तिसर्या फेरीत प्रवेश केला. ही लढत साधारणपणे तासभर चालली. 43 वर्षीय बोपण्णाने एबडेनसह सर्व आघाड्यांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. या जोडीने यापूर्वी गुरुवारी पहिल्या फेरीत जेम्स डकवर्थ व मार्क पोलमन्स या जोडीलादेखील तीन सेटमध्ये नमवले होते. आता तिसर्या फेरीत त्यांचा मुकाबला वेस्ले कुलहॉफ व निकोला या डच-क्रोएशियन जोडीविरुद्ध होईल.







