
माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादीतून बंड करणाऱ्या अजित पवार यांच्या गटाकडे दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा नाहीये. त्यामुळं त्यांच्या गटावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. अजित पवारांकडे सध्या सर्वाधिक आमदार नसल्याने त्यांच्या गटातील सर्व आमदार लवकरच निलंबित होणार असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. अजित पवारांकडे ३६ आमदार असते, तर त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं असतं. परंतु त्यांच्याकडे तेवढी संख्या नसल्याने राज्यात आणखी मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतून बंड करणारे आमदार तसेच मंत्र्यांचं सदस्यत्व रद्द होणार असल्याचं भाकित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.







